थोडं त्याला ही समजून घ्या हो.... अंतिम

परिवार एकेमकांना समजून घेण्यासाठी असतो
"काका हे सगळं मी माझ्यासाठी करतोय का हो? आईवडिलांचे औषधपाणी, मुलांचे भविष्य यासाठीच करतोय ना सगळं? लहानपणी शाळेतून घरी यायचो तर आईंला लगेच कळत की काहीतरी बिनसले आहे. न सांगता ओळखायची ती.. आता सांगून पण ऐकत नाहीये. बाबांकडे कधी हट्ट करायचो, तर कधीकधी बाबा ते उपयोगाचे नाही म्हणून रागवायचे.. ऐकायचो ना मी. आता तेच हट्टपणा करतात. डोळे बघून आधी बायको काहीतरी दुःख झालेय समजून जात, आणि लगेच मिठीत घ्यायची. आता डोळ्यातले पाणी सुद्धा दिसत नाही. कड पलटून झोपून जाते. त्यात माझी चिमुकली हिरमुसते. सगळी वादावादी सुरू असली की बिचारी कोपऱ्यात जाऊन बसते. तिला असे रडवलेले बघावल्या जात नाही. पिल्लू म्हणतो बाबा तूला माझ्यासोबत खेळायला वेळच नाही.

" तुम्हाला एक गंमत सांगतो, सगळे जेव्हा एकेमकांची कंप्लेंट करतात, सगळ्यांचेच बरोबर असते. आई सांगते ते पण बरोबर असते, बायको म्हणते तिचे पण पटते. मग चुकतं कोणाचं, कळतच नाही. आणि सगळ्यांचे माझ्यावरच फार प्रेम आहे..हा.." तो एकदम हसत म्हणाला.

"एकीकडे माझे जन्मदाते, ज्यांनी माझ्या आयुष्यासाठी त्यांचे आयुष्य खर्ची केले, मला आयुष्य जगायला शिकवले. दुसरी माझी जीवनसंगिणी, माझ्या विश्वासाने, आपले आयुष्य माझ्या स्वाधीन करत माझा हात धरून घरात आली. सगळेच माझे आहेत हो, मी कोणालाच सोडू शकत नाही . मला सगळे माझ्या सोबत हवे आहे. खूप प्रयत्न करतोय, पण आयुष्याचा बॅलेन्स बिघडतच जातोय. कुणाच्याच अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाहीये. लग्न आधी सगळंच छान चालले होते. आता काय बिघडले आहे, काहीच कळत नाहीये. हरलोय हो काका. पुरुष आहो ना, पुरुषाला रडता पण येत नाही." तो खिन्नपणे हसत म्हणाला.

"रोज १७km येणे १७ km जाणे, पाठ दुखत होती, मान अकडत होती तर किती वर्षापासून कार घ्यावी म्हणत होतो तर आता ही पण तुटली." तो तुटलेल्या बाईकचे बघत म्हणाला.

"अजून पूर्णपणे तुटलो नाही. बघुया कुठ पर्यंत पुरतो.. येतो काका." म्हणत तुटलेल्या बाईकचे एक एक सामान गोळा करत होता. तो एकटाच पायीच चालत चालत निघाला.

तो दिसेनासा झाला आणि नारायणराव मागे फिरले. त्यांना खूप गोष्टींचे आकलन झाले होते. ते भराभर पावले टाकत घराकडे निघाले होते.

"बाबा, अहो इकडे काय करतात आहे तुम्ही? किती शोधायचं तुम्हाला? प्राण कंठाशी आले होते. बसा गाडीवर पटकन. सगळे तुमची वाट बघत आहेत." नारायणरावांची सूनबाई माधवी तिची स्कूटर घेऊन पुढे उभी होती. तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ते किंचित हसले आणि तिच्या पाठीमागे गाडीवर बसले.

माधवी दहाच मिनिटात घरी पोहचली.

"अहो असे अचानक कुठे गेले होते? पोरं किती घाबरली होती. दोन तासापासून तुम्हाला शोधत आहेत." सविताताई देवाजवळ नमस्कार करत त्यांच्याजवळ आल्या.

"ते असेच, थोडा रस्ता भरकटलो होतो. आता सगळं स्पष्ट झाले आहे." नारायणराव प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले.

"माधवी, बाबांचा काही पत्ता लागत नाही आहे. त्यांच्या सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो. आता पोलीस स्टेशन.." बोलता बोलता मुकुंदा आतमध्ये आला तर समोर खुर्चीत बाबा बसलेले दिसले.

"अहो बाबा कुठे गेले होतात? ही अशी कशी शतपावली म्हणायची तुमची? इथे रस्त्यावर किती विचित्र घटना घडत असतात.. असे रात्रीचे कशाला बाहेर पडतात?" ते अचानक गायब झालेले बघून घाबराघुबरा मुकुंदा त्यांना स्पष्ट दिसत होता. त्यांच्या काळजीने व्याकूळ झालेला त्यांचा परिवार दिसत होता.

"आता रात्रीचे एकट्याने अजिबात घराच्या बाहेर पडायचे नाही. शतपावली इथल्या इथे करायची. घराबाहेर जायच्या आधी कुठे जात आहात, सांगून जयाचे." माधवीच्या सूचना देणे सुरू झाले.

"अग ए सासरे आहेत ना तुझे, हे असे बोलणे शोभते काय?" सविताताई सुरू झाल्या.

नारायणराव मात्र हसत त्यांच्याकडे बघत होते.

********
समाप्त..

©️®️ मेघा अमोल

🎭 Series Post

View all