थोडं तुझं थोडं माझं : भाग १

नवरा बायकोच्या नात्याची अनोखी गोष्ट!
"समजता कोणं तुम्ही स्वतःला? माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये" एक मोठा आवाज त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये घुमायला लागला आणि  हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाने वेधले.

"मनस्वी शांत होऽऽ कायं झालं?" हॉलमध्ये दुसर्‍या कोपर्‍यात उभा असलेला एक पुरुष तिच्याजवळ आला आणि तिला शांत करायला लागला.

"अरे अबीर कशी शांत होऊ मी? हे लोक पुन्हा तुझ्याबद्दल बोलतं आहेत. मला ते सहन होतं नाही तुला माहीत आहे नाऽऽ" त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यात आलेले अश्रू त्याला दिसले.

"शांत होऽऽ" तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करत तो एका कोपर्‍यात घेऊन गेला.

आजूबाजूच्या सगळ्या नजरा आता त्या दोघांकडे एकटक पाहायला लागल्या होत्या.

*******

ती म्हणजेच मनस्वी.. एक सुप्रसिद्ध लेखिका
साधी, सोज्वळ दिसायला अगदी सुंदर आणि बोलायला लाघवी अशी फक्त त्याच्याबद्दल कोणी काही बोलले की तिचा पारा चढायचा.

आज तिच्याच एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता आणि नेमकं त्याच्याबद्दल कोणीतरी काही बोलले तसा तिचा रागाचा पारा चढला पुन्हा.

तो म्हणजेच अबीर.. तिचा नवरा उंचापुरा श्वेत कांतीचा देह
त्याचे ते निळेशार डोळे कोणालाही वेड लावतील असेच होते.

मनस्वी देखील पहिल्यांदा त्याला पाहून त्या गहिवरलेल्या डोळ्यात तर हरवली होती. त्यांच्या प्रेमाची गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठी अगदी कुतूहलाचा विषय होता.

आत्ताही तो तिला शांत करताना हॉलमध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती त्या दोघांकडे पाहून काहीतरी कुजबूजतं होता.

"ताई माफ करा आमच्याकडून चूक झाली." मगाशी ज्या व्यक्तीने प्रश्न विचारला तो व्यक्ती आता मनस्वी आणि अबीर समोर येऊन उभा होता आणि त्यांची माफी मागत होता. त्या व्यक्ती बरोबर त्या कार्यक्रमाचे आयोजक देखील उपस्थित होते.

"मनस्वी मॅडम माफ करा त्यांना. आपला आत्तापर्यंत प्रकाशनाचा कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम भागाकडे वळूया का?

सर्व उपस्थित लोक तुमच्या पुस्तकाविषयी जाणून घ्यायला उत्सुक आहेत तुम्ही स्टेजवर या अशी मी तुम्हाला विनंती करतो." आयोजकांनी मनस्वीला अगदी आर्जव केली.

" मनू तू जा स्टेजवर. आजचा दिवस तुझा आहे आणि या अशा गोष्टी फार मनाला लावून घ्यायच्या नाहीत. बघं एकदा सगळीकडे ही गर्दी तुझ्यासाठी आहे आज इथे." अबीरने मनस्वीला समजावले तशी ती त्याच्याकडे पाहून गोड हसली आणि स्टेजवर गेली.

अबीर पुन्हा येऊन हॉलमध्ये असलेल्या पहिल्या रांगेतील खुर्चीवर येऊन बसला. उपस्थित असलेल्या काही लोकांच्या नजरा मात्र एकदा स्टेजवर असलेल्या तिच्यावर तर एकदा त्याच्यावर रोखल्या गेल्या होत्या.

तिने माईक हातात घेतला आणि नेहमीच्या अंदाजात,
"माझ्या प्रिय वाचकांनोऽऽ" म्हणतं बोलायला सुरुवात केली. जवळपास पुढचा अर्धा तास ती तिच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलत होती आणि हॉलमध्ये असलेले सगळे जण अगदी शांतपणे ऐकत होते.

तिचे बोलणे संपले तसा हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पुन्हा एकदा आयोजकांनी तिचे आभार मानले. हॉलमध्ये असलेली गर्दी आता स्टेजच्या दिशेने तिच्या एका सहीसाठी धाव घेऊ लागली.

ती अगदी शांतपणे सर्वांना सही देत होती, त्यांच्याशी प्रेमाने बोलत होती.
आता हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. ती स्टेजवर आता एकटीच उभी होती तसे तिने आयोजकांकडून पुन्हा एकदा माईक घेतला हातात तेव्हा आयोजक थोडे गोंधळले. तिने अबीरला स्टेजवर बोलावले, तेव्हा तो देखील थोडा चकित झाला.

'हिच्या डोक्यात कायं चालू आहे?' असे विचार त्याच्या मनात येऊन गेला. तो स्टेजवर तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला तसे मनस्वीने शांतपणे एकदा त्याच्याकडे आणि नंतर उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहिले.
आता तिची नजर हॉलमध्ये एका व्यक्तीवर खिळून राहिली होती. हा तोच व्यक्ती होता ज्याने मगाशी मनस्वीला प्रश्न विचारून तिच्या रागाचा पारा चढवला होता.

तो आता जरा गांगरून गेला आणि त्याने खाली मान घातली.

"नमस्कार..मला माहीत आहे आत्ता काही वेळापूर्वीच मी एवढे बोलून झाल्यावर देखील पुन्हा हातात हा माईक कशासाठी? हा प्रश्न तुम्हाला काय पण आयोजकांना देखील पडला असेल नाही का? पण फार वेळ घेणार नाही आणि बोअर नाही करणार अजिबात तुम्हाला" मनस्वीने असे म्हणून एकदा आयोजकांकडे पाहिले तेव्हा ते किंचितसे हसले आणि तिच्या मिश्किल बोलण्यावर उपस्थितांच्या गालांवर देखील हसू फुललं होतं.


"आजपर्यंत लेखिका म्हणून मी सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्ही वाचकांनी मला खूप प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे पण लेखिका असल्यामुळे सोबत जी प्रसिद्धी मिळाली ती कधी कधी तुम्हाला खूप त्रासदायक ही वाटू लागते.

मगाशी जो काही प्रसंग घडला त्याबद्दल मला बोलायचे आहे. आजपर्यंत मला तुम्ही इतके रागात असे पाहिले नसेल कधी त्यामुळे माझ्या नेहमीच्या वाचकांपैकी जे वाचक इथे उपस्थित आहेत आज ते थोडे गोंधळले आहेत, मगाशी सही घेताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला गोंधळ मला जाणवला म्हणून म्हटलं आज सगळ्यांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि शंकाही दूर कराव्यात. " मनस्वीने एवढे बोलून हॉलमध्ये एक कटाक्ष टाकला.

"मनू नको राहू दे हे सगळे कशासाठी?" अबीरने तिला हळूच विचारले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. आज तिला अबीरही थांबवू शकत नव्हता.

क्रमशः

नक्की कशाबद्दल बोलायचे आहे मनस्वीला? कोणाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तिला? नक्की असे कायं घडले ज्यामुळे तिला राग आला हे सगळे जाणून घेऊया कथेच्या पुढच्या भागात.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all