"हर्षल उठ नाsss अरे नऊ वाजले आहेत अजून किती वेळ झोपणार आहेस तू?"
"तन्वी अगं झोपू दे ना जरावेळ असेही आज सुट्टी आहे." एवढे बोलून हर्षल पुन्हा डोक्यावर ब्लँकेट घेऊन पहुडला.
"हर्षल अरे झोपू दे म्हणून कायं लावलं आहेस? सकाळचे नऊ वाजले आहेत. गुरूवार पासून दिवाळी सुरू होत आहे केवढी कामे पडली आहेत, उठं बरं लवकर" असे म्हणत तन्वीने हर्षलच्या डोक्यावरचे ब्लँकेट ओढून काढले.
" कायं यार तन्वी? दिवस आहे ना अजून जरावेळ झोपू दे." हर्षल डोळे चोळत बोलू लागला.
" हर्षल अजिबात नाही हं.. अरे एकतर आज रविवार आहे तर डी मार्ट वगैरै किती गर्दी असते तूला ठाऊक आहे ना?
उठ लवकर चलss " तन्वी जवळ जवळ ओरडली तसा हर्षल बेडवर उठून बसला.
उठ लवकर चलss " तन्वी जवळ जवळ ओरडली तसा हर्षल बेडवर उठून बसला.
"अरे आता बेडवर बसू नकोस बरं चल आवर पट्कन " तन्वीने त्याच्या हातातील ब्लँकेट ओढून घेतले आणि ती त्याची घडी घालायला लागली.
" चहाss "हर्षल बाथरूममध्ये जाता जाता ओरडला तशी तन्वी बेडरूममधले आवरून किचनमध्ये गेली आणि चहा टाकला.
हर्षल त्याचे आवरून डायनिंग टेबलवर येऊन बसला तेवढ्यात तन्वीने त्याच्यासमोर येऊन चहा आणि बिस्कीटे ठेवली. स्वतःचा चहाचा कप टेबलवर ठेवून ती सोफ्यावर खेळत बसलेल्या पाच वर्षांच्या रियान जवळ जाऊन त्याला दूध पिण्यासाठी आग्रह करू लागली. त्याला बळजबरीने दूध पिऊ घालून ती डायनिंग टेबलवर येऊन बसली आणि चहाचा कप तिने तोंडाला लावला.
हर्षल न्यूज पेपर मध्ये डोके खूपसून बसला होता. तन्वीने हर्षलकडे पाहून एक कटाक्ष दिला.
"हर्षल आपण डी मार्टला दुपारी जाऊया ना जेवण करून?"
"ह्म्म" हर्षलने फक्त हुंकार भरला.
"आणि टेबलच्या ड्रॉवर मध्ये काही जूने बल्ब आहेत ते चेक करायला हवे रे नाहीत नवीन आणावे लागतील आकाशकंदील मध्ये लावण्यासाठी तू चेक करशील ना?"
"ह्म्म" हर्षलने न्यूज पेपर मधून डोके बाहेर काढायची तसदी देखील घेतली नाही ते पाहून तन्वीचा पारा चढला.
"अरे हर्षल मी काहीतरी बोलतेय तू निदान ऐकून तरी घे. "
" तन्वी अगं बातम्या तर पाहू दे. एकतर सुट्टीच्या दिवशी सकाळी सकाळी उठवून ठेवले आहे, जरा माणसाला सुखाने चहा तरी घेऊ दे." हर्षल न्यूज पेपर बाजूला सरकवून चहाचा घोट घेत बोलला.
"मी तूला चहा घेऊ नको बोलली आहे का? अरे आजचा एकच दिवस तर मिळतो आणि एवढी मोठी कामे पडली आहेत. उद्यापासून ऑफिस सुरू होईल मगं कसे जमेल सगळे म्हणून घाई करत होते मी. "तन्वीने तिचे म्हणणे समजावून सांगितले.
"अगं होईल सगळे तू नको लोड घेऊ. मला खूप भूक लागली आहे काहीतरी मस्त नाष्टा बनवं ना" हर्षलने फर्माईश केली.
" आई मला सँडविच हवे" हर्षलचे बोलणे पूर्ण होते तोपर्यंत रियानने त्याची मागणी तन्वीला सांगितली.
" रियान अरे सँडविच कालच दिले होते ना तूला टिफीन मध्ये मी पट्कन उपमा करते आज. "
" नाही आई मला उपमा नकोss " रियानने नाक मुरडले.
" हो ना तन्वी उपमा कायं अगं? काहीतरी चमचमीत.. मी कायं म्हणतो गरम गरम बटाटेवडे कर ना, वातावरण किती छान आहे अशा वातावरणात गरम बटाटे वडे खायला कायं मजा येईल. " हर्षल बाहेर पाहून स्वतःच्या कल्पना शक्तीवर खूश झाला.
" बटाटेवडे आत्ता? " तन्वीचे डोळे घड्याळावर जाऊन स्थिरावले.
" तन्वी बेटा काही करायची गरज नाही मी मस्त गरम गरम इडली, सांबार आणि डोसा घेऊन आलो आहे. " दरवाज्यातून आतमध्ये येत तन्वीचे सासरे उत्तरले.
" अरे आप्पा आज सकाळी सकाळी कुठे गेला होता तुम्ही आणि हे कायं आज एकदम बाहेरून नाष्टा वगैरे? " हर्षल त्याच्या वडिलांना विचारू लागला.
" अरे हो इथे जवळ दिवाळी निमित्त साफसफाई अभियान होते तिथे गेलो होतो आणि आज तन्वीला ही बाकी कामे आहेत दिवाळी आली आहे म्हणून म्हटलं तिचं काम हलकं कराव थोडं. "
" थँक्यू आप्पा " सासर्यांच्या हातातील बॅग घेऊन तन्वीने त्यांचे आभार मानले. सर्वांनी एकत्र बसून नाष्टा केला.
नाष्टा झाल्यावर तन्वी हॉलमध्ये आली तेव्हा हर्षल मोबाईल घेऊन बसला होता.
" हर्षल ऐक ना ह्या झाडूने एवढी बाल्कनी मधील वर वर असलेली जाळी साफ कर ना.. माझी अंघोळ झाली आहे आणि किचनमध्ये ही थोडे काम आहे मला" तन्वीने हर्षलच्या हातात झाडू दिला.
क्रमशः
©®ऋतुजा कुलकर्णी