Login

थोरली भाग-२

थोरली असण्याचा हक्क मिळेल का?
शीर्षक: थोरली भाग-२

" आई, तू काही काळजी करू नकोस. मी तुझी नेहमी काळजी घेईन. तुला माझ्यासोबत ठेवून तुझे सर्व काही मीच बघणार आहे."  निशांत आपल्या आईला म्हणाला.

" माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मला कोणाचाच आधार नाहीये. हे सुद्धा मला असे सोडून गेले." असे म्हणून उर्मिला आपल्या नवऱ्याच्या आठवणीने रडत होती.

उर्मिलाची सून नंदिनी यावर काहीच बोलली नव्हती.

" आई तू थोडावेळ आराम कर. आता अधून मधून लोक येत राहतात. तुझी तब्येत आता आम्हाला जास्त महत्त्वाची आहे."  निशांत म्हणाला.

अनिता सुद्धा दोन दिवस राहण्याचा हट्ट करून आलेली होती आणि यावेळेस तिच्या सासुने तिला राहायला सांगितले होते. तिचा नवरा सुद्धा दुसऱ्या दिवशी घ्यायला येणार होता, परंतु मृत्युपत्राचे वाचन सुद्धा त्यावेळेस होणार होते आणि म्हणूनच तिने दुपारी त्याला यायला सांगितले होते.

भावकीतील माणसे आणि काही नातेवाईक यांच्यामध्ये मृत्युपत्रावरून दबक्या आवाजात चर्चा होत होती.

आपली आई झोपली आहे, असे समजून निशांत तिच्या बाजूला असणाऱ्या आपल्या खोलीच्यामध्ये असणाऱ्या जागेत आपल्या बायकोने बोलावलेले होते; म्हणून आलेला होता.

" काय गं ? काय काम आहे?  सगळे बाहेर माणसे त्यांच्यामधनं असं मध्येच उठून यायला मला कसतरी वाटतं."  निशांत आपल्या बायकोला म्हणाला.

" महत्वाचं काम आहे, म्हणूनच तर बोलावलं आहे ना; नाहीतर मी कशाला तुम्हाला बोलावले असते?"  नंदिनी म्हणाली.

" बरं, बोल काय बोलायचं आहे तुला?" तो म्हणाला.

" ते मगाशी काय चाललेलं होतं ? मी तुला आई सांभाळेन  म्हणून, हे बघा उद्या मृत्युपत्र वाचेपर्यंतच आपण शांत बसायचे आहे. त्यानंतर इथली जमीन आणि शेती विकून टाकू. असे या गावात काय राहिले आहे आणि तुमच्या आईला मी काही सांभाळत बसणार नाही. तिला सरळ वृद्धाश्रमात ठेवणार आहे."  नंदिनीने आपला निर्णय सांगितला.

" हो, आता जरा शांत बस. आधीच इथे खूप सारे लोकं आहेत आणि हे सर्व ऐकले की पुन्हा त्याच्यावरून तमाशा नको व्हायला." तो आपल्या बायकोला म्हणाला.

हे सर्व त्यांचे बोलणे एका व्यक्तीने ऐकले होते. डोळ्यांतून पाणी अश्रू रूपात वाहत होते. त्या व्यक्तीने त्या दोघांना जाब न विचारण्याचे ठरवले.

"आई, थोडं खाऊन घे. तू काहीच नाही खाल्ले."  तिला आपली मुलगी म्हणाली.

" आता आम्हाला तूच आहेस. बाबा नंतर आम्हाला तुझाच आधार आहे, त्यामुळे तू आजारी पडू नकोस."  अनिता आपल्या आईला म्हणाली.

उर्मिलाने सुद्धा आपल्या मुलीचे ऐकून घेतले आणि तिच्या हातातील घास खाल्ला. आपल्या नवऱ्याचे आठवण काढून ती रडायला लागली.

आपल्या आईला तिने जवळ घेतले आणि तिला सावरायला सांगितले, तसेच आपल्या हाताने पूर्ण जेवण आपल्या आईला तिने भरवले.

" तुझी तब्येत बरी आहे ना ? तुला दोन वेळा चक्कर आलेली होती, असे मी ऐकले."  उर्मिलाने आपल्या मुलीला काळजीने विचारले.

" हो, आता मी बरी आहे. बाबा गेल्याचे मनापासून खरे वाटत नाही, पण यांनी आणि सासुबाईंनी सांगितले आहे की, मी थोरली असल्यामुळे मला खंबीर राहावे लागणार आहे. थोडा वेळ लागेल आपल्याला पण आपण नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बाबांना सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा असणार."  ती डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाली.

" उर्मिला, पुढे जाऊन आपल्याला आपली पोरगीच सांभाळणार आहे. बघ तू कितीही तुझा पोरगा... तुझा पोरगा... असा जप केलास, तरी त्याचा काही उपयोग नाही." आपल्या नवऱ्याचे हे बोल उर्मिलाला आठवत होते.

रात्री तिला काही झोप लागली नव्हती. नवरा जाऊन बारा दिवस झालेले होते. आता विधवेचे आयुष्य आपल्याला इथून पुढे काढावे लागणार याचा विचार करूनच तिचे मन भरून आले होते.

बाजूलाच आपल्या मुलीला झोपलेले बघून तिच्या बालपणापासून ते तिचं लग्न होईपर्यंत, एक एक गोष्टी दिला आठवायला लागल्या होत्या.

असाच विचार करत कधी पहाटे तिचा डोळा लागला ते समजलेच नव्हते.

क्रमशः

निशांत आणि त्याच्या बायकोचे खरे रूप समजेल का?

©विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
0

🎭 Series Post

View all