Login

थोरल्या सूनबाई - २

थोरलेपणा दिसण्यात नाही तर वागण्यात हवा
थोरल्या सूनबाई - २
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५


सगळ्यांची जेवणं उरकली आणि जो तो झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेला. नमिता अजूनही स्वयंपाक घरातला पसारा आवरत होती तसेच उद्याच्या डब्याची तयारी करत होती.

बाहेरून अर्णव तिला केव्हाचा आवाज देत होता, पण सगळे काम झाल्याशिवाय नमिता काही किचनमधून बाहेर येणार नव्हती.

"आई चल ना लवकर, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे."
अर्णव तिला हात धरून ओढून घेऊन जात होता.

खोलीमध्ये जाताच अर्णवने तिला बॅग दाखवली. त्यात आणखी काय काय होते ते सगळे दाखवले. पहिल्यांदा तिला ते सगळं बघून राग आलेला, मुलासाठी हे सर्व ती स्वतः आणायला जाणारच होती.. पण कामाच्या गडबडीत तिला वेळ मिळाला नाही. आणि आत्ता दिवाळीला मध्ये आधीच कशाला स्कूल बॅग पाहिजे; म्हणून तिने ते टाळलं देखील होतं.

"काकी खूप छान आहे, आई तुझ्यापेक्षा पण छान."
अर्णव असे म्हणताच नमिता आतून दुखावल्या गेली. नाही म्हटले तरी तिला आता प्रीतीचा राग आलेलाच होता.

दुसऱ्या दिवशी नामिताने प्रीतीला सकाळी बोलून दाखवले.
"प्रीती अगं मी आणणारच होते अर्णवला स्कूल बॅग, तू आत्ता कशाला घेऊन आलीस?"
नमिता थोडी नाराजीच्या सुरातच बोलली.

"ताई, अहो लहान आहे तो.. त्याला जे हवं ते घेऊन आलो तर त्यात बिघडले कुठे? तसेही तो खूप गुणी बाळ आहे आणि सगळ्यांचा लाडका देखील; त्यामुळे तुम्ही त्याच्यावरून ओरडू नका."
प्रीती इतकं बोलून निघून सुद्धा गेली आणि नमिता मात्र तोंड पाडून बघत राहिली.


प्रीती स्वतः कमवत होती; त्यामुळे ती कोणाला विचारणे गरजेचे समजत नव्हती. नमिता मात्र सगळ्यांना विचारूनच काहीही करायची. कितीही झाले तरी घरात राहणारी आणि बाहेर कमावणारी सून.. ह्या दोघींमध्ये फरक होतोच.


दिवाळीची खरेदी झाली. किराणा सामान आणले गेले. दिराची फर्माईश होती,"वहिनी चकल्या अगदी कुरकुरीत झाल्या पाहिजे. चिवडा पोह्यांचा आणि मक्याचा हवा. शंकरपाळी दोन्ही प्रकारची पाहिजे आणि लसूण शेव तर पाहिजेच पाहिजे."

सगळ्यांचं सगळं लक्षात ठेवून नमिता दिवाळीच्या कामाला जुंपली. घरातली झाडझटक ते किचनमधली सगळी भांडी लख्ख चमकावली. त्यानंतरच मग फराळ करायला घ्यायचा असा तिचा अट्टाहास होता. सासूबाईंना मदतीला या म्हंटले, तर त्या कंबर दुखी पाठदुखी सांगून त्यांच्या खोलीत जाऊन बसायच्या; त्यामुळे घरातल्या कामांना फक्त एकटी नमिताच होती. प्रीती तर तशीही सकाळी लवकरच ऑफिसला निघून जायची ते संध्याकाळीच उगवायची; त्यामुळे तिला सांगूनही काही उपयोग नव्हता.

इतर सामानाची खरेदी झालेली होती, पण कपड्यांची खरेदी मात्र अजुनही राहिलेली होती. दरवर्षीप्रमाणे सासूबाई आणि सासरे जाणार होते खरेदीला, पण ह्यावेळी सासऱ्यांना जायला काही जमणार नाही म्हणून नमिता गप्प बसली. सासूबाईंनी विचारायच्या आधीच प्रीती तयार झाली; त्यामुळे ह्यावेळी त्या दोघी जाणार होत्या.

"आई, ह्यावेळी आपण सिल्कच्याच साड्या घेऊया. छान दिसतात त्या."
नमिताने तिची आवड बोलून दाखवली, त्यावर सासूबाई पण काही बोलल्या नाही.


कपड्यांच्या खरेदीला जाताना सुद्धा प्रीती सासूबाईंना घेऊन अगदी ऐटीत निघाली. तिला माहिती होते ताईंना सिल्क साडी किंवा काठपदर साडी आवडते नेसायला, पण ह्यावेळी तेच तेच नको घ्यायला.
"आई, ह्यावेळी आपण डिझायनर साड्या घेऊया का? दरवर्षी आपण काठपदर साडी घेतोच की, पण आता ह्या दिवाळीला काहीतरी वेगळं घेऊया."
असे म्हणून प्रीतीने त्यांना डिझायनर साड्या घ्यायला लावल्या.

घरी आल्यावर मोठ्या कौतुकाने प्रीतीने साड्या दाखवल्या. तिन्ही साड्या तिच्याच आवडीच्या होत्या. तरीही तिने तिची साडी आधीच बाजूला काढून ठेवली आणि राहिलेल्या दोन साड्यांमधून तिला चॉईस करायला लावली. त्यातही सासूबाईंनी फिकट रंग म्हणून गुलाबी साडी ठेवून घेतली. आता उरलेली साडी म्हणून नामिताला शेवटी नाईलाजाने तिचं घ्यावी लागली. ईच्छा नसताना देखील तिला ती सगळ्यांसमोर घ्यावी लागली.


"छान मिळाल्या ना साड्या! मला तर खूप आवडल्या."
असे म्हणून प्रीती विचारु लागली.

"हो ना, छानच आहे."
सासूबाईंनी पण तिच्या हो ला हो म्हटले त्यामुळे तिला आणखीनच गुरुर चढला.

"आई, ह्यावेळी आपण सिल्कच्या साड्या घेणार होतो ना! मग ह्या भलत्याच का उचलून आणल्या तुम्ही?"
नमीता आता प्रीतीला न विचारता डायरेक्ट सासूबाईंना विचारू लागली.

"हो अग, पण हीच म्हणणं होतं की आपण नेहमीच काठपदर साडी घेतो.. डिझायनर कधी घेत नाही; म्हणून तिनेच निवडल्या ह्या साड्या. आवडल्या ना तुला?"
सासूबाई पण प्रितीची भाषा बोलायला लागल्या होत्या; त्यामुळे त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही हे नमिताला आता कळून चुकले होते.. आणि म्हणूनच ती पुढे काही न बोलता खोलीत निघून गेली.


क्रमशः