थोरलेपण (भाग १)
“अगं तुला सांगायचंच राहिलं, माझ्या दिराचं लग्न ठरलं.” आरती आपल्या मैत्रिणीसोबत, सुषमासोबत बोलत होती.
“हो का गं. कधी ठरलं लग्न? आणि मुलगी काय करते?” सुषमा
“अगं ह्या रविवारीच ठरलं. तुला म्हटलं नव्हतं का, मागच्या महिन्यात आम्ही एक मुलगी पाहिली होती,
तिच्यासोबतच ठरलं.” आरती
“कोण गं?” सुषमा
“अगं ती नाही का, वैशाली नाव होतं तिचं, ती गं बी.एस्सी. झालेली. तिच्यासोबतच ठरलं.” आरती.
“अच्छा ती होय. आठवलं मला. ए पण ती तर नोकरी करणारी नव्हती ना आणि तुझ्या दिराला तर नोकरी करणारी बायको हवी होती.” सुषमा
“हो गं. भाऊजींना नोकरी करणारीच हवी होती; पण आमच्या सासूबाईंना आवडली ती. मग काय, ठरलं लग्न.” आरती
“अच्छा. काय मग मज्जा आहे एका माणसाची. आता मोठ्या जाऊबाई होणार मग.” सुषमा
“कशाची मज्जा, सासूबाई म्हणाल्या लग्नाची सगळी तयारी तूच कर. अगदी कपडेलत्ते कुठून घ्यायचे, कसे घ्यायचे तूच ठरव. सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकलीये. मला तर बाई टेन्शनच येतंय. कार्य नीट पार पडलं म्हणजे झालं.” आरती
“हो का? बरं आहे ना, सगळं तुझ्या मनाने होणार ते. मी तर म्हणते हे कार्यच काय पुढंही असंच सगळं तुझ्या मनाने होऊ दे. नाहीतर ती कानामागून येईल आणि तिखट होईल.” सुषमा
“म्हणजे? मला नाही कळलं.” आरती
“किती साधी आहेस गं आरती तू.” सुषमा
“नीट सांग ना, काय म्हणतेय, मला काही कळत नाहीये.” आरती
“अगं साधं आहे, बघ तू या घरातली मोठी सून. इतके दिवस सगळं तुझ्या मनाने होत होतं. आता तुमच्या घरात धाकटी सून येणार. त्यातल्या त्यात ती हाऊस वाईफ असणार. मग काय तू इथं दिवसभर तुझ्या बुटीकमध्ये आणि ती घरी. ह्या सासवांना काय गं, घरी राहणाऱ्या सूनाच आवडतात. तू इकडे आली, की ती तुझ्या सासूचे कान भरायला कमी करणार नाही. हळूहळू ती आवडती होईल आणि घरात तिचीच सत्ता राहील. इतके दिवस तुझं कोडकौतुक करणारी तुझी सासू ती बरोबर स्वतःकडे वळवेल. मग काय सगळं ती म्हणेल तसं. आता बघ ना, सणवार असले की तुझा जास्त वेळ बुटीकमध्ये जातो कारण ह्याकाळात गिऱ्हाईक जास्त असतात. आणि सासवांना तर तेव्हाच घराचं पडलेलं असतं. तुझ्या जावेला मग आयता मोका मिळेल.
अगं, मी माझ्यावरून सांगतेय, माझी लहानी जाऊ आली ना तिने पार माझ्यात आणि सासूत भांडणं लावली. सासूही तिचंच ऐकते. मला माझं थोरलेपण जपता आलं नाही. तू तरी ते जप. तुझ्या घरी काय गं, तुझा नवरा आणि दीर दोघांची राम लक्ष्मणाची. ते काही एकमेकांना सोडायचे नाही. म्हणूनच म्हणतेय आपण आपला जाउबाईंचा तोरा काही सोडायचा नाही बरं.” सुषमा बोलून थांबली. आरती मात्र विचारात मग्न झाली. तेवढ्यात आरतीच्या बुटीकमध्ये गिऱ्हाईक आलं.
“बरं आरती, चल निघते मी. लक्षात ठेव हो मी सांगितलेलं.” सुषमा म्हणाली आणि निघून गेली.
क्रमशः
©® डॉ.किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा