Login

ठिणगी अंतिम भाग ४

नात्यातला विश्वास तुटायला एक क्षण पुरेसा असतो.
मागच्या भागात आपण पाहिले की किशोर गावी जावून आला होता. घडलेला प्रकार तो आपल्या बायकोला सांगायला तयार नव्हता. तीने विचारल्यावर मात्र किशोर घडलेला प्रसंग सांगतो. आपली साथ द्यायला कोणीच नाही असे आगतिकपणे तो बोलल्यावर त्याची पत्नी त्याला आधार देते. आता पाहुया पुढे.

" लाथ मारेल तिथे पाणी काढणारे तुम्ही माझा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही संकटातून देखील नक्कीच मार्ग काढाल. नाती तुटली तरी परत जुळतील. आपल्यावर आलेली वेळ आणि परीस्थिती दोन्ही वाईट आहे. ती व्यवस्थित झाली की होईल सगळे नीट." मालती किशोरला सांगत होती.

" मला नाही वाटत आता परत नरेश काही ऐकून घेईल. तो काही विसरणार पण नाही." किशोर मालतीला सांगत होता.

" नका आता त्या गोष्टींचा करु. उद्या आपल्या लेकीचा साखरपुडा आहे. त्याकडे बघायला पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यांचे पण पहायला हवे. मी लिस्ट करुन ठेवते. तुम्ही सामान घेऊन या."मालती किशोरला सांगत होती.

" नरेश भावजी कसे आहात. ऐका ना गावावरुन येताना उद्या आपल्या शेतातल्या शेंगा घेवून या. लवकर या आणि. रंजू विचारते सारखी आजी आणि काका-काकू कधी येणार. अजून नाही आले का? "मालती नरेशला फोन करुन बोलत होती.

" हो वहिनी येतो आम्ही उद्या."नरेश मालतीला फोन करुन सांगत होता.

" चला सगळे बसून घ्या गाडीत. रंजू तुझ्या बरोबर हि मावशी आणि या बहिणींना घेवून पुढे हो.आम्ही येतो लगेच."किशोर रंजूला सांगत होता.

कार्यालयात पोहचताच आई, अण्णा आणि नरेशला पाहून किशोरला आनंद होतो. हा चमत्कार कसा घडला असेल याचा विचार करताच त्याला आपल्या बायकोनेच सर्व घडून आणले असेल याची खात्री पटली होती. लहानपणीचे भाऊ एकत्र भेटल्यासारखे नरेश आपल्या लहान भावाला आणि किशोर दादाला भेटला होता.

" दादा,मला बोलायच तुझ्याशी." नरेश किशोरला सांगत होता.

" बोलूयात पण आधी कार्यक्रम पार पडू दे." किशोर नरेशला सांगत होता.

" वहिनी थांब जरा. मला बोलायच तुझ्याशी."नरेश मालतीला सांगत होता.

" अग लहान्याने वाटपाचा विषय काढला तेव्हा भांडारकरांचा मोनू तिथेच होता. त्याने माझे खूप कान भरले आणि या दोघांविषयी मला वाईट सूनावले. त्याचे ऐकून मी दादाला नाही ते बोललो. तरी आज दादा माझ्याशी पूर्वीसारखाच वागला. तुम्हांला दादा काही बोलला नाही का? " नरेश मालतीला सांगत होता.

" काही सांगायला आणि बोलायला वेळ तरी कुठे होता. साखरपुड्याच्या गडबडीत. आणि तो भांडारकरांचा मोनू आणि सोनू आपल्या वाईटावरच आहे. आपल एकत्र कुटूंब त्याला बघवत नाही. मागे खूपदा त्याने असाच प्रकार केला होता. पण आज बोलते तुम्हांला मी."मालती नरेशला सांगत होती.

चला, कार्यक्रमाला या सगळे. असे सर्वजण बोलत होते. रंजूला टिळा लावून हळदी-कुंकू लावण्यात आले होते. तसेच राहूलला देखील टिळा लावला गेला होता. टाळ्यांच्या गजरात रंजू आणि राहूलने एकमेकांना अंगठी घालून पेढा भरवला होता.

" दादा मला बोलायचे तुझ्याशी." नरेश किशोरशी बोलत होता.

" बोल ना. आता कार्यक्रम पार पडलाय. आज घरी राहशील ना तू."किशोर नरेशला सांगत होता.

" हो दादा. त्या आधी मला तुझी माफी मागायची आहे. मी दुस-याच्या सांगण्यावरुन आपल्या नात्यात इतक्या टोकाची भूमिका घेतली. माझी चूक माफ करण्यासारखी नाही. पण मला माफ करशील ना. हवतर मला मार. पण बोल काहीतरी." नरेश किशोरशी काकुळतीला येवून बोलत होता.

" काय बोलू मी यावर. मला तेव्हा पहिल्यांदा तात्या आठवले. त्यांनी आपल्याला लहानाच मोठ करतानाचे क्षण आठवले. आतून खूप तुटल्यासारखे वाटले मला. मला माझे जगच संपल्या सारखे वाटले होते. पण आज जाणवले अजूनही ती ओढ आणि त्यांचे संस्कार आपल्या सर्वांमधे आहेत."किशोर नरेशला सांगत होता.

" मला पण खूप वाईट वाटले दादा. तुम्ही दोघे इथून निघून गेल्यावर." नरेश किशोरशी समजूत घालत बोलत होता.

" अजून एक बोलायचे आहे तुझ्याशी."किशोर नरेशला सांगत होता.

" बोल ना दादा."नरेश किशोरला सांगत होता.

" आणखी कोणी आपल्यात भांडण लावण्याआधी आणि कोणालाही वाटपाविषयी मागणी करण्याआधी वेळीच गोडी-गुलाबीने वेगळ झालेल बर. "किशोर ठाम आवाजात नरेशला सांगत होता.

" हे काय दादा, तू मला माफ नाही का केल. माझ चुकल."नरेश किशोरशी बोलत होता.

" पोरांच्या काॅलेजच्या फी ऐकून आणि मला घर सांभाळणे कठीण जात होते मला ताबडतोब पैश्याची गरज भासत होती म्हणून मला वाटप हवे होते."लहान भाऊ किशोर आणि नरेशला सांगत होता.

" आज जी तुमच्यावर परिस्थिती ओढावली ती उद्या कोणावरही येवू शकते. मी उद्या रिटायर होईल मला देखील पैश्याची गरज भासू शकते. तेव्हा मी देखील वाटपा विषयी बोलेलच. तेव्हा आपण वेळीच वाटप करुन घेऊया."किशोर आपल्या दोन्ही भावांकडे पाहत बोलत होता.

" दादा, नको ना अस बोलूस. आम्हांला परक नको करुस. तुम्ही आणि वहिनी दोघेही हवे आहेत आम्हांला." नरेश आणि लहान भाऊ किशोरचे पाय धरत बोलत होते.

" आम्ही कुठे जाणार नाही. सणवार, सोहळे आपण एकत्रच साजरे करणार आहोत. वेगळ होणे आणि वाटप म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती समान वाटप करुन कागदोपत्री नावावर करुन घेऊन जो-तो आपल्या पद्धतीने शेती किंवा उरलेल्या जमिनीचे काय करायचे ते पाहू शकतो. विषय आता निघालाच आहे तर पुन्हा वाद होण्यापासून टाळायचा असेल तर आजच बोललेल बर."किशोर दोन्ही भावांकडे पाहत बोलत होता.

अश्या पद्धतीने समान वाटप होऊन तिन्ही भाऊ एकत्र येवून सणवार साजरे करत होते. आपल्या शेतात पिकलेल धान्य एकमेकांना देऊन नात्यातली वीण बळकटच करत होते. " एक घाव, आणि दोन तुकडे." करणे क्षणार्धात सोपे असते. परंतु भविष्यतले चित्र सामंजस्य पणे दाखवून दिल्यास बोलले जाणारे विचार नक्कीच पटून पुढे उद्भवणारे संकट कालीन प्रश्न वेळीच सोडवले जावू शकतात नाही का?