तन्वीने हर्षलला काहीच बोलायचे नाही असे ठरवले आणि हातात झाडू घेऊन ती हॉलमध्ये रियानने केलेला पसारा आवरू लागली इतक्यात रियान आप्पांसोबत तिथे आला.
"आई थांब मी आवरतो हे सगळे."
"हे कायं नवीन? तू आवरणार चक्क?" तन्वी खुदकन हसून बोलली.
"हो आई मी पसारा केला आहे मगं मीच आवरायला हवा ना. तूला खूप काम पडते." छोट्या रियानचे ते शब्द ऐकून तन्वी अगदी भारावून गेली.
"अरे बापरे माझा रियू एवढा शहाणा झाला.." असे म्हणून तन्वी त्याचे गालगुच्चे घेऊ लागली तसे रियानने तिचा हात झटकला.
"आई मी मोठा झालो आहे. " तन्वी रियानचे बोलणे ऐकून हसली.
" आप्पा बघा ना आई हसतेयं. तुम्ही सांगा बरं तिला." रियान आप्पांकडे पाहून बोलला तसे तन्वीचे लक्ष आप्पांकडे गेले आणि तिला रियान अचानक इतका शहाण्यासारखा का बोलू लागला हे समजले.
"आप्पा थँक्यू." तन्वी आप्पांकडे पाहून बोलली.
" कशासाठी बेटा? अगं प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली की घरातील स्त्रियांचा भार कमी होतो." हे बोलताना आप्पांनी हर्षलकडे मुद्दाम पाहिले तसा हर्षल आप्पांचा सूर समजून उठून बसला.
"आप्पा मी आवरणार होतो."
"कधी?" आप्पांनी हर्षलला प्रश्न केला त्यावर हर्षल शांत बसला.
" हर्षल मगाशी मी तुझे आणि तन्वीचे बोलणे ऐकले सगळे शिवाय सकाळपासून घरात जे काही चालू आहे ते पाहतोय मी.
अरे तन्वी सुद्धा जॉब करते, तिलाही एकच दिवस मिळतो आजचा आरामासाठी उलट बाहेरून रेडीमेड आणणे, घरी साफसफाई साठी माणसे बोलावणे हे सगळे केले तर तिला सोपे पडेल पण ती तिच्या घरासाठी विचार करतेय किंवा रियानला आपल्या सणा समारंभाचे महत्त्व कळायला हवे याचा अट्टाहास धरतेय ही गोष्ट खूप कौतुकाची आहे.
पैसा दिला की रेडीमेड वस्तू आणता येतील हर्षल पण स्वतःच्या हाताने घर सजवण्याचा आनंद काही वेगळाच असतो रे. "
" ह्म्म सॉरी आप्पा "आपल्या वडिलांचा एकंदरीत सूर पाहून हर्षलने पट्कन माफी मागितली.
" हर्षल सॉरी बोलले की झाले, तुम्ही लोक पळवाटा शोधता सॉरी बोलून हल्ली.
गोष्ट फक्त सणाची किंवा आजची नाही अरे. मी एरवीही पाहतो. तन्वी सकाळी उठून आपल्या तिघांचा नाष्टा, जेवण सगळे बघते, घर आवरते, जॉबला जाते तिथून आल्यावर देखील घरातील इतर कामे, रियानचा अभ्यास, जेवणे, बाकी सण वगैरे सगळे काही अगदी छान सांभाळून घेते. हे करताना कित्येकदा तिची दमछाक होते पण ती अगदी नेटाने करते सगळे.
मी मला जमेल त्या परीने रियानचा अभ्यास घेतो किंवा भाजी वगैरे आणतो पण मलाही आता वयानुसार फार होत नाही. संसार हा एकट्याने नसतो चालतं हर्षल.
अरे हे घर, माझी, रियानची जबाबदारी फक्त तन्वीची आहे का? अरे संसार तिचा एकटीचा आहे का?
हे घर तुझे पण आहे. खरंतर तिच्यापेक्षा जास्त माझी जबाबदारी तुझी आहे पण तू ऑफिसच्या कामानिमित्त या सगळ्या मधून सुटका करून घेतोस स्वतःची, तन्वीला तसे करून जमत नाही.
पूर्वी स्त्रिया घरात असायच्या म्हणून ठीक होते पण आत्ता स्त्रिया नोकरी करतात. नोकरी करत घर सांभाळून घेताना तिच्या नवर्याने तिला थोडासा हातभार लावायला हवा अशी अपेक्षा तिने केली कधीतरी तर बिघडले कुठे?
लक्षात ठेवं हर्षल टाळी एका हाताने जशी वाजत नाही तसाच संसार एका हाताने कधीच होत नाही त्याला स्त्री आणि पुरूषांच्या हाताचा आधार हवा असतो तेव्हा कुठे घर भक्कमपणे उभे राहते नाहीतर वादाची ठिणगी एकदा का पडली की हे घर कधी त्यात जळून खाक होते लक्षात देखील येत नाही.
घर सर्वांचेच असते. घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडी थोडी जबाबदारी घेतली की घरातील स्त्रीचा भार कमी होतो. अरे सणाचा खरा आनंद हा एकत्र मिळून साजरा करण्यात आहे तसा घरातील साफसफाई किंवा सगळी कामे एकत्र करण्यात सुद्धा आहे.
मोबाईलच्या जगांत तुम्ही मुलं इतकी रमता की घरी आपली बायको किती दमली आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवत नाही. आजपासून आपल्या घरात प्रत्येकाने आपापली कामे करायची आणि जमेल तशी तन्वीला मदत ही करायची म्हणजे थोडा तिचाही आराम होईल.
घरची गृहलक्ष्मी आनंदी असली की घर देखील हसतं खेळत राहतं समजलं का? " आप्पांनी हर्षलला विचारले तसे हर्षलला त्याची चूक लक्षात आली आणि तो तन्वी कडे पाहून डोळ्यांनीच इशारा करत तिची माफी मागू लागला.
तन्वी मात्र भरल्या डोळ्यांनी आप्पांकडे पाहत होती. सासर्यांच्या रूपात तिची काळजी घेणारे वडील तिला दिसत होते.
"आई बघं झाले माझे आवरून" छोट्या रियान च्या बोलण्याने तन्वी भानावर आली.
"गुड" असे म्हणून तिने त्याचा पापा घेतला आणि आता ती घरातील इतर आवराआवर करायला लागली यावेळी मात्र ती एकटी नव्हती तर तिचे सासरे, छोटा रियान आणि हर्षल ही तिच्या मदतीला होता.
ही दिवाळी तन्वीसाठी खूप आनंद घेऊन येणार होती कारण आता घराची जबाबदारी फक्त तिची उरली नव्हती तर तिचा जोडीदार तिच्यासोबत कायम उभा होता ती जबाबदारी वाटून घेण्यासाठी.
*समाप्त *
संसार हा दोघांचा असतो आणि त्या संसाराची जबाबदारी ही दोघांची असते. थोडं थोडं वाटून घेतलं की सगळे सोप्पं होते.
©®ऋतुजा कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा