थोडं त्याला ही समजून घ्या हो... १

मनोगत त्याचे
थोडं त्याला ही समजून घ्या हो……..

नारायणराव रात्रीचे जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी घरा बाहेर पडले. जेवायची तशी त्यांची काहीच इच्छा नव्हती, पण मन मारून त्यांनी पाण्याच्या मदतीने दोन घास पोटात ढकलले होते. संध्याकाळपासून त्यांचे कशातच लक्ष लागत नव्हते. त्यांच्या डोक्यात तेच तेच शब्द फिरत होते, 'आई बाबांची सोय वृद्धाश्रमात करूया.' ते पायी चालत होते, कोणीकडे जात होते, त्यांचे कुठेच लक्ष नव्हते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते आणि डोळ्यात अश्रू दाटले होते. भरल्या डोळ्यांनी पाय नेतील तिकडे जात होते.

नारायणराव, घरची परिस्थिती साधारण, स्वभावाने एकदम कडक, नियमबद्ध. काही गोष्टी ज्या ठरल्या आहेत त्या तश्याच व्हायला हव्या, हा त्यांचा हट्टाहस. त्यांना साथ दिली ती त्यांची पत्नी सविता, त्यांची पण सगळीकडे बारीक नजर. नारायणराव सविता यांचा एकुलता एक मुलगा मुकुंदा, कडेकोट शिस्तीत वाढलेला. यांची शिस्त, मुकुंदाला मात्र जाच वाटायचा. बऱ्याच इच्छा , मन मारावे लागायचे. पण आई वडिलांपुढे बोलायची हिम्मत नव्हती. मुकुंदा शिकून इंजिनिअर झाला. चांगल्या पगाराची नौकरी मिळाली. त्याला अनुरूप मुलगी बघून लग्न झाले. माधवी सुद्धा मुकुंदाच्या बरोबरीने नोकरी करत होती, घराला हातभार लावत होती.

मुकुंदा माधवीच्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गोडगुलाबी गेले. पण नंतर हळूहळू घरातील वातावरण बिघडायला सुरुवात झाली. नारायणराव-सविता यांच्या मुलगा आणि सून यांच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या होत्या. तश्याच काही अपेक्षा मुकुंदा आणि माधवीच्या सुद्धा यांच्याकडून होत्या. सासू सूनामधल्या कुरबुरी, तक्रारी वाढल्या होत्या. माधवी नवीन विचारांची मुलगी, बरेचदा ही नवीन पिढी प्रॅक्टिकल विचारांनी वागणारी. त्यामुळे तिला मोठ्यांसोबत ताळमेळ बसवणे कठीण जात होते. अती शिस्त, रीतिभाती, नियमांमुळे माधवीला घर आणि ऑफिस सांभाळणं आता कठीण आणि त्रासदायक होऊ लागले होते. त्यामुळे माधवी आणि मुकुंदामध्ये वाद व्हायला लागले होते. घरात रुसवे फुगवे वाढले होते. साध्याच, छोट्या कुरबुरी आता मोठे रूप घेऊ बघत होते.

मुकुंदा माधवीच्या संसारवेलीवर दोन फुलं उमलली, आणि त्यांचा परिवार पूर्ण झाला. पण आता जबाबदारी, खर्च, कामं, सगळंच वाढले होते. सोबतच आता वादांचे प्रमाण पण वाढले होते. मुकुंदा माधवीला त्यांच्या संसाराच्या प्रत्येक गोष्टीत आई वडिलांचे डोकावणे नकोसे वाटू लागले होते. आई वडिलांना पण माधवी मुकुंदाचे नवीन विचार पटत नव्हते. आणि अशातच आज माधवी आणि मुकुंदाने आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायच्या गोष्टी केल्या होत्या. तेच नारायणरावांच्या मनाला खूप लागले होते.

नारायणराव आपल्याच विचारात चालत होते . मुकुंदाच्या जन्मापासून ते आतापर्यंतचे सगळे त्यांच्या डोळ्यांपुढे जसेच्या तसे सरकू लागले होते.

"धडाssssम!" एक जोरदार आवाज झाला.

नारायणरावांनी आवाजाच्या दिशेने बघितले तर एक बाईक रस्त्यावरून घसरत होती. आजूबाजूची लोकं धावत पळत तिथे जमत होती. ते सुद्धा काळजीने तिथे गेले. बघितले तर एक पस्तीस - चाळीशीतला तरुण जमिनीवर पडला होता.

"हेल्मेट की वजहसे छोरे का सीर बचा हैं. कौनसा धुंदीमे गाडी चलातारे तुम लोग? घरमें बिवी बच्चे, बुढे मा बाप राह देखते रहते." एक तृतीयपंथी त्याला उचलत बडबड करत होता. परिवार काय असतो, त्याच्या बोलण्यातून ती कळकळ जाणवत होती.

क्रमशः...


©️®️ मेघा अमोल

🎭 Series Post

View all