Login

थोरल्या सूनबाई - ३

थोरलेपणा दिसण्यात नाही तर वागण्यात हवा
थोरल्या सूनबाई - ३
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५


नमिता एक एक करून दिवाळीचं फराळ बनवत होती. दुपारची सगळी कामं करून जो मधला वेळ मिळेल त्यात ती हळूहळू सगळं करायचा प्रयत्न करत होती. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन करत होती. सासऱ्यांना चावता येत नाही; म्हणून करंजी अगदी खुसखुशीत बनवली. दिराने सांगितले ते सर्व पदार्थ बनवले. नवऱ्याच आवडतं विशेष अस काही नव्हतं, जे बनवलं ते खायचं असं होतं. तरीही विनायकला मात्र आपण आपल्या बायकोचं कौतुक करावं हे कधी वाटतं नव्हतं. नवऱ्याचा स्वभाव हा असा आणि दिराचा स्वभाव अगदी विरुद्ध. प्रितीने काहीही केलं तरी तो तिचं इतकं कौतुक करायचा की बस.. अशाने प्रिती आणखीनच हरखून जायची आणि मुद्दाम शायनिंग मारत चालायची.


लसुण शेव, चकली, चिवडा, करंजी, लाडू ते ही दोन प्रकारचे. शंकरपाळी सुद्धा दोन प्रकारची बनवली. हे इतकं सगळं बनवल होतं नमिताने आणि तरीही प्रिती मुद्दाम फोनमध्ये बघून काहीतरी बनवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. पाकातले चिरोटे खायची तिची ईच्छा झाली आणि तिने काही माहिती नसताना देखील घाट घातला. कसेतरी कडक मडक चिरोटे बनवले तरीही दिर मात्र तिचं कौतुक करत थकत नव्हता. कुडुम कुडूम करत बसेबसे ते चिरोटे खात होता.. आणि इकडे नमिताने साग्रसंगीत स्वयंपाक बनवला, सगळे फराळ तिने एकटीने खूप मेहनतीने बनवले होते, त्याचे मात्र कुणी कौतुक करत नव्हते. याचा तिला खूप राग येत होता आणि मनातून वाईटही वाटतं होते. 


"तुम्ही माझं अस चार चौघात कौतुक का करत नाही?"
नमिताने विनायकला बोलून दाखवले खोलीत गेल्यावर.

"त्यात काय कौतुक करायचं? इतकी वर्ष झाले तूच तर सगळं बनवत असते.. आणि मलाच काय तुलाही माहिती आहे तू छान बनवते ते; त्यामुळे वेगळं कौतुक करण्याचा प्रश्नच येत नाही."
असे म्हणून विनायक नमिताला गप्प बसवायचा.

"अहो ते भावजी बघा, त्या प्रितीने काहीतरीच करून ठेवले ते चिरोटे आणि तरीही ते तिचं किती कौतुक करत होते."
नमिता विनायककडे बघून बोलू लागली.

"तिचं काय घेऊन बसतेस तू! ती तुझ्यासारखी सुगरण थोडीच आहे. ती कधीतरी येते तुझ्या स्वयंपाक घरात; म्हणून तो तिचं कौतुक करत असणार."
विनायक पुन्हा तिला टोलवत बोलत होता.

नमिता मात्र केव्हाच पाठ फिरवून झोपी गेली. तिच्या बोलण्याकडे विनायक कधी लक्षच देत नव्हता. त्याला वाटायचे ह्या बायकांमध्ये ना पडायलाच नको. त्यांचं त्यांना बघू द्या, जास्त विचारत बसले की मग उगाच एवढ्या तेवढ्यावरून भांडणं व्हायची.. ते ही काहीही कारण नसताना; त्यामूळे त्याने घरात कधी नमिताकडे तिच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही.

नामिताला कायम वाटायचे, की तिने काही छान बनवले तर तिचेही कौतुक व्हावे. आणि कौतुक केलेलं कोणाला आवडत नाही. उलट आणखी छान काम करण्याचा हुरूप येतो, पण इकडे तर सगळं उलट होतं.

'मी इतका छान स्वयंपाक बनवते, सगळ्यांसाठी काही ना काही खास बनवण्याचा प्रयत्न करत असते.. आणि तरीही कोणालाच त्याची पडली नाही. माझ्यासाठी साधे कौतुकाचे दोन शब्द सुद्धा बोलू शकत नाही कोणी. आणि मी मात्र सगळ्यांचा विचार करायचा. इतकं काम केलं साफसफाई केली, फराळ बनवले.. तरीही कोणी म्हटले नाही की बस आता आराम कर.'
नमिता स्वतः शींच मनातल्या मनात बोलत झोपी गेली.


इतकी सगळी कामे करून नमिताला थोडी कणकण आल्यासारखी वाटतं होती. तिला खूप दमल्यासारखे वाटतं होते. अजिबात उठून बसवत नव्हते; त्यामुळे घरातली सगळी कामं तशीच पडून होती. दुपारी कसेबसे उठून तिने खिचडीचा कुकर लावला तेव्हा तिने सासू सासऱ्यांना वाढले आणि स्वतः पण खाऊन गोळ्या घेऊन झोपली, पण सासूबाईंनी काही केले नाही. त्यांना पण गुडघ्याच दुखणं सुरू झालं होतं; त्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हते. संध्याकाळी प्रीती आली तेव्हा घरातला पसारा बघून तशीच तिच्या रूममधे निघुन गेली. बराच वेळाने बाहेर आली तेव्हा किचनमध्ये गेली.

"प्रीती, अगं नमिताला दुपारपासून ताप आल्यासारखे वाटतेय. बिचारी गोळ्या घेऊन पडून आहे. इतकं सगळं करून तिलाही दमल्यासारखे होत असणार; त्यामुळे आता तूच बनव काहीतरी आणि वाढ सगळ्यांना."
सासूबाईंनी प्रीतीला असे सांगताच तिच्या चेहऱ्याचा रंगचं उडाला होता.

"काय झाले ताईंना? मी बघून येऊ का? दुपारी गोळ्या घेतल्या आहेत  तर आता बरं वाटतं असेल त्यांना."
सगळी कामं करावी लागतील म्हणून प्रीती टाळायला बघत होती, पण आज तिचा नाईलाज होता.


"नको अग, करू दे तिला आराम. तू बनव तुला जे जमत असेल ते."
सासूबाई मात्र प्रीतीला जोर देऊन सांगत होत्या.

"बरं बघते मी."
असे म्हणून प्रीतीच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता.
तिला फारसे काही जमतं नव्हते; त्यामुळे तिने सगळ्यांसाठी मॅगी बनवली. मॅगी बनवायला काही लागत नाही, नुसतं पाण्यात उकळून सगळ्यांना वाढलं. ते कोणी खाल्लं सुद्धा नाही. त्यावेळी मात्र सगळ्यांना नामिताच्या हातच्या जेवणाची प्रकर्षाने जाणीव झाली.


क्रमशः