थोडं तुझं थोडं माझं : भाग ३ (अंतिम भाग)

नवरा बायकोच्या नात्याची अनोखी गोष्ट!
अबीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला डोळ्यांनी आश्वस्त केले.
"मला अबीरचा कायम खूप हेवा वाटतो. लोकांना खरंतर वाटतं की अबीरला माझ्यासारखी प्रसिद्ध बायको मिळाली हे त्याचं भाग्य पण खरंतर मी किती भाग्यवान आहे हे मला ठाऊक आहे.

लेखिका म्हणून मी काही हल्ली मुली कमावतात तितके नाही कमावत पण अबीरने मला त्यावरून कधी ऐकवले नाही. एखाद्या वेळी पुस्तक चालते एखाद्या वेळी नाही. माझ्या सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाने म्हणावी तशी कमाई नाही झाली. मला एकवेळ वाटतं त्या क्षणी लिखाण सोडावं पण अशावेळी अबीर मला धीर देतो.

घराची सगळी जबाबदारी तर तो घेतोच पण काही कमी जास्त लागलं तर माझ्या आई वडीलांंकडे सुद्धा पाहतो. तो कायम सोबत असतो म्हणून मी आज लिहू शकते अगदी बिनधास्तपणे. स्वप्नांना नवे पंख देणारे अबीर सारखे नवरे खूप क्वचित आहेत या समाजात. मला अभिमान आहे अबीर सारखा नवरा माझ्या आयुष्यात आहे." मनस्वी एवढे बोलून थांबली तसा हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. उपस्थितीत असलेल्या काही लोकांच्या नजरेत आता अबीर बद्दल कौतुक दिसायला लागले होते जे पाहून मनस्वी खूप आनंदी झाली.

"मनस्वी ताई तुम्ही खूप छान बोलला खरंतर याची गरज होती असं वाटतयं पण मला अबीर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे तुमची हरकत नसेल तर?" उपस्थित असलेल्या मीडियापैकी एकाने प्रश्न विचारला.

"माझी काही हरकत का असेल उत्तर द्यायचे की नाही हा सर्वस्वी अबीरचा प्रश्न आहे." मनस्वीने अबीरकडे पाहिले तसे अबीरने तिच्या हातातला माईक स्वतःकडे घेतला.

"अबीर सर आपण कायम पाहतो की स्त्री पुढे गेली की पुरूषांना नाही आवडतं त्यांचा अहंकार दुखावला जातो म्हणजे तुम्हाला जग एका प्रसिद्ध लेखिकेचा नवरा म्हणून ओळखते याचा तुम्हाला राग नाही का येतं? तुमचा स्वाभिमान नाही का दुखावला जातं यामुळे?" हा प्रश्न ऐकून उपस्थित लोक आणि मनस्वी देखील आता अबीर कायं उत्तर देतोय हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहू लागली.

अबीर किंचितसा हसला.
"कायं बोलायचं यावर... मी काही माझ्या बायकोसारखा लेखक वगैरे नाही त्यामुळे काही चुकीचं बोललं जाईल तर पहिल्यांदाच माफी मागतो सर्वांची" अबीरच्या बोलण्याने हॉलमध्ये एकच हशा पिकला.

"हो मला प्रसिद्ध लेखिका मनस्वी यांचा नवरा म्हणून ओळखले जाते खरं पण मला त्यात काहीच गैर वाटतं नाही खरं सांगायचं तर. आता मनस्वीने जे काही सांगितले काही वेळापूर्वी त्यावरून तुम्ही लोक मला खूप महान वगैरे समजू नका किंवा कौतुकाची फुले उधळू नका आणि हो वर्तमानपत्रात तर अजिबात काहीही लिहायचे नाही माझ्याबद्दल कौतुक वगैरे मला जाम कंटाळा येतो वर्तमानपत्र वाचायचा." पुन्हा एकदा सगळे हसले त्याच्या बोलण्यावर. मनस्वी मात्र कौतुकाने  तिच्या नवर्‍याकडे पाहत होती.

"मी असाच आहे अगदी पहिल्यापासून. माझी आयुष्यात फार मोठी स्वप्न नव्हती पण मी मनस्वीच्या डोळ्यात कायम स्वप्न पाहिलं मोठं होण्याचं आणि मला तिचा खूप हेवा वाटायचा अगदी पहिल्या भेटीपासूनच.
हे खरंय की पुरूषी अहंकार कुठेतरी दुखावला जातो म्हणतात मला तर काही लोकांनी 'मी पुरूष नाहीच मुळी' अशीही पदवी दिली हरकत नाही मला कोणाच्या बोलण्याने फरक पडत नाही तितकासा.

संसार हा दोन व्यक्तींचा असतो. जबाबदारी दोघांची असते. हल्ली हे मात्र पहायला मिळते की दोघेही कमावतात त्यामुळे नात्यात 'मी' पणा येऊ लागला आहे कुठेतरी जे चुकीचे आहे. मुळात एखादं नातं म्हटलं की त्यात 'मी' पणा येतंच नसतो मुळी कारण नातं हे त्या दोन व्यक्तींचे असते.

आता याच जागी जर मी असतो आणि मनस्वी एक सामान्य स्त्री तर तिथे लोकांना प्रश्न नसते पडले एवढे हेच दुर्दैव आहे आपल्या समाजाचे. एक स्त्री वरचढ ठरली की समाजाला ते पटत नाही. मला हे कळत नाही की एखादी स्त्री जर का पुरूषाला यशस्वी होताना पाहू शकते, त्याला प्रोत्साहन देऊ शकते तर मग एका पुरूषाने हे केले त्यात वावगे का ठरावे?

मला मनस्वीच्या नावाने ओळख मिळते यात अभिमान वाटतो. जर एक स्त्री लग्नानंतर तुमचे नाव तिच्या नावापुढे लावू शकते तर एखाद्या पुरुषाला त्याच्या बायकोमुळे ओळख मिळाली तर बिघडलं कुठे?

नवरा बायकोच्या नात्यात प्रेमाबरोबर एकमेकांबद्दल आदर असायला हवा व्यक्ती म्हणून आणि खरं सांगायचं तर मला 'कोणी पुरूष नाही मी', हे म्हटल्यावर अजिबात दुःख होतं नाही कारण संसारात दोघांनी थोडं थोडं द्यायचं असतं.

आमच्या नात्यात मनस्वी मला ओळख देतेय आणि मी तिला प्रोत्साहन देतो इतकं सोप्पं आहे हे.  माझी बायको यशस्वी आहे यामुळे माझा स्वाभिमान कुठेही दुखावला जात नाही उलट मला अभिमान आहे मनस्वी माझी बायको आहे याचा." अबीर एवढे बोलून थांबला आणि आज तिथे उपस्थित असलेल्या सर्वांची नजर फक्त आणि फक्त त्याच्यावर होती.

इतके दिवस कुतूहलाचा विषय ठरलेला तो आज मात्र कौतुकाचा विषय ठरला होता सर्वांसाठी.

मनस्वीच्या नजरेत त्याच्याबद्दल असलेला आदर वाढला होता अजूनच.

                      *समाप्त*

"संसारात एकट्याचं असं काही नसतं. संसार हा दोघांचा असतो, 'त्यात थोडं तुझं थोडं माझं', असं असलं की त्या नात्याला अजून बहर येतो."

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all