Login

थोरल्या सूनबाई - ४

थोरलेपणा दिसण्यात नाही तर वागण्यात हवा
थोरल्या सूनबाई - ४
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५

नमिताला बरे वाटतं नव्हते तरीही दुसऱ्या दिवशी उठून तिने सगळे केले. नवऱ्याचे पोट भरले नाही रात्री मॅगी खाऊन हे त्याने बोलून दाखवले होते.. आणि म्हणूनच तिने स्वतः ला लवकर बरे केले. जेवणाची तारांबळ होते; त्यामुळे तिला आजारी सुद्धा पडता येत नव्हते. आजारी पडले तरी आराम करता येत नव्हता.

दिवाळी आली, सकाळपासून नमिता किचनमधे जुंपली होती. सगळा स्वयंपाक तयार केला. दुपारी बाहेरचे अंगण झाडून पुसून स्वच्छ केले.

"प्रीती, रांगोळी काढशील का छानशी? तोपर्यंत मी पूजेची तयारी करते."
असे म्हणून नमिता आतमध्ये निघून गेली पूजेची तयारी करायला.


पणत्या घेऊन थोडा वेळाने नमिता बाहेर येऊन बघते तर काय! प्रीतीने रांगोळीच्या  नावाखाली चार फुले तोडून ठेवली होती. आता जय बोलावं तिला असे म्हणून प्रीती पुन्हा रांगोळी काढायला बसली. छान छोटीशी रांगोळी काढली आणि आजूबाजूने पणत्या ठेवून सजवले.


दिवाळी छान झाली. कसे का असेना सगळ्यांनी एकमेकांबरोबर छान हसून फोटो काढले. प्रीती मात्र नुसते स्वतः चेच फोटो काढण्यात बीजी होती. इकडे सगळ्यांना भूक लागली तरीही ती वाढायला मदत करत नव्हती. अखेर नमिताने एकटीनेच सगळे केले.. नेहमीप्रमाणे. सासूबाईंना मात्र तरीही तिचेच कौतुक.


अर्णवला मोठ्या शाळेत एडमिशन घ्यायचं, हे किती दिवस झाले चालले होते. नमिता चौकशी करून आलेली, पण विनायकला ऑफिसच्या कामातून वेळ मिळत नव्हता; त्यामुळे राहून जात होते. जेवण करता करता विनायकने बोलूनही दाखवले सगळ्यांसमोर. प्रीतीने सुद्धा कोणत्या शाळा चांगल्या आहेत याची यादी दिली, पण नमिताचे ठरले होते. अर्णव आता मोठा होतं होता, आई वडील म्हणून त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. नमिता तिच्या परीने होईल तितकं सगळं बघत होती.


"अहो, जाऊया का आपण उद्या त्या शाळेत? मला चांगली वाटली ती शाळा आणि स्वच्छता पण आहे सगळीकडे. मी अगदी वॉशरूम सुद्धा चेक करून आले आहे त्या शाळेमधले.. आणि प्रिंसिपल मॅडम पण चांगल्या बोलल्या."
नमिताने तिला जे वाटते ते सगळे बोलून दाखवले.

"हो जाऊया आपण. तू तयार रहा मग जाऊ आपण."
विनायक इतके बोलून झोपी गेला.


दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नमिता छान तयार झाली. घरातले सगळे काम तिने वेळेच्या आधी करून ठेवले. शाळेत जायला उशीर होईल म्हणून ती भरभर सगळं आवरत होती. सोबत अर्णवला सुद्धा तयार करत होती.

"तुला मॅडमने काही विचारले तर नीट उत्तरं दे. अजिबात घाबरु नको. इकडे तिकडे बघू नको. छान इंग्लिशमध्ये उत्तरं दे, मी शिकवले आहे ना तुला! अगदी तसेच बोल."
नमिता अर्णवकडून सगळे वदवून घेत होती.


"हो आई, मी देईन बरोबर उत्तरं."
छोटा अर्णव पण हसुन बोलत होता.

इतका वेळ होऊन गेला तरीही विनायक अजून घरी आला नव्हता. नमिता सारखी हॉलमधून आत बाहेर येरझाऱ्या घालत फिरत होती. 'इतका वेळ होऊन गेला तरी विनायक अजून कसा आला नाही.' असे म्हणून ती सारखी फोनमध्ये बघत होती.


"सॉरी सॉरी, आज मला उशीर होणार आहे घरी यायला. तुला सांगायचं विसरलो मी, आपण आज नाही जाऊ शकत शाळेमध्ये. पुन्हा कधीतरी जाऊया.. आणि आत्ता लगेच कुठे शाळा सुरू होणार आहेत का? मग का इतकी घाई करतेय तू? बघुया आपण नंतर."
असे म्हणून विनायकने पुन्हा तिला शांत केले.

नमिताला खरचं वाईट वाटतं होते. मुलाच्या काळजीने ती हे सगळं करत होती. दिवाळीनंतर शाळेमध्ये एडमिशन सुरू होऊन जातात आणि त्यानंतर लगेच बंदही होतात. आपल्या मुलाला चांगली शाळा मिळावी; म्हणून नमिता धडपडत होती, पण विनायक मात्र निवांत होता. त्याचं हेच वागणं तर तिला नेहमी खटकत होतं.


नमिता आपल्यावर नाराज आहे हे त्याला समजत होते.. आणि म्हणूनच विनायकने त्याच्या भावाला आणि प्रीतीला सांगून ठेवले होते, शाळा बघा म्हणून आणि प्रीतीने शाळा बघून त्याच्या एडमिशन विषयी चौकशी करून आली आणि अर्धी फी भरून सुद्धा आली होती.

जेवण करता करता प्रीतीने ते मुद्दाम बोलून दाखवले,"अर्णव आता मोठ्या शाळेत जाणार. नवीन शाळा, नवीन स्कूल बॅग, नवीन मित्र.. मज्जा आहे बाबा एका मुलाची."

"काय? अर्णवच्या शाळेत तू गेली होतीस?"
नमिता तिच्याकडे आश्चर्याने बघून बोलत होती.

"हो, आम्हाला दादांनी सांगितले की अर्णवची शाळा बघून या म्हणून. मग आम्ही दोघं शाळा बघून आलो आणि सगळं छान वाटलं म्हणून एडमिशन फी सुद्धा अर्धी भरुनच तिथून निघालो."
प्रीती अगदी मोठं तोंड करून बोलत होती.


"अग पण मला एक फोन करून तरी सांगायचं ना आम्ही ही ही शाळा बघायला आलो आहे. मी त्याच्या शाळेत जाऊन प्रिन्सिपल सोबत बोलून सुद्धा आले होते, फक्त ह्यांची वाट बघत होते की आम्ही दोघे जाऊ तेव्हा फी सुद्धा भरून टाकू म्हणून.. पण तू तर!"
नमिता थोडी नाराज होतंच बोलली.


"आम्ही फक्त शाळा आणि अर्धी फी भरून आलो आहोत. बाकीचं अजून बरंच बाकी आहे. तुम्ही दोघे उद्या किंवा परवा जाऊन ते सगळं बघू शकता."
प्रीती तिचं बोलून मोकळी झाली.

"बरं ठीक आहे. आम्ही उद्याच जातो आणि बस वगैरे काय लावायच ते सुद्धा बघावं लागेल."
असे म्हणून नमिता भांडी आवरू लागली.


"ताई, पण आम्ही इथल्याच शाळेत गेलो होतो. मग तुम्हाला बस लावायची काही गरज नाही. शाळा अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे."
प्रीती पुन्हा बोलली तेव्हा मात्र नमिताला समजले की हे दुसऱ्याच शाळेत अर्णवचे एडमिशन करून आलेले दिसताय.


क्रमशः