Login

थोरल्या सूनबाई - ५ अंतिम भाग

थोरलेपणा दिसण्यात नाही तर वागण्यात हवा
थोरल्या सूनबाई - ५
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५


"अगं पण मी तर बालाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बोलून आलेय."
नमिताने शाळेचे नाव सांगताच प्रीतीला समजले.

"अच्छा, पण आम्ही तर इथेच जवळच्या शाळेत गेलो होतो. आम्हाला वाटले की शाळा जवळ आहे; त्यामुळे त्याला सोडायला आणि घ्यायला बरे पडेल."
प्रीतीने तिची बाजू मांडली.


"अगं पण मला विचारायचं तरी, मला त्याला चांगल्या मोठ्या शाळेत घालायचं होतं. इथे जवळच्या शाळेत घालायचं असतं तर मी एकटी सुद्धा जाऊ शकले असते ना चौकशी आणि एडमिशन करायला."
नमिताचा राग तिच्या बोलण्यातून जाणवत होता.

"आता फी भरलीच आहे तर तुम्ही वर्षभर त्याला ह्या जवळच्या शाळेत राहू द्या मग पुढच्या वर्षी पुन्हा मोठ्या शाळेत घाला."
प्रीती सुद्धा तिचं बोलून रेटून सांगत होती.


"हे बघ, मला काही इथली शाळा आवडत नाही."
इतके बोलून नमिता तिथून तणतणत रूममधे निघुन गेली.


दुसऱ्या दिवसापर्यंत तिच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता. सकाळी उठून विनायक बरोबर बोलू असे तिने स्वतः शीचं ठरवून घेतले होते. सकाळी सगळं झाल्यावर ती विनायक सोबत बोलू लागली.

"तुम्हाला वेळ नसेल तर तसे सांगा मी एकटी घेऊन जाईन अर्णवला शाळेत."
ती ठामपणे सगळ्यांसमोर बोलू लागली.

"वहिनी, अहो आम्ही कालच तर त्याच एडमिशन करून आलोय."
दिराला तर काहीच माहिती नव्हते.

"भावजी, मला इथल्या शाळेत नव्हते घालायचे हो. त्याला चांगल्या मोठ्या शाळेत घालायचं म्हणून तर थांबले होते इतके दिवस."
नमिता त्याच्याशी शांतपणे बोलू लागली.


"बरं आता असू दे, इथल्या शाळेत झाली आहे फी भरून तर राहू दे त्याला इथेच. नंतर पुन्हा बघू आपण काही वर्षांनी दुसऱ्या शाळेत." असे म्हणून विनायक ऑफिसला जायला निघायची तयारी करत बोलत होता, पण नमिता मात्र चांगलीच भडकली होती.

"पण तुम्ही का बोलले नाही माझ्याशी, मला माझ्या मुलाला आत्ताच त्या शाळेत घालायचं आहे. आणखी काही वर्षांनी नाही.. आणि हे माझं ठरलेलं होतं. तुम्हाला सुद्धा सांगितले होते मी, की जाऊया आपण शाळेत. पण नाही.. तुम्हाला तर वेळच नसतो ना घरातल्या कामासाठी."
नमिता चांगलीच आवाज चढवून बोलत होती; त्यामुळे देवघरात असलेल्या सासूबाई आणि सासरे सुद्धा बाहेर येऊन बघू लागले.

"बरं ठीक आहे, मी आल्यावर बघू."
असे म्हणून विनायक निघू लागला.

"ताई, आता आम्ही अर्धी फी भरून आलोच आहे तर राहू द्या त्याला ह्या शाळेत."
प्रीती उगाच मध्ये बोलत होती.


"मलाही माझ्या मुलाचं भविष्य कळत; त्यामुळे फी भरायच्या आधी मला एकदा विचारले असते तरी चालले असते."
नमिताने पण तिला लगेच उत्तर दिले.


"नमिता! आपण बोलूया संध्याकाळी."
विनायक आता चिडून बोलला आणि निघून गेला.

सगळे आपापल्या कामाला निघून गेले. इकडे घरात नमिता मात्र डोक्याला हात लावून बसलेली. तिला खूप वाईट वाटत होते. आपल्या मुलाचं भविष्य चांगल व्हावं हे कोणत्या आईला वाटणार नाही? नमिता चांगलाच विचार करत होती.

संध्याकाळी विनायकाला घरी यायला उशीर झाला; त्यामुळे आधी नमिताने सगळ्यांना जेवायला वाढले. मनात कितीही राग असला तरी जेवणावर त्याचा परिणाम व्हायला नको; म्हणून तिने सगळ्यांना नेहमीप्रमाणे वाढले.


सगळ्यांची जेवणं झाली आणि बाहेर सोफ्यात सर्वजण गप्पा मारत बसलेले. सासू सासरे, प्रीती आणि सासूबाई देखील बोलत बसलेल्या. नमिता किचनओटा साफ करत होती. इतका वेळ मनात दडपून ठेवलेलं तिला केव्हा बोलून मोकळी होऊ असं झालं होतं. तिचं आवरून झाल्यावर ती लगेचच बाहेर आली.

"निदान आता तरी बोला तुम्ही?"
नमिता नवऱ्याला विचारते.

"मला काहीच कळत नाही असं वाटतं का तुम्हा सगळ्यांना?
मी सुद्धा चांगली शिकलेली आहे, नवऱ्याला आवडत नाही जॉब करणारी; म्हणून घरात बसले. सासू सासर्यांची सेवा करतेय. याचा अर्थ असा नाही, की मला काही येत नाही किंवा काही समजत नाही. मला कोण कसं वागत बोलतं हे सर्व समजत आणि दिसतं देखील.. पण तरीही मी शांत बसते. आपल्यात उगाच ह्या गोष्टींवरून वाद नको म्हणून.. पण आता विषय माझ्या मुलाच्या भविष्याचा आहे; त्यामुळे तुम्ही मला देखील विचारायला हवे होते. परस्पर सगळं तुम्ही ठरवून मोकळे कसे झाले? माझे मत घेणे, मला विचारणे तुम्हाला योग्य वाटले नाही का? की नेहमीप्रमाणे मला ह्यावेळी पण गृहीत धरले?"
नमिताचे बोलून झाल्यावर दीराला खरचं वाईट वाटले.


"हो वहिनी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आम्ही नेहमीच तुम्हाला गृहीत धरले, पण आता यापुढे नाही. तुम्हाला पाहिजे त्याच शाळेत अर्णवचे एडमिशन घेऊया. फी भरली म्हणून त्याच शाळेत ऍडमिशन घ्यायला पाहिजे असे काही नाही. अर्णवचे ऍडमिशन असो किंवा घरातले आणखी काहीही.. यापुढे तुमचे मत सुद्धा विचारात घेतले जाईल."
दिर बोलत होता, प्रीती त्यांच्यामध्ये बोलणारच होती पण त्याने तिला हातानेच आता नको बोलू म्हणून इशारा केला; त्यामुळे ती गप्प बसली होती.


"होय, चुकलेच माझेही. मी तुम्हा दोघींना सारखीच वागणूक द्यायला हवी."
सासूबाई पण आता नमिताच्या बाजूने बोलत होत्या.


अनेकदा आपण बघत असतो, की एकाच घरातल्या दोन सुनांना वेगळी वागणून दिल्यासारखे वाटतं असते. खरंतर तसे नसावेच, पण कदाचित आपल्याच बघण्यात चुकीचं येत असणार म्हणून तसे वाटणे साहजिक आहे. दोन सूना असल्या तर दोघींना सारखेच घ्यायला हवे आणि दोघींपैकी एकीलाही असे कधीही वाटू नये, की तिला गृहीत धरले जाते. एकतर बोलून मोकळे होणे किंवा मग असे मनातल्या मनात कुढत बसल्याने समोरच्या बद्दल राग आणखी वाढत जातो आणि द्वेष निर्माण होतो. चांगले घर म्हणून ओळख असणारी ही माणसे कधी एकमेकांचे वैरी होऊन बसतात हे कळत देखील नाही; त्यामुळे  आपापसात कायम खेळीमेळीचे वातावरण ठेवले तरच घराचे गोकुळ होते.


समाप्त