थोरलेपण (भाग ३)
“आई, ते… ताई मघाशी…” आरती बुटीकमध्ये गेल्यावर वैशाली सासूबाईंसोबत बोलत होती.
“अगं, तू लक्ष नको देऊ तिच्या बोलण्याकडं. मनानं खूप चांगली आहे. कामाचा ताण जास्त असेल म्हणून चिडली असेल मघा. आता लग्नसराई सुरू आहे ना. खूप ऑर्डर येतात तिला कपडे शिवायच्या.” सासूबाईंनी वैशालीची समजूत काढली.
लग्नसराईमुळे आरतीकडे कपड्याच्या बऱ्याच ऑर्डर होत्या आणि त्यात घरातल्या लग्नामुळं तिनं बरेच दिवस तिचं बुटीक बंद ठेवलं होतं त्यामुळं मागच्या राहिलेल्या ऑर्डरही होत्या. रात्री दहा वाजेपर्यंत आरती दुकानातच होती.
‘आज उशीर झाला; पण हे कामही महत्वाचं होतं. घरी जाऊन पटकन काहीतरी भाजी वगैरे करून घ्यावी लागेल. त्या महामायेनं काही केलंही की नाही देव जाणे. सकाळी मी ओरडले तर आता स्वयंपाक घरात घुसलीही की नाही काय माहिती.’ मनाशीच बोलत आरती घरी पोहोचली. आरती फ्रेश होऊन स्वयंपाक घरात आली.
“ताई, चला जेवायला. स्वयंपाक करून ठेवलाय मी.” वैशाली मागून येत म्हणाली.
“ठीक आहे, आज केलास ते केलास पण इतरवेळी मला विचारून करत जा.” आरती आपलं महत्व टिकवण्याच्या अट्टहासापायी लगेच म्हणाली. वैशालीने त्यावर होकार भरला.
“ठीक आहे. बरं झालीये आमटी; पण अजून थोडा चिंच आणि गुळ घातला असता तर अजून चव आली असती.” जेवताना आरती तिला म्हणाली.
“हो, मी लक्षात ठेवेण. पण तुमच्या हाताची चव कधीच यायची नाही माझ्या हाताला.” वैशाली
“आई, उद्या लवकर जाईन म्हणते दुकानात. भरपूर कामं आहेत.” आरती तिच्या सासूबाईला म्हणाली.
“हो, जा की.” सासूबाई म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी आरती सकाळी लवकरच दुकानात गेली. जाताना वैशालीला काय स्वयंपाक करायचा ते सांगून गेली. वैशालीने त्याप्रमाणे सगळं केलं आणि आरतीसाठी ती डब्बा घेऊन दुकानावर गेली.
“ताई, डब्बा आणलाय. जेवून घ्या.” वैशाली म्हणाली.
“हो, ठेव तिथं करते एवढं झालं की. या दोन्ही मदतनीस बायकांना आजच यायचं नव्हतं. संध्याकाळी ही दोन्ही ब्लाऊज द्यायची आहेत. एवढं करते आणि जेवते.” आरती म्हणाली.
“मी काही मदत करू का? म्हणजे मला हुका, काचघरं करता येतात.” वैशाली म्हणाली.
“घे कर. पण एक लक्षात ठेव, घरात जसं माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असते ना तसं इथं नाही करायचं. हे माझं दुकान आहे.” आरतीने तिला जवळपास धमकीच दिली. वैशालीने तिला मदत केली आणि संध्याकाळ होण्याआधी परत घरी निघून गेली.
क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा