थोडं तुझं थोडं माझं : भाग २

नवरा बायकोच्या नात्याची अनोखी गोष्ट!
"सर्वप्रथम मला हे आवर्जून सांगायचे आहे की लेखिका म्हणून मी प्रसिद्ध असले तरीही माझं आयुष्य म्हणजे तुमच्यासाठी चर्चेचा विषय नाही ठरू शकतं आणि जेव्हा तुम्ही मिडियामधून असता तेव्हा तर हे भान असायलाचं हवं कमीतकमी." मनस्वीचा बोलताना पूर्ण रोख हा त्या व्यक्तीकडे होता ज्याने मगाशी प्रश्न विचारला होता.

"ताई मला माफ करा पुन्हा एकदा माफी मागतो मी तुमची." तो व्यक्ती पुढे येऊन पुन्हा मनस्वीची माफी मागायला लागला.

"हे बघा तुम्ही माफी मागावी किंवा तुम्हाला सगळ्यांसमोर अपमानित करावं असा माझा कुठलाही उद्देश नाहीये पण माझं लग्न झाल्यापासून गेले वर्षभर लोकांच्या त्या प्रश्नांनी भरलेल्या नजरा पाहिल्या आहेत मी अगदीच... मला प्रश्नांचे वाईट वाटत नाही पण प्रत्येक वेळी अबीरला जे कमी लेखले जाते त्याचा मात्र मला खूप त्रास होतो.

तो काहीच बोलत नाही आणि त्याला याविषयी बोलायचे नसते कारण तो फार कोणाचे बोलणे मनावर नाही घेत मला मात्र खूप वाईट वाटतं या सगळ्याचं आणि म्हणूनच आज पहिल्यांदाच मी आमच्या लग्नाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करणार आहे इथे." मनस्वी अजून काही बोलणार इतक्यात अबीरने तिच्या हातातला माईक काढून घेतला.

"मनू नको या सगळ्याची काहीही गरज नाहीये." त्याने हळू आवाजात तिला दटावले पण आज तिने मनाशी ठाम निर्धारच केला होता जणू. तिने त्याच्या हातातून माईक काढून घेतला.

"मी लेखिका आहे. लिहिणं हा माझा छंद आहे, लेखिका म्हणून मी, माझं आयुष्य सगळ्यांसाठी चर्चेचा विषय असतो कायम अर्थात ते साहजिकच आहे परंतु एक व्यक्ती म्हणून मला माझं वैयक्तिक आयुष्य नाही असा अर्थ होतं नाही ना‌ त्याचा.

मी लेखिका म्हणून आणि व्यक्ती म्हणून काही अंशी भिन्न आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार बोलायला नाही आवडतं पण आज गरज वाटतेय त्याची म्हणून बोलतेय मी.

गेल्यावर्षी मी लग्न केले आणि मिडियामध्ये सलग आठवडाभर माझं लग्न म्हणजे रहस्य आणि चर्चेचा विषय ठरला होता कारण कायं तर एका लेखिकेने एका सामान्य कंपनीत काम करणाऱ्या तरूणाशी केलेले लग्न.

माझ्या लिखाणावर प्रेम करणार्‍या कितीतरी वाचकांनी मला पत्र लिहिले, मला लग्नासाठी विचारलेले कित्येक वाचक नाराज होते माझ्यावर, पण कधी कधी कायं होते पूर्ण सत्य न जाणून घेता आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल अगदी सहजपणे आपले मत मांडून मोकळे होतो. मत मांडायला ना नाही माझी पण समोरच्या व्यक्तीची ही काही बाजू असू शकते हे जाणून घ्यायला हवं." मनस्वीने एक पॉज घेतला आणि उपस्थितांकडे पाहून एक कटाक्ष दिला तेव्हा आता तिला प्रत्येकजण तिचे बोलणे ऐकण्यासाठी आतुर असलेला दिसला.

"अबीर, माझा नवरा एका सामान्य कंपनीत काम करतो आणि मी एक प्रसिद्ध लेखिका असताना त्याच्याशी लग्न का केले? हा प्रश्न मला आजपर्यंत कित्येक जणांच्या डोळ्यात दिसला आहे.

अबीरला मी माझ्या कॉलेजपासून ओळखते आणि आत्तापर्यंत मी हे सांगितले नव्हते कुठेही पण माझ्यातील सुप्त लेखिकेला बाहेर काढणारा व्यक्ती म्हणजे माझा नवरा अबीर आहे.

जेव्हा मी लेखिका होण्याचे स्वप्न पाहत होते त्यावेळी एका क्षणी माझे घरचेही थोडे विरोधात होते अगदी साहजिक होते त्यांचे कारण लेखिका होऊन पोट भरत नाही पण त्यावेळी माझ्या द्विधा मनाला अबीरने कणखर व्हायला भाग पाडले.

'खूप कमी जणांना वरदान लाभते तु लिहित रहा कायम' हे सांगून आजपर्यंत अबीर मला कायम प्रोत्साहन देत गेला.

कॉलेज झाल्यावर जिथे सगळे मित्र मैत्रीणी स्वतःच्या पायावर उभे होते तिथे मी मात्र अजूनही माझ्या घरच्यांवर अवलंबून होते., लेखिका व्हायचं निश्चित होतं पण मार्ग नव्हता मिळत त्यावेळी, खूप निराशा यायची आपण काहीच कमवत नाही याची पण अबीरने त्या प्रत्येक क्षणी मला साथ दिली, मला पुढे जायला प्रोत्साहन दिले.

आमचे एकमेकांवर प्रेम होतं आणि मला त्याच्याशी लग्न करायचे होतं पण अबीरने माझ्या लिखाणावरचे प्रेम पाहून 'अगोदर तुझं स्वप्न पूर्ण करायचं आणि मगं आपण लग्न करायचं' असं अगदी निक्षून सांगितलं त्यावेळी आणि म्हणूनच आज ही लेखिका तुमच्या समोर उभी आहे.

आपण कायमच समाजात स्त्रीचे कौतुक करतो, एका यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते हे आपण कायम किती कौतुकाने बोलतो मगं त्याचवेळी एखाद्या यशस्वी स्त्री मागे एखादा पुरुष असू शकतो हे का आपण मानत नाही?

मला मान्य आहे समाजात असे पुरूष खूप कमी आहेत पण जे आहेत त्यांचे तरी कुठे कौतुक केले जाते? उलट अशा पुरूषांना समाज कायम हिणवतो यशस्वी स्त्रीचा आधार घेतला म्हणून? " मनस्वीचा प्रश्न ऐकून कित्येक नजरा आज विस्फारलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होत्या पण हे बोलताना तिचा स्वर मात्र गहिवरला होता.

क्रमशः

मनस्वी अजून कायं बोलणार आहे पुढे? अबीरचे यावर काही म्हणणे असेल का? पाहूया कथेच्या पुढच्या भागात

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all