थोडं झुकलं तर..
©अनुप्रिया
“तू पुन्हा त्याची बाजू घेऊन बोललासच नां?”
मृणालने प्रश्न केला. कालच्या प्रसंगाचा ताण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. संध्याकाळची वेळ तरीही घरात हलकीशी शांतता पसरली होती.
“त्याच्यासाठी म्हणजे?”
चहाचा घोट घेत शार्दूलने मृणालकडे पाहत विचारलं.
“तुझा लहान भाऊ, साहिल.. प्रत्येक वेळी तो चूक करत राहतो, आणि झुकायचं मात्र तू.. कधीपर्यंत चालणार आहे हे?”
मृणालचा पारा चांगलाच चढला होता. चहाचा कप खाली ठेवत शार्दूल समजावणीच्या सुरात म्हणाला,
“आपण मोठे आहोत. लहानांना माफ करून आपण थोडा कमीपणा घेतला तर काय होईल? थोडं झुकलं तर काय फरक पडतो? झाड झुकतं म्हणून त्याची उंची कमी होत नाही, उलट त्याच्या सावलीत माणूस विसावतो नं?”
“फरक पडतो, शार्दूल.. प्रत्येक वेळी फक्त तूच झुकत राहिलास तर त्याला सवय होईल नां? जेव्हा तू एकदा झुकतोस, तेव्हा ठीक आहे; पण तू कायमच झुकत राहतोस आणि तो तुला गृहीत धरतो. तुझ्या अशा झुकण्यामुळे तो त्याचा गैरफायदा घेतो. इतकंही कळत नाहीये का तुला?”
“अगं नात्यांसाठी, प्रेमासाठी ते गरजेचं असतं ना? नाती सांभाळायची म्हटलं की, कोणालातरी किंबहुना मोठ्यांनाच कमीपणा घ्यावा लागतो. त्यामुळं चालायचंच.. मोठे आहोत आपण.. थोडं सहन करायचं..”
“अरे पण किती? नात्यांची गरज दोन्ही बाजूनी असायला हवी नां? जर नातं एकतर्फी प्रयत्नावर उभं असेल, तर ते किती दिवस टिकेल? नातं टिकवायला एकानं सतत वाकायचं, आणि दुसऱ्यानं मिरवायचं. हे प्रेम नाही, ही सवय आहे. सतत झुकण्यामुळे साहिलला सतत चुकण्याची सवय लागलीय. आणि दुसरं काय? ”
मृणालने शार्दूलकडे तीक्ष्ण नजरेने पाहत उत्तर दिलं. शार्दूल काहीच बोलला नाही. मृणालचं बोलणं त्याच्या मनात रेंगाळत होतं. लहानपणीच्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. लहानपणी साहिल कायम गोंधळ घालत असे. शार्दूलला त्रास देत असे आणि आई नेहमी म्हणायची,
“जाऊ देत.. साहिल लहान आहे. तू मोठा आहेस नां? तू समजुतीने वाग.. लहान भावंडं चुकलं तरी मोठ्यांनी माफ करावं. त्यांना समजून घ्यावं.”
आईच्या बोलण्यामुळे शार्दूल नेहमी साहिलसमोर झुकत राहिला. साहिल नेहमी चुका करत राहायचा आणि आईचं ऐकून शार्दूल साहिलला क्षमा करायचा. ‘मोठ्यांनी माफ करावं.’त्याच वाक्याचं ओझं तो आजही वाहत होता. साहिल लहान होता तोपर्यंत ठीक होतं पण आता दोघां भावंडांची लग्नं झाली. त्यांच्या बायका घरी आल्या तरी साहिलमध्ये काहीच फरक पडला नाही. उलट आता त्याची बायकोही त्यालाच साथ देऊ लागली. लहान आहोत म्हणून त्यांच्या सगळ्याच चुका पोटात घातल्या गेल्या पाहिजेत असंच तिला वाटू लागलं. जणू तो नियमच आहे, लहानांचा अधिकारच आहे असं त्यांना वाटू लागलं. घरात वरचेवर खटके उडू लागले म्हणून शार्दूल आणि मृणालने वेगळं राहण्याच्या निर्णय घेतला. दोन भावंडांनी त्यांचे वेगळे संसार थाटले. पण साहिल आणि नेहा यांच्या वागण्यात काही बदल झाला नाही. उलट रोज त्यांच्या नवीन काहीतरी भानगडी कानावर येऊ लागल्या. त्याच्या चुकीच्या व्यवहारामुळे शार्दूलला आर्थिक, मानसिक भुर्दंड भोगावा लागत होता.
