डिसेंबर -जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ३१
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ३१
महाबळेश्वरच्या त्या जुन्या 'शांती सदन' इमारतीमध्ये एका बाजूला भावनांचा महापूर होता, तर दुसऱ्या बाजूला मृत्यूचा अक्राळविक्राळ जबडा उभा होता. आरवने पंधरा वर्षांनी आपल्या आईचा चेहरा पाहिला होता. तो चेहरा थकलेला होता, डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती, पण त्या स्पर्शात मात्र तीच जुनी ऊब होती.
"आई..." आरवच्या ओठातून निघालेला तो शब्द विक्रम सिंघानियाच्या क्रूर हास्यात विरून गेला.
"किती भावनिक दृश्य आहे ना?" विक्रमने आपल्या पिस्तूलचा घोडा मागे ओढला. "पण दुर्दैवाने, हे पुनर्मिलन फार काळ टिकणार नाही. आरव, तू इथपर्यंत पोहोचून स्वतःच्या मृत्यूला आमंतरण दिलं आहेस. मला वाटलं होतं तू तुझ्या पत्नीला वाचवण्यात मग्न असशील, पण तू तर माझ्या वडिलांच्या सर्वात मोठ्या गुपितापर्यंत पोहोचलास."
आरव हळूच सुलोचनाच्या समोर उभा राहिला, तिला स्वतःच्या शरीराचे कवच बनवून. "विक्रम, तुला काय वाटतं? मला मारून तू सुखी राहशील? माझ्या पत्नीकडे, मितालीकडे सर्व पुरावे पोहोचले आहेत. तू आज ना उद्या तुरुंगात जाणारच आहेस."
"पुरावे?" विक्रम हसला. "कोणते पुरावे? ती रक्ताळलेली डायरी? ती तर आता माझ्या ताब्यात असेल. आणि तुझी पत्नी? ती आत्ता पोलीस कोठडीत आपल्या आयुष्याचा शेवटचा विचार करत असेल. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही."
इतका वेळ शांत बसलेली सुलोचना अचानक उभी राहिली. तिच्या डोळ्यांतील ती धूसरता आता नाहीशी झाली होती. तिने विक्रमच्या हातातील पिस्तूलकडे पाहिले आणि मग आरवकडे.
"आरव... हा प्रताप सिंघानियाचा मुलगा आहे ना?" सुलोचनाचा आवाज स्पष्ट आणि करारी होता.
विक्रम दचकला. "अगं ए म्हातारे! तू गप्प बस. तुला तर मी वेडं ठरवून इथे डांबून ठेवलं होतं."
"मी वेडी नव्हते रे, मला औषधं देऊन तसं बनवलं गेलं होतं," सुलोचना पुढे सरसावली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. "आरव, याच्या वडिलांनी तुझ्या बाबांना मारलं. माझ्यासमोर तुझ्या बाबांची गाडी दरीत ढकलली गेली होती. मी साक्षीदार होते म्हणून मला इथे कैदेत ठेवलं गेलं. पण प्रताप विसरला की, अन्यायाचा डोंगर कितीही मोठा असला तरी सत्याची एक ठिणगी त्याला जाळून खाक करू शकते."
"पुरे झालं तुमचं नाटक!" विक्रम ओरडला आणि त्याने गोळी झाडण्यासाठी बोट दाबले.
पण त्याच क्षणी आरवने सुलोचनाला बाजूला ढकलले आणि स्वतः विक्रमवर झडप घातली. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. विक्रम सुदृढ होता, पण आरवच्या अंगात आपल्या आईला वाचवण्याचे आणि वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचे बळ संचारले होते. पिस्तूल लांब फेकले गेले.
दुसरीकडे, पुणे पोलीस कोठडीत मितालीची अवस्था बिकट होती, पण तिने हार मानली नव्हती. वकील सानप आणि दीपक तिथे पोहोचले होते. त्यांच्याकडे आरवने दिलेला तो पेनड्राइव्ह आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज होते.
"इन्स्पेक्टर, हे बघा!" सानप यांनी लॅपटॉपवर एक व्हिडिओ प्ले केला. "हा विक्रम सिंघानियाच्या पीएचा कबुलीजबाब आहे, जो आम्ही काल रात्री रेकॉर्ड केला. यात त्याने स्पष्टपणे सांगितलंय की मिताली मॅडमच्या चित्रांच्या प्रदर्शनात बनावट कागदपत्रे कोणी ठेवली आणि 'मनी लाँड्रिंग'चा खोटा आरोप कसा रचला गेला."
इन्स्पेक्टरने तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. "पण सानप सर, जोपर्यंत विक्रम सिंघानिया समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही यावर कारवाई करू शकत नाही."
"विक्रम सिंघानिया महाबळेश्वरला आहे, आरव सरांच्या आईला मारण्यासाठी!" दीपक ओरडला. "जर तुम्ही आत्ता तिथे पोहोचला नाहीत, तर दोन खून होतील."
मितालीने हे ऐकले आणि तिचे काळीज धडधडले. "आरव! इन्स्पेक्टर, प्लीज मला जाऊ द्या. मला माहित आहे तिथे काय चाललं असेल."
महाबळेश्वरमध्ये पाऊस सुरू झाला होता. विजांच्या कडकडाटात आरव आणि विक्रम एकमेकांचे जीव घेण्यासाठी धडपडत होते. विक्रमने आरवचा गळा आवळला होता. आरवला श्वास घेणं कठीण होत होतं.
"आज तुझा शेवट नक्की आहे, आरव देशपांडे!" विक्रम गर्जला.
सुलोचनाने आजूबाजूला पाहिले. तिला कोपऱ्यात एक जड पितळी फुलदाणी दिसली. तिने ती उचलली आणि पूर्ण ताकदीनिशी विक्रमच्या डोक्यात घातली. विक्रम रक्ताळलेल्या अवस्थेत खाली कोसळला.
आरवने जोरात श्वास घेतला. "आई... तू ठीक आहेस ना?"
"मी ठीक आहे बाळा, पण आपल्याला इथून निघावं लागेल. विक्रमचे माणसं बाहेर असतील," सुलोचना म्हणाली.
आरवने विक्रमचे पिस्तूल उचलले आणि आईचा हात धरून तो बाहेरच्या दिशेने धावला. पण बाहेर आल्यावर त्याला दिसले की विक्रमच्या चार अंगरक्षकांनी त्यांना घेरले आहे.
"आता कुठे जाणार?" एक अंगरक्षक पुढे आला.
पण अचानक बाहेरून पोलीस गाड्यांच्या सायरनचा आवाज आला. इन्स्पेक्टर आणि त्यांच्यासोबत मिताली सुद्धा तिथे पोहोचली होती. सानप यांनी तातडीने जामीन मिळवून मितालीची सुटका केली होती आणि ते सर्व आरवच्या मदतीला धावून आले होते.
पोलीसांना पाहताच अंगरक्षकांनी हात वर केले. मिताली धावत आली आणि तिने आरवला मिठी मारली.
"आरव! तुम्ही ठीक आहात ना?" मिताली रडत विचारले.
"मी ठीक आहे मिताली... आणि बघ, मी कोणाला घेऊन आलोय," आरवने सुलोचनाकडे इशारा केला.
मितालीने सुलोचनाला पाहिले. तिला विश्वासच बसत नव्हता. तिने सुलोचनाच्या पायाला स्पर्श केला. "आई..."
सुलोचनाने मितालीच्या डोक्यावरून हात फिरवला. "आरवने मला तुझा फोटो दाखवला होता. तू या घराची खरी रक्षक आहेस, लेकी."
विक्रम सिंघानियाला अटक करण्यात आली. त्याच्या वडिलांना, प्रताप सिंघानिया यांनाही पोलिसांनी त्यांच्या घरातून उचलले. देशपांडे आणि सिंघानिया या दोन घराण्यांमधील पंधरा वर्षांपासून चाललेले हे रक्तरंजित युद्ध संपल्याचे चित्र दिसत होते.
दोन दिवसांनंतर, आरव, मिताली आणि सुलोचना त्यांच्या नवीन लहानशा घरात बसले होते. सुलोचना आता हळूहळू सावरत होती.
"आरव, आता सगळं संपलं ना?" मितालीने विचारले.
"हो मिताली, पण मला एक गोष्ट अजूनही खटकतेय," आरवने सुलोचनाच्या डायरीतील एक पान दाखवले जे अर्धवट फाटलेले होते. "आई, या पानावर तू कोणाबद्दल तरी लिहिलं होतं, ज्याचं नाव 'शशिकांत' असं दिसतंय. हा शशिकांत कोण आहे?"
सुलोचनाचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. तिचे हात थरथरायला लागले. "आरव... तो विषय नको काढूस. तो... तो तुमच्या आजोबांचा धाकटा भाऊ होता, जो वर्षांपूर्वी घर सोडून गेला होता."
"पण त्याचा बाबांच्या मृत्येशी काय संबंध?"
"तो मेला नाहीये आरव. तो परत आला आहे. विक्रमला फितवणारा आणि या सर्व कटामागे असणारा मेंदू प्रताप सिंघानियाचा नव्हता, तर शशिकांतचा होता. तो अजूनही बाहेर मुक्तपणे वावरतोय," सुलोचनाने थरथरत्या आवाजात सांगितले.
आरव आणि मिताली एकमेकांकडे पाहतच राहिले. ज्या युद्धाचा अंत झाला असे त्यांना वाटले होते, त्याचा सर्वात भयानक शत्रू तर अजून समोर आलाच नव्हता.
कोण आहे हा शशिकांत? तो आजोबांचा द्वेष का करतो? आता कोणत्या नवीन संकटात गुंतणार?
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©®जान्हवी साळवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा