"तन्वीss" असे म्हणून हर्षलने तिच्याकडे एक कटाक्ष दिला आणि त्याने कसेबसे नाखुशीने ती जाळी साफ केली आणि मोबाईल घेऊन तो पुन्हा सोफ्यावर पहुडला.
तन्वीची आपली किचन ते हॉल आणि हॉल ते बेडरूम अशी धावपळ सुरू होती. एव्हाना अकरा वाजत आले होते.
"हर्षल अरे अंघोळ उरकून घे ना आणि तुझ्यासोबत रियानला ही घेऊन जा बाथरूममध्ये " तन्वीने आवराआवर करता करता हर्षलला सूचना दिली तसा हर्षल "हो" म्हणून पुन्हा मोबाईल मध्ये गुंतला.
तन्वी देखील किचनमधली बाकीची कामे करण्यात व्यस्त होती. थोड्या वेळाने ती हॉलमध्ये आली तर हर्षल अजूनही सोफ्यावर मोबाईलवरून घेऊन हसत बसला होता.
" हर्षल अरे कायं हे?" तन्वी जोरात ओरडली.
"कायं तन्वी? एवढी का ओरडतेय तू?"
" अरे हर्षल मी तूला मगाशी किचनमध्ये जाताना सांगून गेलेले की तू अंघोळ उरकून घे आणि रियानला सोबत घेऊन जा पण तू अजूनही मोबाईल घेऊन बसला आहेस आणि हे कायं रियान कुठे गेलाय?
तू हॉलमध्ये होतास ना किमान त्याच्याकडे तरी लक्ष द्यायचे. अरे केवढा पसारा केला आहे त्याने आणि हे बघ कलर कसे फरशीवर सांडवले आहेत. मला आता पुन्हा फरशी पुसावी लागेल. "समोर पडलेला पसारा पाहून तन्वीची बडबड चालू होती.
" तन्वी तो आतमध्ये आप्पांसोबत त्यांच्या रूममध्ये गेला असेल आणि अगं लहान आहे तो. लहान मुलांना आपण सारखे हे नका करू ते नका करू असे सांगितले की मुलं हट्टी होत जातात जास्त एकतर किंवा ती कोडगी होऊन बसतात.
तू जरा तुझी चिडचिड कमी कर. घरात आपण दोघेच नाही तर आप्पा ही राहतात आपल्या बरोबर हे विसरू नकोस. " हर्षल आता वैतागून बोलला.
" हर्षल आप्पा आपल्या बरोबर राहतात हे माहित आहे आणि मी काहीही विसरले नाही पण मला वाटतयं बहूतेक तू विसरत चालला आहेस की दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. आजचा एकच दिवस आहे. मागच्या रविवारी आपण सुमन आत्याकडे गेलो त्यामुळे काहीच कामे झाली नाहीत घरातील, तूला लक्षात येत आहे का?
अरे अजून किराणा आणि इतर गोष्टी आणायच्या आहेत आणि कितीतरी कामे पेडिंग पडली आहेत पण तू सकाळी उठल्यापासून त्या मोबाईल वर बसला आहेस नुसता.
सकाळ पासून मी आपली किचन ते हॉल, हॉल ते बेडरूम एकटीच आवराआवर करत आहे. तूला घरातले काही करायचे नसेल तर कमीत कमी रियान कडे तरी लक्ष दे ना अरे. मी एकटी कुठे कुठे लक्ष देऊ? " तन्वी आता चांगलीच वैतागली होती.
" तन्वी प्लीज आजचा रविवारचा एकच दिवस मिळतो मला. सकाळ पासून तुझं आपलं चालूच आहे. थोडावेळ निवांत बसलो एका दिवशी तर बिघडले कुठे एवढे?
माहित आहे मला दिवाळी आली आहे ते आणि जाणार आहोत ना डी मार्टला आपण. हल्ली सगळे रेडीमेड मिळते आणि घरातील साफसफाई नसेल होत तर राहू दे कोणी तूला बळजबरी केली नाही त्यासाठी. आजकाल एक फोन केला तर क्लिनिंग टीम असते ती येऊन तुमचे घर अगदी स्वच्छ करून जाते.
तू उगाचच स्वतः ही चिडचिड करू नको आणि माझा रविवार देखील खराब नको करू प्लीज. " हर्षल रागात बोलला.
" हो सगळे रेडीमेड मिळते पण आपल्या घराची साफसफाई आपण केली तर बिघडले कुठे? किमान मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा घर साफ करायला कायं हरकत आहे?
आपल्या लहानपणी आठव बरं आपणच करायचो ना. तू मला कित्येकदा सांगितले आहेस पूर्वी की आप्पा आणि आईंसोबत तू कशी तयारी करायचा ते? अरे आपण घरात काही केले नाही तर रियानला पुढे जाऊन कसे कळणार?
तूला जशी रविवारी सुट्टी असते तशीच मलाही रविवारीच सुट्टी मिळते पण मी देखील सगळे आवरून दिवाळीची तयारी करतेय मगं तू किमान मला त्या कामात थोडासा हातभार लावू शकत नाही का? " तन्वीने शांतपणे हर्षलला तिची बाजू समजावून सांगितली.
" तन्वी प्लीज बास कर तुझे लेक्चर. मला आराम करू दे. " असे म्हणून हर्षल पुन्हा सोफ्यावर पहुडला तशी तन्वी रागात किचनमध्ये निघून गेली.
बेडरूम मधल्या दरवाज्या जवळ उभे राहून आप्पा मात्र आपल्या मुलाचे आणि सुनेचे संभाषण ऐकत होते शांतपणे.
क्रमशः
©®ऋतुजा कुलकर्णी