Login

थोरलेपण (भाग ५ अंतिम)

धाकटी सून घरात आली की मोठीचं महत्व कमी होतं का?
थोरलेपण (भाग ५ अंतिम)

आरती दुकानातून सरळ घरी पोहोचली आणि थेट वरच्या घरात गेली.

“वैशाली.” तिनं दारातूनच आवाज दिला. वैशाली बाहेर आली.


“ताई, या ना आत.” वैशाली म्हणाली आणि दबक्या पावलाने आरती घरात आली. सासूबाई तिथंच खुर्चीवर बसून होत्या.


“आई, वैशाली. मला माफ करा. खूप चुकीची वागले मी. माहीत नाही पण हे थोरलेपण मिरवण्याच्या नादात मी हेच विसरले की तुम्ही सगळी माझी माणसं आहात. तुम्ही लोकं आहात म्हणून घर आहे. घर नुसत्या चार भिंतींनी होत नसतं तर ते घरातल्या माणसांमुळं असतं. तुम्ही सोबत नाहीत तर सणवार वगैरे काही वाटतच नाहीत. कशातच आनंद वाटत नाही.

खरंच मी खूप चुकले. मला ना भीती वाटायला लागली होती, की वैशाली घरात आल्यावर माझ्या हातातून माझं घर, माझी माणसं सुटून जातील. म्हणून मी वैशालीसोबत मनाला येईल तसं वागायचे. पण तिने कधीच मला उलटून उत्तरं दिली नाहीत की कधी माझा अपमान केला नाही. मी मात्र पावलोपावली तिचा अपमान केला. प्लिज मला माफ करा.

आता तुम्ही दोघी परत खाली चला. आपण सगळेजण सोबत राहू.” आरती डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.


“नाही ताई. आता नाही. तुमच्या भाषेत सांगू का, एखादा अखंड कपडा आपण फाडला आणि नंतर त्यावर कितीही व्यवस्थित शिलाई मारली तरी ती शिलाई दिसून पडतेच. तो जोड दिसून पडतोच. म्हणूनच आपण आता असेच राहू. सणावाराला किंवा ठरवून आपण भेटत जाऊ. एकमेकांना संकटात साथ देत जाऊ. पण आता पुन्हा सोबत नकोच. आपण एकमेकांपासून जास्त दूर तसेही नाहीच आहोत. बस दहा पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या आहेत. थोडंसं अंतर ठेवू; पण एकमेकांसोबत नक्की राहू.” वैशाली म्हणाली.

‘काय तर म्हणे जाऊबाईंचा तोरा मिरव. हा तोरा मिरवण्यात माझ्या घराचे दोन तुकडे झाले.’ आरती खाली तिच्या घरात येऊन बसली होती. आपल्या वागण्या बोलण्याचा तिला खूप पश्चाताप होत होता.

“आरती ताई.” तितक्यात वैशाली तिथं आली. सोबत सासूबाईही होत्या.


“मी काय म्हणत होते, त्या अखंड कापड्यावरचा जोड दिसला तर दिसू दे की. त्यानं काय फारसं बिघणार आहे. लोकं कसंही असलं तरी नावं ठेवतातच, मग त्यांच्यासाठी आपण का वेगळं राहायचं? हो ना मोठ्या जाऊबाई.” वैशाली डोळा मारत म्हणाली.

“गप गं. काही जाऊबाई नाही आणि जाऊबाईंचा तोरा तर नाहीच नाही. ताई म्हणूनच हाक मार आणि चल पटकन, तुझ्या हातचा चहा पाज.” आरती म्हणाली आणि दोघी खळखळून हसल्या.

समाप्त