Login

नशिबाचे धागे भाग -३४

नशिबाचे धागे
डिसेंबर -जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ३४

घराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या त्या प्रौढ स्त्रीच्या नजरेत इतकी थंडावा होता की, भर उन्हाळ्यातही आरवला थंडी वाजल्यासारखं वाटलं. तिने नेसलेली सफेद सिल्कची साडी आणि गळ्यातले मोत्यांचे दागिने तिच्या श्रीमंतीची आणि खानदानीपणाची साक्ष देत होते. पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र क्रूर होते. सुलोचना तर जणू एखादा भूत पाहिल्यासारखी थरथर कापत होती.

"आई... तुम्ही जिवंत आहात?" सुलोचनाचा आवाज जेमतेम बाहेर पडला.

"हो सुलोचना. तुझा बाप मेला, पण मी अजूनही जिवंत आहे. तुझ्यासारख्या कुलकलंक लेकीच्या पापांचा हिशोब पूर्ण करायचा होता मला," ती स्त्री, जिचे नाव इंदुमती देवी इनामदार होते, ती डामडौलात हॉलमध्ये शिरली.

आरव पुढे सरसावला. "तुम्ही माझ्या आईला अशा भाषेत बोलू नका. तुम्ही कोण आहात?"

इंदुमतीने आरवला वरपासून खालपर्यंत पाहिलं. तिच्या ओठांवर एक तिरस्कारयुक्त हास्य उमटलं. "आरव देशपांडे! हुबेहूब सुधीरचा चेहरा. तेच डोळे, तोच माज. आरव, मी तुझी सख्खी आजी आहे. पण दुर्दैवाने, तुझ्या रक्तात देशपांड्यांचा अंश आहे, ज्यांनी माझ्या 'इनामदार' घराण्याची अब्रू मातीत मिळवली."

मितालीने इंदुमती देवींसाठी पाणी आणलं, पण त्यांनी ते नाकारलं. "मी या घरातलं पाणी सुद्धा पिणार नाही, जिथे माझ्या शत्रूचा वास येतो."

आरवने मितालीला खुणेने बाजूला केलं आणि स्वतः इंदुमतींच्या समोर बसला. "आजी, जर तुम्ही माझ्या वडिलांचा द्वेष करत असाल, तर तुम्ही इथे कशासाठी आलात? आणि माझ्या आईला इतकी वर्ष वाटलं की तुम्ही मेला आहात, मग तुम्ही कुठे होता?"

इंदुमती देवींनी एक दीर्घ श्वास घेतला. "सुलोचनाला वाटलं असेल मी मेली, कारण तिच्यासाठी तिचं माहेर मेलं होतं ज्या दिवशी तिने त्या सुधीर देशपांडेचा हात धरला. सुलोचना इनामदारांची एकुलती एक वारस होती. आमचं घराणं साताऱ्यातलं सर्वात मोठं घराणं होतं. पण तुझ्या आजोबांनी—त्या दादासाहेबांनी—एका कराराच्या नावाखाली आमची सर्व जमीन हडप केली. आणि तुझ्या बापाने सुलोचनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आमच्या घराण्याचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला."

"हे खोटं आहे!" सुलोचना ओरडली. "सुधीरने कधीच जमिनीसाठी माझ्याशी लग्न केलं नाही. उलट, तुम्ही लोकांनीच आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता."

"गप्प बस सुलोचना!" इंदुमती कडाडल्या. "त्या सुधीरने आमच्या खानदानाचं एक असं गुपित शोधून काढलं होतं, ज्याच्या जोरावर तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता. म्हणूनच त्याला रस्तातून हटवणं गरजेचं होतं."

आरव चपापला. "म्हणजे... बाबांच्या गाडीचे ब्रेक तुम्ही कापले होते?"

इंदुमती हसल्या. "ब्रेक कोणी कापले, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की, त्या रात्री जे काही झालं, ते 'इनामदारांच्या अब्रूसाठी' झालं होतं. पण तुझी आई वाचली, ही आमची चूक झाली."

आरवच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आजवर त्याला वाटलं होतं की, सर्व संघर्ष फक्त देशपांडे कुटुंबातच आहे, पण हे तर एक जुनं कौटुंबिक युद्ध होतं.

"आजी, तुम्ही जे काही बोलताय, त्याचे काही पुरावे आहेत का?" मितालीने धैर्याने विचारलं.

इंदुमतीने मितालीकडे पाहिलं. "तू कोण ग? आरवची विकत घेतलेली बायको ना? त्या 'कराराची' चर्चा पूर्ण शहरात आहे. तू तर बोलूच नकोस. तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलींना फक्त पैसा दिसतो."

मितालीचा अपमान आरवला सहन झाला नाही. "पुरे झालं! आजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जा. मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये."

"मी जाणारच आहे," इंदुमती उभ्या राहिल्या. "पण जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्याकडे त्या जमिनीचे मूळ कागदपत्र आहेत, ज्यावर आज 'देशपांडे कंस्ट्रक्शन्स' उभं आहे. मी एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. उद्यापासून तुमच्या सर्व प्रॉपर्टीवर 'इनामदार' घराण्याचं नाव असेल. आरव, तू रस्त्यावर येणार आहेस, जसं माझ्या कुटुंबाला तुझ्या आजोबांनी आणलं होतं."

इंदुमती देवी तिथून निघून गेल्या, पण मागे एक मोठं वादळ सोडून गेल्या.

रात्री सुलोचना खूप रडत होती. आरव आणि मितालीने तिचं सांत्वन केलं.

"आई, आजी कोणत्या गुपिताबद्दल बोलत होती? बाबांनी असं काय शोधलं होतं?" आरवने विचारलं.

सुलोचनाने डोळे पुसले. "आरव, माझ्या माहेरी, म्हणजे इनामदारांच्या वाड्यात एक जुनी विहीर आहे. तिथे अनेक वर्षांपूर्वी एक हत्या झाली होती, जी माझ्या वडिलांनी केली होती. सुधीरला त्या हत्येचा पुरावा मिळाला होता. त्याला ते पोलिसांना द्यायचं नव्हतं, पण त्याला हवं होतं की इनामदारांनी गरिबांच्या जमिनी परत कराव्यात. याच कारणावरून त्यांचं भांडण झालं होतं."

आरवच्या लक्षात आलं की, त्याचे वडील एक 'ब्लॅकमेलर' नव्हते, तर ते एका मोठ्या अन्यायाविरुद्ध लढत होते. पण त्या लढाईत त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सानप वकिलांचा फोन आला. "आरव, इंदुमती इनामदारांनी खरोखरच कोर्टातून नोटीस पाठवली आहे. त्यांनी 'देशपांडे विला' आणि तुमच्या सर्व जमिनींवर दावा केला आहे. त्यांचा दावा खूप मजबूत आहे, कारण कागदपत्रं त्यांच्या बाजूने आहेत."

आरव हताशपणे बसला होता. "मिताली, आपण एका शत्रूशी लढून जिंकलो (शशिकांत), पण आता आपल्यासमोर स्वतःचं रक्त उभं आहे. मी आजीशी कसं लढणार?"

मिताली आरवच्या समोर आली. तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. "आरव, ही लढाई जमिनीसाठी नाहीये, ही सत्यासाठी आहे. जर इंदुमती देवींनी काही चुकीचं केलं असेल, तर आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. आपण साताऱ्याला जाऊया. त्या जुन्या वाड्याचा आणि त्या विहिरीचा शोध घेऊया."

"पण तिथे जाणं धोक्याचं आहे," आरव म्हणाला.

"धोका तर आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. पण आता आपण मागे हटायचं नाही. आपल्याकडे मारुती काका आहेत, ज्यांना इनामदारांच्या वाड्याबद्दल माहिती असेल," मितालीने एक आशेचा किरण दाखवला.

आरव, मिताली आणि मारुती काका साताऱ्याच्या दिशेने निघाले. सुलोचनाला त्यांनी दीपकच्या निगराणीखाली एका सुरक्षित फ्लॅटमध्ये ठेवलं होतं.

साताऱ्यात शिरताच सह्याद्रीच्या रांगा आणि तिथलं जुनं वातावरण आरवला काहीतरी सांगू पाहत होतं. मारुती काकांनी गाडी एका निर्जन ठिकाणी वळवली.

"आरव बाबा, तो समोर दिसतोय ना... तोच 'इनामदार वाडा'. पंधरा वर्षांपूर्वी मी इथेच तुमच्या वडिलांना शेवटचं भेटलो होतो. त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं, जे मला आजपर्यंत आठवत नव्हतं... पण या वाड्याला पाहिल्यावर आठवलं," मारुती काकांचे हात थरथरत होते.

"काय सांगितलं होतं बाबांनी?" आरवने विचारलं.

"ते म्हणाले होते... मारुती, जर मला काही झालं, तर 'सिंहाच्या जबड्यात' हात घाल. तिथेच गुपित लपलेलं आहे."

"सिंहाचा जबडा? मंजे काय?" मितालीने विचारलं.

वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन मोठे दगडी सिंह कोरलेले होते. आरवच्या लक्षात आलं की बाबांनी नक्कीच तिथे काहीतरी लपवलं असणार. पण वाड्यावर इंदुमती देवींचा कडा पहारा होता.

रात्रीच्या अंधारात आरव आणि मितालीने वाड्याच्या मागील भिंतीवरून आत प्रवेश केला. वाडा अगदी भयाण होता. सगळीकडे जळमटं आणि धुळीचं साम्राज्य होतं. आरवने टॉर्चच्या प्रकाशात प्रवेशद्वारापाशी असलेले ते सिंह शोधले.

त्या एका सिंहाचा जबडा थोडा उघडा होता. आरवने त्यात हात घातला. आत त्याला एक थंड धातूचा स्पर्श झाला. त्याने ती वस्तू बाहेर काढली. तो एक जुना 'पेनड्राइव्ह' आणि एक 'चावी' होती.

तितक्यात वाड्याचे सर्व दिवे लागले.

"सापडलात तर शेवटी!" इंदुमती देवी गॅलरीमध्ये उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक बंदूक होती आणि बाजूला त्यांचे अंगरक्षक होते.

"आरव देशपांडे, तुला वाटलं होतं तू माझ्या घरात येऊन माझ्याच विरोधात पुरावे शोधशील? हा वाडा तुझी कबर बनेल!"

आरव आणि मिताली या मृत्यूच्या सापळ्यातून कसे सुटतील? त्या पेनड्राइव्हमध्ये नक्की काय आहे? सुधीर देशपांडे यांनी इनामदारांचा कोणता काळजाचा ठोका चुकवणारा पुरावा लपवून ठेवला आहे?

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

©®जान्हवी साळवे
0

🎭 Series Post

View all