Login

थोरली जाऊ..

थोरली जाऊ... कथा दोघींच्या नात्याची..
थोरली जाऊ..
©अनुप्रिया

“यशोदा, तुझ्यासारखी जाऊबाई मिळणं म्हणजे भाग्यच! नाहीतर आमच्या जाऊबाई! काय सांगू तुला? तू कशी सगळ्यांचं सगळं मनापासून करतेस! सर्वांची काळजी घेतेस! हे घर तुझ्यामुळेच उजळून निघालंय..”

“मोहित्यांची सुन म्हणजे एकच नंबर.. सर्वगुणसंपन्न..”

“अनया, किती लकी आहेस यार तू! तुझी मोठी जाऊबाई किती चांगली आहे! तुला कशाला हात लावू देत नाही. तुझं सगळं मायेने करतात. मज्जा आहे बाबा तुझी..”

आज मोहित्यांच्या घरी श्रीसत्यनारायणाची पूजा होती. यशोदाने सारं नीट पार पाडलं होतं. सर्वांची व्यवस्था ती जातीने पाहत होती. घरी आलेले पाहुणे निघताना यशोदाचं कौतुक करत होते.

अनया राग उफाळून येत होता.

“दर वेळेला हेच! जाऊबाई, जाऊबाई… जणू बाकीच्यांना किंमतच नाही.”

अनया तोंडातल्या तोंडात पुटपुटली. यशोदाने तिचं बोलणं ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं आणि स्मित हास्य करत पाहुण्यांना निरोप देत होती.

दुसऱ्या दिवशी यशोदा अनयाला म्हणाली,

“अनया, आजची भाजी तू चिरशील का? बाकी स्वयंपाकाचं मी बघते.”

“तुम्हीच सगळं करणार असाल तर माझ्यासाठी काय काम उरलंय? मी फक्त भाजी चिरणारी वाटते का तुम्हाला?”

अनया फणकाऱ्याने म्हणाली. यशोदा शांत आवाजात तिच्याकडे पाहत म्हणाली,

“अगं, तुझा त्रास होऊ नये म्हणून..”

“त्रास? की सगळं नाव तुमचंच रहावं म्हणून?”

यशोदाचं बोलणं मधेच तोडत अनयाने प्रश्न केला. यावर यशोदाने शांत बसणं निवडलं आणि ती बाहेरच्या खोलीत निघून गेली. त्याच रात्री अनया आपल्या नवऱ्याशी तावातावाने भांडत होती.

“साहिल, तुझ्या यशोदा वहिनीचं घरातलं राज्य पाहिलंस? मी काही केलं तरी कुणालाच दिसत नाही.”

“अनया, यशोदा वहिनी कधी काही चुकीचं करत नाहीत. त्या आजवर कायम या घराचाच विचार करत आल्यात.”

असं म्हणून साहिल पुन्हा मोबाईलमध्ये पाहू लागला.

“अरे म्हणजे मी काहीच करत नाही का? कुणी माझं नावच घेत नाही!”

“तू स्वतःला कमी समजतेयस. यशोदा वहिनी तुझ्या शत्रू नाहीत.”

साहिल त्रासून म्हणाला तसं अनया वळून रडायला लागली. मनात थोरल्या जाऊबाईबद्दल ईर्षा निर्माण होऊ लागली.

साहिल आणि अनयाचं दोन महिन्यापूर्वीच मोठ्या थाटामाटात लग्न झालं. तेंव्हाही सारेजण यशोदाचं कौतुक करत होते पण अनया नवीन असल्याने तिला त्याचं तितकं वाईट वाटलं नव्हतं. यशोदा, विश्वनाथची बायको, मोहित्यांची थोरली लाडकी सुन.. घरात तिचा आनंदी वावर.. सर्वांची काळजी घेणारी, हवं नको ते पाहणारी, साऱ्या घराला जोडून ठेवणारी, सणवार, पै पाहुणे सारं काही मनापासून सांभाळणारी, शेजाऱ्यांशीही मनमोकळेपणाने बोलणारी, कधीच कोणाला न दुखावणारी सर्वांची लाडकी यशोदा वहिनी..

यशोदाने अनयाचं मनापासून स्वागत केलं. सुरवातीचे दिवस छान गेले. पण हळूहळू अनयाला यशोदाचं सारखं होणारं कौतुक खटकू लागलं. यशोदाबद्दल राग, तिरस्कार निर्माण होऊ लागला.

‘हिलाच फक्त प्रौढी मिरवायची असते.. बाकीचे मूर्ख.. सर्वांचे तोंडी फक्त यशोदा वहिनी.. मी कोणालाच दिसत नाही. ती मोठी म्हणून सगळं कौतुक, मान तिलाच.. मग मला कशाला लग्न करून आणलंय? टाईमपास म्हणून? याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. उद्याच जाब विचारते. मी आता शांत बसणार नाही. समजते काय स्वतःला?”

अनया तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि मनाशी एक पक्का निर्धार करून यशोदाला जाब विचारण्यासाठी थेट यशोदाच्या खोलीत गेली.

“वहिनी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे.”

“हो बोलूयात नं.. पण त्या आधी गरमागरम पोहे केलेत ते खाऊन घे.. थंड झाले की चांगले नाही लागतं.”

यशोदाने हसून पोह्यांची डिश पुढे केली.

“का करता तुम्ही सगळं? तुमचं कौतुक व्हावं म्हणून?”

अनयाने यशोदाला थेट प्रश्न केला. यशोदा अजूनही शांत उभी होती.

“तुमची सततची स्तुती… मला आवडत नाही. सर्वांच्या तोंडी फक्त तुमचंच नाव. माझं काहीच नाही. मी पण या घरची धाकटी सुन आहे हे सगळे कसं काय विसरतात?”

यशोदा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली,

“अनया, मी कुणाकडून स्तुती मागत नाही. लोक आपलं प्रेम बोलून दाखवतात.”

“पण मग मी? मी अस्तित्वातच नाही का?”

“तू आहेस… आणि खूप महत्त्वाची आहेस. पण तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्याशी स्पर्धा करतेयस. त्याची काहीच गरज नाही अगं.. तू जे आहेस, तेच घराला पुरेसं आहे.”

यशोदाच्या बोलण्यावर अनया काहीच बोलली नाही. पण राग आत तसाच धूमसत राहिला.

“तिला मोठेपणा हवाय नं? करू दे मग सगळं.. यापुढे मी घरातलं काहीच काम करणार नाही. माझी काय गरज? यांची यशोदा वहिनी करेलच ना..”

दिवसेंदिवस तिच्या मनातला यशोदेबद्दलचा राग वाढतच होता. यशोदाला धडा शिकवण्यासाठी अनयाने मुद्दाम घरातल्या कामातून अंग काढून घेतलं. ती घरातल्या कसल्याच कामाला हात लावत नव्हती. दिवसभर ती तिच्या खोलीत झोपून असायची. यशोदाने आवाज दिल्यावर फक्त खाण्यापिण्यासाठी बाहेर यायची. तरी यशोदा शांतच होती. तिने कसलीच तक्रार केली नाही. याचाही अनयाला त्रास होत होता.

एक दिवस अनयाने यशोदाला तिच्या कपाटात काहीतरी लपवताना पाहिलं. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.