Login

थोरलेपण (भाग ४)

धाकटी जाऊ घरात आली की मोठीचं महत्व कमी होतं का?
थोरलेपण (भाग ४)


दिवस पुढं सरकत होते. आरतीचं घरात विक्षिप्त वागणं सुरूच होतं. वैशालीला सासुरवास कमी आणि जाऊवास जास्त होत होता. वैशाली आरतीसोबत जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण आरती काही तिची टेक सोडायला तयारच नव्हती.

आरतीच्या नवऱ्याने, सासूबाईंनी तिला बराच समजवण्याचा प्रयत्न केला पण आरतीच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. ‘मी, माझं घर, मी म्हणेल तसंच’ असंच तिचं वागणं होतं.

एरवी चांगली वागणारी आरती अशी का वागतेय हे कुणालाच कळत नव्हतं.

एक दिवस आरतीच्या सासूबाई आपल्या दोन्ही मुलं आणि सुनांना म्हणाल्या,


“खूप दिवसांपासून बोलेन म्हणतेय. आपण या घराची वाटणी करून घेऊया. वरच्या घरात वैशालीची चूल आणि खालच्या घरात आरतीची चूल राहील. माझं म्हणाल तर ज्याला माझी गरज असेल, किंवा मला वाटेल तिथं मी राहील. तुमचे बाबा गेल्यावर मला वाटलं होतं की मी ह्या घराला बांधून ठेवेल पण आता ते शक्य वाटत नाहीये. रोज घरात होणारी धुसपूस मला काही सहन होत नाहीये. माझा निर्णय झाला आहे आणि तोच शेवटचा आहे.”


“मग माझाही निर्णय पक्का आहे, तुम्ही माझ्यासोबतच राहायला हवं.” वैशाली म्हणाली. आरती मात्र ह्या विषयावर काहीच बोलली नाही. काही दिवसातच वैशाली वरच्या घरात शिफ्ट झाली.

आरतीला सुरुवातीला खूप चांगलं वाटलं. ती, तिचं घर आणि तिचे निर्णय.. सगळं काही तिच्या मनासारखं होत होतं. वरच्या घरात राहायला गेल्यापासून आरतीच्या सासूबाईही तिच्यासोबत काही बोलत नव्हत्या. त्यांच्या नात्यातही एक अदृश्य भिंत उभी झाली होती. दोघे भाऊ एकमेकांची विचारपूस तेवढी करायचे.

सगळंकाही व्यवस्थित सुरू होतं; पण काहीतरी हातातून सुटल्याची भावना आरतीला छळत होती. मुळात आरती जे वागली, तसा तिचा स्वभाव नव्हताच; पण तरी आरती तसं वागली होती.


एक दिवस दुपारच्या वेळी आरती तिच्या बुटीकमध्ये बसली होती. तितक्यात सुषमा तिथं आली.


“काय मग मोठ्या जाऊबाई, कसं सुरू आहे?” सुषमा

“काही नाही गं. तू बोल, इतक्या दिवसांत फोन नाही की इकडं चक्कर नाही. कुठं गायब होतीस?” आरती

“इथंच होते. ह्या घरातल्या किरकिरी काय बंद होतात का गं. माझं जाऊ दे, तू तुझं सांग. काय म्हणतात धाकट्या जाऊबाई.” सुषमा


“काही नाही. आम्ही वेगळं राहतो आता.” आरती


“काय म्हणतेस! वेगळं! बरं आहे की. मज्जा आहे बाबा तुझी. नाहीतर आम्ही, जरा म्हणून मोकळा श्वास घ्यायची मोकळीक नाही आम्हाला.” सुषमा

“कशाची मज्जा गं. घरात मी आहे पण घराला घरपण नाहीये. तुला सांगू, वैशाली एवढी काही वाईट वगैरे नव्हतीच. येस. आत्ता कळलं मला, काहीतरी हातातून सुटल्यासारखं का वाटत होतं. मला अर्जंट घरी जायचं आहे. आपण नंतर भेटू कधीतरी.” आरती म्हणाली आणि ताबडतोब घराकडे निघाली.

क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर

0

🎭 Series Post

View all