दर रविवारी शार्दूलच्या घरी सगळं कुटुंब एकत्र यायचं. मोठा भाऊ म्हणून शार्दूल नेहमी सगळ्यांना सावरायचा, तर लहान साहिल कधी गोड बोलायचा, तर कधी उर्मट होऊन निघून जायचा. त्याचं वागणं अगदी बेभान वाऱ्यासारखं होतं.. कधी प्रेमळ, कधी अहंकारी.. त्या दिवशीही असंच झालं. साहिलने बोलता बोलता असाच काहीतरी टोमणा मारला,
“दादा, तू नेहमी मोठेपणा दाखवतोस. पण सगळं ठरवायचं अधिकार एकट्यालाच आहे का?”
शार्दूल गालातल्या गालात हसला.
“असं नाही रे साहिल, आपण एकत्र मिळवून ठरवूया.. तू पण ठरवू शकतोस नां? तुझं म्हणणं पटलं तर त्यानुसार जाऊयात.”
पण शार्दूलचं गालातल्या गालात हसणं साहिलला चिडवून गेलं. तो संतापून म्हणाला,
“नेहमी तूच झुकतोस असं दाखवून माझी लाज काढतोस. खरंतर तुला माझा कमीपणा दाखवायचा असतो. बरोबर नां? मी कसा मूर्ख आहे आणि तू कसा समजूतदार हेच साऱ्या नातेवाईकांना तुला दाखवायचंय नां?”
त्यावर शार्दूल काहीच न बोलता गप्प बसला. साहिल रागाने उठून गेला. साहिलच्या वागण्याने मृणाल मात्र खूप दुखावली गेली होती. सगळे तिच्या नवऱ्याला, शार्दूलला तो मोठा आहे म्हणून समजुतीने वागण्याचे सल्ले देत असतं पण साहिलला कोणीच काही बोलत नव्हतं. सासूबाईही साहिल आणि नेहाला काहीही न बोलता शांत बसून असायच्या. नेहा जरी चुकली तरी तिला पाठीशी घालायच्या आणि म्हणायच्या,
“मृणाल, तू घरची मोठी सून आहेस. नेहा लहान आहे. तुझ्याकडे पाहूनच ती सगळं शिकणार नां? तू चुकीची वागलीस तर तीही तेच करेल. तू तिला समजून घे.. सासूसासऱ्यांच्या नंतर तुम्हीच घरातले मोठे वडिलधारी आहात. शेंडेफळ आहेत ते.. थोडं झुकतं माप त्यांना दिलं तर तुमचं काय बिघडणार नाही नां?”
मृणालला सगळं आठवत होतं. तिच्या डोळ्यात नाराजी होती.
“तू पुन्हा त्याच्यासाठी शांत राहिलास.”
शार्दूल थोडं थकलेल्या आवाजात म्हणाला,
“सोड नं मृणाल, लहान आहे तो.. अजून वागण्याबोलण्याची समज नाहीये त्याला. आपणच समजून घ्यायला हवं..”
“प्रत्येक वेळी झुकलास की त्याला वाटतं तू नेहमीच झुकशील. तुझ्या शांततेचं त्याला प्रेम वाटत नाही अरे.. ती त्याला तुझी कमजोरी वाटते.”
मृणाल जरा स्पष्टच म्हणाली.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा