Login

थोरल्या सूनबाई

थोरलेपणा दिसण्यात नाही तर वागण्यात हवा
थोरल्या सूनबाई - १
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५



"नकोय मला हे नुसतं नावाला थोरलेपण! कोणीही येतं आणि मला शिकवून जातं.. जसे मला काही कळतच नाही."
नमिता चिडून बोलत होती.

"शांत हो नमू. आपण बोलूया नंतर."
विनायक आपल्या चिडलेल्या बायकोला, म्हणजेच नमिताला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.

"तुम्ही नेहमी हेच करा, कायम मलाच शांत बस म्हणा.. पण समोरचा कसा वागतो हे समजून सुद्धा तुम्ही न समजल्याचा आव आणता.. आणि मला हेच आवडत नाही. अहो बायको आहे मी तुमची, कधीतरी माझी बाजूही समजून घेत जा."
बोलता बोलता नमिताच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते.


आज घरात जे काही घडलं होतं त्यावरून नामिताला खूप राग येत होता. इतर वेळी ती कायम शांत असायची, उगाच घरात अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद नको म्हणून, पण आज जरा जास्तच झाले होते. तिला हे सगळं असह्य होतं होते आणि म्हणूनच तिचा बांध सुटला. कारण अगदी क्षुल्लक होते, पण तरीही तिला नेहमीच गृहीत धरलेलं आवडत नव्हतं.. आणि आज नेमकं तेच घडलं होतं.


सासूबाईंनी त्यांच्या दोन्ही सूनांसाठी दिवाळीची खरेदी केली होती. घरात काय पाहिजे काय नाही ह्याची यादी नमिताने आधीच करून दिलेली होती, पण छोट्या मुलाची परीक्षा म्हणून ती सासूबाईंसोबत मार्केटमध्ये जायला नको म्हणालेली. लहान जावू मात्र अगदी उड्या मारत त्यांच्यासोबत मार्केटमध्ये गेली आणि स्वतः च्याच आवडीने खरेदी केली. नमिताने सांगितलेल्या अर्ध्या वस्तू तिने आणल्याचं नव्हत्या. बरं जे आणलं ते सुद्धा तिने स्वतः साठी ठेवून घेतलं. यावरून सुद्धा नमिताचा पारा चढला होता.


नमिता आणि विनायकच्या लग्नाचा दहावा वाढदिवस गेल्या महिन्यातच साजरा झाला होता. नमिता थोरली सून म्हणून घरातले सगळे बघत होती. पाहुणे रावळे, नातेवाईक, घरातले बाहेरचे, शेजारी पाजारी ह्या सगळ्यांची उठ बस ती अगदी आवडीने करत असे; त्यामुळे सगळ्यांची आवडती आणि थोरली सून म्हणून नमिता आनंदाने मिरवत होती. प्रीती म्हणजे तिची लहान जाऊबाई, त्यांच्या लग्नाला आत्ता कुठे तीन चार वर्ष झालेली. प्रीती चांगली शिकलेली आणि कमावती होती. लग्न करून आल्या आल्या प्रीतीने घरात सांगून टाकलेले, की ती जॉब सोडू शकत नाही; त्यामुळे घरात कामाला ती वेळ देऊ शकणार नाही.

प्रीती घरातले काही काम करत नाही, पण तिने मदत म्हणून भांड्यांच्या कामासाठी मावशी लावून दिल्या होत्या आणि त्यांचा पगार ती स्वतः देत होती.. जेणेकरून घरातल्यांना तिच्याकडून थोडीफार मदत केल्यासारखे वाटेल. प्रीती नेहमीच सकाळी तिचं लवकर आवरून ऑफिसला निघून जायची, मात्र नमिता दिवसभर सगळं घर सांभाळून घेत होती. इतकेच नाही तर प्रीतीला सकाळी उठून डबा देणे, नवऱ्याला आणि दिराला ऑफिसला जाताना डबा देणे सगळ्यांचा चहा नाश्ता, मुलाचं आवरून त्याला शाळेत सोडणे, सासू सासरे, घरात काय हवं नको ते बघणे.. इतक्या सगळ्या कामात तिला स्वतः ला असा वेळ मिळतच नव्हता.

तिलाही वाटायचं थोडा आराम करावा, पण सासू सासऱ्यांच नेहमीच काही ना काही काम निघायचं आणि दुपारी जरा सुद्धा म्हणून तिला पाठ टेकायला मिळत नव्हते. हल्ली प्रितीचे वागणे बदलत चालले होते. हे नमितला जाणवत होते. ती नेहमीच बघायची, की सासूबाई कायम प्रितीच्या बाजूने बोलतात. काहीही आणायचे झाले तर तिला पहिले विचारतात. प्रत्येक जण तिला तिचा चॉईस, तिची आवड विचारत असतो. आज भाजीला काय बनवायचं? हे सुध्दा सासूबाई तिला विचारतात, पण नमिता मात्र एखाद्या यंत्राप्रमाणे घरातली सगळी कामं करत होती.

प्रीतीला सगळे स्वतः हून विचारतात म्हणून तिची कॉलर नेहमीच टाईट असायची. आपली मोठी जाव म्हणून तिने कधी नमीताला कधी विचारले नाही. उलट ती कमावते आणि नमिता घरीच असते म्हणून तिच्यावर हसायची.

कधी कधी ती मुद्दाम नामिताला जास्तीची कामं लावून द्यायची. नमिताला मात्र हे सगळं कळतं होतं, पण ती उगाच चांगल्या घरात वाद नको म्हणून नमत घ्यायची. हे सगळं ती विनायकला देखील सांगायची, पण तो सुद्धा शांत बसायचा. 'तू जास्त लक्ष देऊ नको.' असे म्हणून टोलवून द्यायचा. इकडे नमिता मात्र विचार करत करत झोपी जायची.


घरात नवीन सोफा सेट आणायचा होता, तेव्हा सुद्धा घरातल्यांनी प्रीतीला विचारले. इतकंच काय तर फ्रिज, वॉशिंग मशीन घ्यायच्या वेळी सुद्धा तेच. अनेकदा प्रीतीला विचारले जायचे आणि इकडे नमिता घरात राहून सुद्धा तिला काय कळतं असे म्हणून दुर्लक्षित केले जायचे. कित्येक वेळा नमिता सुद्धा वाईट वाटून घेत नव्हती.

'जाऊ दे, तिला जास्त कळत असेल. कदाचित माझ्यापेक्षा तिचा चॉईस जास्त चांगला वाटतं असेल; म्हणून घरातले तिला विचारत असतील.' असे म्हणून नमिता स्वतः चीच समजूत काढून घ्यायची आणि विसरून ही जायची.

एके दिवशी प्रीती आणि तिचा नवरा दोघे बाहेरून उशिरा घरी आले. का? तर थोडीफार खरेदी करायची होती प्रीतीला म्हणून, पण नेमकं कारण कोणालाच माहीत नव्हते.

"अर्णव, हे बघ तुझ्यासाठी आम्ही काय घेऊन आलो."
असे म्हणून प्रीतीने त्याच्यापुढे एक भली मोठी पिशवी धरली.

"काकी, काय आणले तू माझ्यासाठी?"
छोटा अर्णव मोठी पिशवी बघून खूप खुश झाला. त्याने ती पिशवी लगेच घेतली आणि खोलून पाहिली.

"वॉव काकी, डोरेमॉन! मला हीच स्कूल बॅग पाहिजे होती. आई पुढच्या वर्षी घेऊ म्हणाली होती, पण तू आत्ताच घेऊन आलीस."
अर्णव त्याच्या आवडीची महागडी स्कूल बॅग बघून खूपच आनंदून गेला होता.

"ही अशीच पाहिजे होती ना तुला! आवडली ना अनुला बॅग?"
प्रीतीने त्याला अगदी जवळ घेऊन विचारले. काकू म्हणून ती त्याचा सगळा लाड पुरवत होती. त्याला काय हवं नको ते सगळं आणून सुद्धा देत होती.

"हो, अगदी अशीच पाहिजे होती मला."
अनु स्कूल बॅग बघून हरखून गेला होता.

"सगळे कप्पे खोलून तर बघ! अजून बरंच काय काय आणलं आहे."
प्रीती त्याच्याकडे बघून सांगत होती.

"अरे वाह! कंपास बॉक्स, पाण्याची बॉटल आणि टिफीन सुद्धा! सगळं मॅचिंग मॅचिंग."
अर्णव भलताच खुश झाला. त्याच्यासाठी स्कूल बॅग, डबा, पाण्याची बॉटल आणि बरंच काही आणलं होतं. ते सगळं बघण्यात तो गुंग होता. आजी आजोबांना दाखवत होता. नमिता मात्र स्वयंपाक घरात सगळ्यांसाठी गरम गरम पोळ्या लाटत होती.

सगळ्यांची जेवणं उरकली आणि जो तो झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेला. नमिता अजूनही स्वयंपाक घरात उद्याच्या  डब्याची तयारी करत होती.