शीर्षक: थोरली भाग-३(अंतिम)
सकाळ झाली होती आणि सर्व विधी झाल्यानंतर आज मृत्युपत्र वाचण्यात येणार होते, हे सर्वांना माहीत होते. सकाळपासून उर्मिलाच्या सुनेने सर्व काही आपल्या हातात घेतले होते. अगदी चहा-नाष्टा सर्व आपल्या सासुच्या हातात देत होती, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या पाहण्यांना आम्ही त्यांना आमच्या सोबत घेऊन जाणार, असे सांगून झाले होते.
काही नातेवाईक सून किती चांगली आहे, म्हणून नंदिनीचे कौतुक करत होते.
अनिताला सुद्धा आपली वहिनी आपल्या आईची काळजी घेते, हे ऐकून आणि समोर पाहून समाधान वाटत होते.
मृत्युपत्र वाचण्यासाठी वकील आले होते. तिथे वकिलांना जास्त वेळ थांबता येणार नव्हते, तसेच काही कामासाठी सुद्धा बाहेर जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच घरातील लोकांना जमा होण्यासाठी त्यांनी सांगितले.
निशांत आणि नंदिनी यांना सगळे आपल्यालाच मिळणार आहे, या अविर्भावामध्ये दोघे होते. त्यांच्या मते मृत्युपत्र हे फक्त वाचण्यासाठी आहे, पण त्यांच्या बाबांनी त्यांना सगळ्या गोष्टी दिलेल्या असणार, यामुळे मनातल्या मनात त्यांना आनंद होत होता; परंतु सगळ्यांसमोर दाखवू शकत नव्हते. म्हणून चेहरा त्यांनी निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
अनिताचा नवरा सुद्धा तिला घेण्यासाठी त्यावेळी तिथे आलेला होता. हे सर्व ऐकण्याच्या नादामध्ये आलेल्या जावयाला घरातील कोणी साधे पाणी सुद्धा विचारले नव्हते, हे उर्मिलाच्या ध्यानात आले होते.
तेवढ्यात अनितानेच उठून आपल्या नवऱ्याला पाणी दिले आणि तसेच चहा वगैरे काही पाहिजे का याबद्दल विचारले होते, परंतु त्यांनी मृत्युपत्र फक्त ऐकण्यासाठीच थांबण्याबद्दलचे कारण दिले. तसेही अनिताचे सासरं हे आर्थिक दृष्ट्या भक्कम होते. त्यांना जरी मृत्युपत्रामध्ये काही सुद्धा मिळाले नाही, तरीसुद्धा त्यांना काही फरक पडणार नव्हता. अनिताच्या नवऱ्याला माहीतच होते की, तिचे बाबा सोडून बाकीच्या घरच्यांचा तिच्या प्रती काय भावना आहेत, हे त्यांनी बघितले होते.
मृत्युपत्र वाचायला सुरुवात झाली. मृत्युपत्र फार काही मोठे लिहिले नव्हते. फक्त अनिताच्या बाबांनी हे शुद्धीत लिहिले आहे, हे आधीच सांगितले होते. जस जसे मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात झाली तसेच आधीचा उत्साह काहीजणांचा मावळला होता. त्याला कारणही तसेच होते. घर आणि थोडी शेतजमीन आपल्या बायकोच्या नावावर ठेवून बाकी पूर्ण संपत्ती ही अनिताच्या नावावर करावी, असे सांगितले होते. हे सर्व ऐकून निशांत आणि नंदिनीला धक्का बसला होता, कारण आपल्या नावावर काहीच ठेवले नाही, हा धक्का त्यांना पचत नव्हता.
" अजून काही दुसरे कागदपत्र असेल तर ते सुद्धा वाचा." नंदिनीने मग वकिलांना सांगितले.
" नाही, हे एवढेच आहे. याच्यामध्ये जे सांगितले आहे, त्याप्रमाणे कायदेशीररीत्या सर्व गोष्टींची वाटणी होईल." वकील म्हणाले.
" असे कसे माझ्या नवऱ्याला काहीच मिळाले नाही ? बाबा असे करणारच नाहीत. हे मृत्युपत्र चुकीचे तर नाहीये ना ?" नंदिनीला धक्का सहन न झाल्यामुळे ती काहीही बोलत होती.
अनितासाठी सुद्धा हा धक्काच होता आणि आपण जे ऐकले त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न तिला पडला होता. काही वर्षांपूर्वी बाबांची नोकरी गेल्यानंतर घरामध्ये पैशाची त्यावेळेस जास्त गरज होती. अनितानेच नोकरी करून आपल्या भावाचे शिक्षण थांबू नये, म्हणून दिवस-रात्र मेहनत केली होती. ती घरातील थोरली मुलगी आहे आणि तिने हे करायलाच हवे, त्यात काही वेगळे नाही असे उर्मिलाला वाटत होते.
अनिताच्या बाबांना आपल्या मुलीचे कष्ट नेहमीच दिसले होते आणि म्हणूनच त्यांनी तिचे योग्य मुलाशी लग्न लावून दिले होते. तिला नोकरी करायची काहीच गरज नव्हती, परंतु तरीसुद्धा ती ऑनलाईन क्लास घेऊन ती; तिचा छंद जोपासत होता होती.
" आई, तुला पण हे पटत नाहीये ना? बाबांनी असं कसं केलं?" निशांत आपल्या आईकडे आशाने बघत म्हणाला.
" त्यात तर लिहिले आहे ना की, त्यांनी शुद्धीमध्ये लिहिले आहे आणि बरोबरच केले आहे." उर्मिला शांतपणे आपल्या मुलाकडे बघत म्हणाली.
आपल्यावर अमाप प्रेम करणारी आई, अशी अचानक बोलल्यामुळे निशांतला तर पुढे काय बोलावे हे सुचत नव्हते. लोकांना सुद्धा समजले होते की, इथे संपत्ती आणि त्याच्या वाटणीवरून भांडण होणार, त्यामुळे त्या भांडणात आपण पडायला नको म्हणून प्रत्येकाने त्यांना निरोप देऊन काळजी घेण्याचे सांगून, तिथून काढता पाय घेतला.
" अनिता, तुला माहीत आहे का, तुझ्या बाबांनी मला थोडसं ठेवून सर्व संपत्ती तुझ्या नावाने यांनी का केली ?" उर्मिलाने विचारले.
" मला पण तेच समजत नाहीये. खरे तर हे निशांतला मिळायला हवे होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी जातात, तेव्हा त्यांचा माहेरशी संबंध येत नाही; असे नेहमी तूच म्हणायचीस ना! बाबा असे काही करतील याचा कधी मी विचारच केला नव्हता." अनिता म्हणाली.
" खरे तर तुझ्या बाबांनी तुझे थोरलेपण जपण्याचा प्रयत्न केला. मी तर माझ्या मुलाच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. तुला माहीत आहे, तुझे बाबा दूरचा विचार करायचे. त्यावेळी मात्र मला काही पटायचं नाही, परंतु हा तुझा लहान भाऊ आणि तुझी वहिनी आज मृत्युपत्र वाचल्यानंतर त्यांच्या नावावर सगळं झाल्यावर, ते हे सगळं विकून ते मला शहरात नेऊन वृद्धाश्रमात टाकणार होते." कालचे ऐकलेले बोलणे ऐकून उर्मिला रागाने म्हणाली.
" काय ? निशांत मी हे काय ऐकते आहे ? " आता मात्र अनिताला सुद्धा राग आला होता.
" आई, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, आम्ही तुला वृद्धाश्रमात कशाला टाकू ?" तो जरा बिचकतच म्हणाला.
" हे तुझ्या बायकोला विचार ना. तू तर ती म्हणेल ते सर्व ऐकतोस. तुला माहीत आहे, तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे पोरगीच तुला शेवटपर्यंत जपणार त्याच्या प्रेमामध्ये आंधळी होऊ नकोस. डोळे उघड आणि तेच डोळे माझे आज उघडले आहेत.
मी हे राहतं घर जे माझ्या नावावर आहे, ते मी तुला देऊन टाकत आहे. ज्या घरामध्ये माझ्याशी प्रेम करण्याचे नाटक केले. त्या घरामध्ये मी राहू शकत नाही." उर्मिला हुंदका गिळत म्हणाली.
" आई, तुला जर इथे राहायचं नसेल तर तू माझ्यासोबत माझ्या घरी चल." अनिताने आता एक वर आपल्या नवऱ्याकडे बघितले आणि त्यानेही आपली होकारार्थी मान हलवली.
" कुठल्या तोंडाने तुझ्याकडे येऊ बाळा? तुझ्या जन्मापासून मी तुझ्याशी नीट वागले नव्हते. तुझे बाबा मला खूप वेळा समजवायचे, परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. खरंच आता मला या सगळ्याची जाणीव होते. तुझ्यासोबत चुकीचं वागल्याबद्दल मी तुझी माफी मागते. " उर्मिला आपल्या मुलीकडे डोळे भरून हात जोडत म्हणाली.
" आई, तू हात जोडू नकोस आणि असं समज की आता तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे तू कोणताही संकोच न करता माझ्यासोबतच आपल्या घरी राहायला ये." ती म्हणाली.
उर्मिला सुद्धा आपल्या मुलीसोबत तिच्या सासरी राहण्यासाठी गेली. त्यावेळी निशांतनेही अडवले नव्हते ना त्याची बायको नंदिनी हिने अडवले होते. कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असेच त्यांना वाटत होते. ह्या सगळ्यात उर्मिला सुद्धा सामील आहे, असा त्यांना संशय येत होता.
उर्मिलाच्या नवऱ्याने सर्व विचार करूनच निर्णय घेतला होता. मृत्युपत्राबाबत कोणालाही माहीत नव्हतं. थोरलेपण जरी अनिता कडे असले तरी ते कधी तिने मिरवण्याचा प्रयत्न केला नव्हता. थोरली म्हणजे अर्थातच जेष्ठ मुलगी म्हणून तिने नेहमीच घरावर आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला होता. तसेच खूप गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले थोरलेपण कृतीने जपले होते. म्हणूनच थोरली मुलगी किती चांगली आहे, हे सांगत आणि मुलीचे गुणगान गात आता उर्मिला थकत नव्हती.
समाप्त.
©विद्या कुंभार.
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा