थोरलेपण (भाग २)
बघता बघता आरतीच्या दिराचं लग्न झालं. लग्नात सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे आरतीने सगळ्या गोष्टी जबाबदारीने पार पाडल्या. आरतीच्या सासूबाई ज्याला त्याला आरतीचं कौतुक सांगत होत्या. स्वतःचं कौतुक ऐकून आरती मात्र मनोमन सुखावून जात होती. लग्नानंतर काही दिवसांनी घरातले सगळे नातेवाईक वगैरे निघून गेले.
एकदिवस आरती नेहमीप्रमाणे सकाळी उठली. वैशालीने तोपर्यंत सगळ्यांचा चहा ठेवला होता.
“आरती, ये गं चहा घ्यायला. वैशुनं चहा केलाय. छान केलाय हो.” आरतीच्या सासूबाई तिला म्हणाल्या.
‘लगे वैशु का? आमच्या नावाचा नाही केला कधी शॉर्टकट! म्हणे चांगला चहा केला.’ आरती मनातच म्हणाली.
“ताई, चहा घ्या.” वैशालीने तिच्यासमोर कप ठेवला.
“चहा नकोय मला. मी कॉफी घेईल आणि मला जशी हवी तशी बनवून घेईल.” आरती तणक्यात म्हणाली.
“आज जेवायला भेंडी करायची का?” फ्रीजमध्ये भाजीपाला बघत वैशालीनं आरतीला विचारलं.
“राहू दे. कुणी खात नाही भेंडी.” आरती म्हणाली.
“मग कशाला आणली? आपल्या घरात कुणी लहान लेकरूही नाही की भेंडी खाईल.” वैशाली सहज म्हणून गेली.
“तुला विचारून आणू का आता भाजीपाला. मला आवडते म्हणून आणलीये.” आरती रागात म्हणाली.
“ठीक आहे. तुमच्या पुरती भेंडी करूयात आणि बाकी सगळ्यांसाठी गवार करूयात. चालेल का?” वैशाली
“अशा रोज दोन दोन भाज्या करायला लागलो ना तर बुडखाला कणसं यायचीच वेळ येईल. या घरात एकच भाजी होत असते.” आरती तणक्यात म्हणाली.
“ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसं. कोणती भाजी करायची?” वैशाली मृदू आवाजात म्हणाली.
“तू नको सांगू, बघते मी काय करायचं ते. बाकी झाडझुड, भांडे वगैरे बघा, जमतात का करायला?” आरती मोठ्या आवाजात म्हणाली.
“भांड्यावाल्या मावशी…” वैशाली हळूच म्हणाली.
“पंधरा दिवस येणार नाहीये. मला सांगून गेली. अरे हो, तिनं तुलाही सांगायला हवं होतं नाही का? आता तुही या घरात आलीये, नाही का? पण ती मलाच सांगून गेली. नेहमी मलाच सगळं विचारून करायची सवय आहे ना तिला.” आरती कुत्सितपणे म्हणाली. वैशालीनं त्यावर मान डोलावली आणि सरळ पडलेली भांडी घासायला गेली.
“आरती, अगं आताच लग्न होऊन आलीये ती घरात. नवीनच आहे. जरा प्रेमानं तरी बोल.” आरतीच्या सासूबाई तिला म्हणाल्या.
“नवीन! तुम्हाला आठवतं का आई, आमच्या लग्नात तुम्ही पाय मुडपून पडल्या होत्या. मी ह्या घरात आले आणि तेव्हापासून धूणं-भांड्यांपासून सगळं मीच जबाबदारीने करत आलेय आतापर्यंत.” आरती
“हो गं, तुझं नवेपण जपता आलं नाही मला तेव्हा. नाईलाज होता; घरात दुसरी कुणी स्त्री नव्हती. पण आता आपण दोघी आहोत ना.” सासूबाई
“काही होत नाही दोन भांडे घासले तर. तसंही सगळं पटकन आटोपून मला बुटीकमध्ये जायचं आहे. बऱ्याच ऑर्डर आहेत.” आरती म्हणाली आणि कामाला लागली.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा