Login

हे माझे घर आहे!

तिचे घर आणि झालेल्या अन्यायाबद्दल सांगणारी रहस्यमय कथा!
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

लघुकथा

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: हे माझे घर आहे!

भक्ती आणि नित्या एका ठिकाणी कामानिमित्त गेल्या होत्या.

दोघीही बातमीदार म्हणून वर्तमानपत्राच्या कंपनीमध्ये काम करायच्या.

"बघ ना, आपल्याला किती कमी प्रवासभाडे देण्यात आले आहे आणि ते सुद्धा किती उशिरा मिळते." नित्या भक्तीकडे तक्रार करत म्हणाली.

" हो ना, उगाच सांगितले की, माझ्याकडे स्कुटी आहे. त्यामुळे काय तुमच्याकडे स्कुटी आहे ना, आम्ही तुम्हाला प्रवास भाडे देतो ना, असे म्हणून सर सुद्धा काही ऐकत नाहीत." तिच्या बोलण्याला दुजोरा दिला होता.

" अगं, इकडे एक गाव आहे आणि जवळच तिथे एक जुने मंदीर सुद्धा आहे, असं मी ऐकलं आहे. आपण जायचे का? " संध्याकाळ होऊन गेलेली होती भक्तीने नित्याला विचारले.

" अगं, आपण तिथे गेलो तर आपल्याला उशीर होईल, त्यामुळे मला तरी तिथे जायला नको, असे वाटते. " नित्या अनोळखी ठिकाणी जायला थोडीशी घाबरतच होती.

नंतर खूप चर्चा केल्यावर एकदा जाऊन येऊ, असा विचार करून मग दोघीसुद्धा त्या गावी जाण्यासाठी निघाल्या.

तिथे एक शंकराचे मंदिर होते. दोघींनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर तिथून निघाल्या.

जोरात थंड हवा वाहत होती आणि जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा संध्याकाळ झाली होती, परंतु आता अंधार झाला होता, हे त्यांना समजले.

तिथूनच त्या पुढे चालत होत्या. कारण त्यांनी स्कुटी थोडीशी पुढे लावली होती. जिथे त्यांनी स्कुटी लावली होती, तिथे गेल्यावर जोरात आवाज झाला होता. त्या आवाजाने त्या जरा घाबरल्या.

अचानक बोचणारी थंड हवा आपल्या अंगाला स्पर्श करते, असे त्यांना जाणवू लागले. मध्येच कुत्र्यांचे भुंकणे फक्त ऐकू येऊ लागले होते.

आता मात्र नित्या जास्तच घाबरली होती. उगाच आपण या गावात आलो, असे तिला वाटायला लागले.

भक्ती स्कुटीचा स्टॅन्ड काढण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिला पानांची सळसळ ऐकायला आली. पानांची सळसळ नेहमीच ऐकायला येते, पण याचा आवाज थोडा जास्तच होता, म्हणून तिने वर बघितले.

त्यांनी जिथे गाडी लावलेली होती, ती मंदिराच्या आवारापासून थोडीशी पुढे एका झाडाच्या खाली लावली होती.

" अगं काय करतेस ? चल इथून लवकर निघूया. मला ही जागा काही बरोबर वाटत नाहीये. ती घाबरतच भक्तीला लवकर स्कुटी चालू करण्यासाठी बोलत होती.

" अगं, मला वाटतंय हा स्टॅन्ड जाम झाला आहे आणि मातीत रुतला आहे. तो निघतच नाही, मी सुद्धा कधीपासून प्रयत्न करते."  चेहऱ्यावर जमलेले घर्मबिंदू आपल्या ओढणीने टिपत तिने सांगितले.

ती खाली बसून तो स्टॅन्ड काढण्यासाठी प्रयत्न करत होती. तो निघत नाही, बघून नित्यासुद्धा तो स्टॅन्ड काढण्याचा प्रयत्न करत होती. दोघी मिळून तो काढण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु तो निघतच नव्हता.

स्टॅन्ड काढल्याशिवाय स्कुटी चालवू शकणार नाही आणि जवळपास घरी परतण्याचे कोणतेही साधन दिसत नसल्यामुळे दोघींनाही आता काय करावे, हा प्रश्न पडला होता.

" तू एका गोष्टीचे निरीक्षण केलेस का?  मगाशी आपण मंदिरात जाण्याच्यावेळी काही माणसं तरी दिसत होते, परंतु आता इथे कोणीच दिसत नाही."  नित्या असे बोलून तिला भीती वाटत आहे, हे सारखे सांगत होती.

" तू उगाच घाबरत असतेस. थांब करू आपण काहीतरी." अशी ती म्हणाली.

नित्याने मग त्या झाडाला टेकून उभे राहण्यासाठी झाडाच्या खोडाला हात लावला आणि तिला एक झटका बसल्यासारखे ती बाजूला फेकली गेली.

" काय झालं नित्या? "  खाली पडलेल्या आपल्या मैत्रिणीला उभी करत ती म्हणाली.

" अगं, जेव्हा मी त्या झाडाच्या खोडाला हात लावला, तेव्हा मला झटका बसला आणि कोणीतरी मला ढकलले."असं वाटलं.

" माझी मस्करी तर करत नाहीस ना ? असं कसं कोणी तुला ढकलले ?" भक्ती हसतच विचारत होती.

तिथे दोघींशिवाय अजून कोणीच नव्हते, मग कोण ढकलणार असे भक्तीला वाटत होते.

" मी जर नाटक केले असते तर एवढ्या जोरात खाली पडली नसती ना ! बघ माझ्या हाताला सुद्धा लागले आहे."  नित्या थोडी घाबरत अन् चिडून म्हणाली.

" ती खोटं बोलत नाही."  मोठ्याने एक आवाज आला.

दोघी आजूबाजूला कोण बोलत आहे का, म्हणून बघत होत्या.

" वर बघा ss"  त्यांना मोठ्याने हसण्याचा आवाज आला.

जसे दोघींनी झाडाच्यावर बघितले, तसे त्यांना घामच फुटला.

मोठे केस आणि काळी साडी घातलेली विद्रूप चेहऱ्याची एक स्त्री झाडावर बसलेली त्यांना दिसली होती.

" बापरे! किती भयानक दिसत आहे. " नित्याला तर रडायलाच येत होते.

" हे बघा, तुमचा फॅन्सी कॉम्पिटिशन मधला रोल झाला असेल, तर उगाच आम्हाला घाबरवू नका." भक्तीला वाटलं कोणीतरी गावातील स्त्री मुद्दाम त्यांची मस्करी करत आहे, म्हणून ती म्हणाली.

" तुला खरं वाटत नाहीये?"  गडगडाटी हसत झाडाच्या फांदीवर बसलेली ती दूर होऊन जेव्हा उडायला लागली, तेव्हा मात्र दोघींना खरे काय ते समजले.

" कोण आहात तुम्ही?"  भक्ती सुद्धा आता घाबरली होती म्हणून तिने हिंमत करून विचारले.

" हे झाड माझे घर आहे आणि तुम्ही या झाडाखाली तुमची गाडी लावली आहे. माझ्या जागेत कोणी स्वतःची मनमानी केली, तर मी ती खपवून घेत नाही." असे म्हणून झाडाची पाने जोरात तिने त्यांच्या अंगावर झाड हलवून पाडली.

" आम्ही थोडीच जास्त वेळासाठी इथे थांबणार होतो. फक्त स्कुटीच तर इथे लावली होती आणि आता आम्ही निघतच होतो. "  भक्ती म्हणाली.

" एकदा माझ्या जागेमध्ये कुणी आले, तर ते लोकं पुन्हा परत जात नाहीत."  असे म्हणून ती जोर जोरात हसायला लागली.

" आम्हाला माफ करा. आम्ही लगेच इथून निघतो, पुन्हा  इथे येणार पण नाही."  नित्या हात जोडत विनंती करत म्हणाली.

ती जशी तिच्याजवळ गेली तसे त्या स्त्रीचे भूत थोडेसे दूर झाले होते.

" या गावातील लोक सुद्धा मला घाबरतात, म्हणून बघा कोणीच तुम्हाला दिसत नाहीये. तुम्ही माझ्या घरामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. ती बघा हद्द आहे, तिथपर्यंतच लोक येऊ शकतात. त्याच्या आतमध्ये कोणी येऊ शकत नाही."

दोघींनी सुद्धा त्या झाडापासून एका ठिकाणी पांढऱ्या रंगाची खूण केलेली त्यांना दिसली.

" आता हे आम्हाला कसे समजणार की, आम्ही इथे यायला नको हवे होते? आम्ही इथे नवीन आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला माफ करा." भक्ती म्हणाली.

" नाही, तुम्ही आता इथे कायमचे अडकला आहात. मी तुम्हाला सोडणार नाही."  ती रागाने म्हणाली.

" हे बघा तुम्ही सांगाल ते करू, फक्त तुम्ही आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या."  नित्या विनंती करत म्हणाली.

" तुम्ही पत्रकार आहात ना, तर मी सांगेल ते तुम्हाला करायचे आहे."

दोघींनी सुद्धा लगेच आपली मान हलवून होकार दिला.

तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली आणि तसेच दोघींनी आपल्याजवळ असणाऱ्या एका वहीमध्ये ती सांगत होती तसं सर्व लिहून घेतले.

थोड्याच वेळाने भक्तीने नित्याला तिच्या हातातील रुद्राक्षाचे ब्रेसलेट काढायला सांगितले आणि ते जसे त्या भुताजवळ नेण्याचा प्रयत्न केला, तसे ती घाबरून  झाडावर चढली होती.

" ते दूर कर माझ्यापासून."  तेव्हा ती ओरडत म्हणाली.

भक्तीने नित्याला सोबत घेऊन इशाऱ्याने पटकन स्टॅन्ड काढायला लावला, तर तो स्टॅन्ड निघणार की नाही; अशी भीती वाटत असतानाच तो स्टॅन्ड ह्यावेळी निघाला.
पुन्हा इशाऱ्यानेच भक्तीने निघताना त्या रेषेच्या बाहेर जायला सांगितले.

स्टॅन्ड काढला, तसे तिचे भूत पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तिला ते रुद्राक्षाचे ब्रेसलेट पुन्हा समोर ठेवून दोघी सुद्धा त्या सीमारेषेच्या बाहेर पटकन गेल्या.

" तुमच्या सोबत जे झाले त्याबद्दल आम्हाला खरंच वाईटच वाटते, परंतु त्यामुळे तुम्ही इतरांना त्रास देऊ नका. आमच्यासारखे जे अनोळखी लोक असतात त्यांना काही माहीत नसते. ते मुद्दाम असे काही करत नाही आणि तुम्ही सांगितलेले काम आम्ही नक्कीच पूर्ण करू." असे म्हणून दोघी तिथून निघून गेल्या.

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली होती.

एका गरीब स्त्रीचा चोरीचा आळ घेतल्यामुळे काही गावकऱ्यांनी मिळून दगडफेक करून तिला जखमी केले होते. तसेच दगडफेक करून गावाबाहेर काढले होते आणि त्यात ती जखमी झाल्यामुळे, तिचा एका झाडाखाली मृत्यू झाला होता.

गावामध्ये असणारे राहते घर, तिला सोडावे लागले होते आणि म्हणूनच तिने त्या झाडाला आपले घर बनवलेले होते. ज्याला ती , " हे माझे घर आहे !" असे म्हणायची.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0