Login

नशिबाचे धागे भाग -४१

नशिबाचे धागे
डिसेंबर -जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ४१

जहागीरदारांच्या विळख्यातून सुटका झाल्यानंतर आणि त्या जुन्या खजिन्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर, आरवच्या आयुष्यात एक अशी शांतता आली होती जिची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. पण ही शांतता अधिक समृद्ध झाली होती ती मितालीने दिलेल्या त्या सुखद बातमीने. आरव आणि मिताली आता आई-बाबा होणार होते. 'नशिबाचे धागे' आता एका चिमुकल्या जीवाच्या रूपाने अधिक घट्ट गुंफले जाणार होते.

सकाळची वेळ होती. सुलोचनाने घराचा कोपरा न कोपरा फुलांनी सजवला होता. आपल्या नातवाच्या किंवा नातीच्या आगमनाची बातमी ऐकल्यापासून ती जणू पुन्हा तरुण झाली होती. किचनमध्ये मोगऱ्याचा सुगंध आणि लाडवांचा गोड वास दरवळत होता.

"मिताली, हे दूध पिऊन घे बघू आधी," सुलोचनाने मायेने मितालीच्या हातात ग्लास दिला.

"आई, आता तर नाश्ता केलाय मी. तुम्ही मला आज दिवसभरात पाचव्यांदा काहीतरी खायला देताय," मिताली हसून म्हणाली.

"अगं, आता तू एकटी नाहीस. तुला स्वतःची आणि त्या लहान जीवांची काळजी घ्यायला हवी. आरव कुठे आहे?" सुलोचनाने विचारले.

"आरव रूममध्ये काहीतरी शोधतायत. त्या 'पाळण्या'मध्ये त्यांनी काहीतरी नवीन शोधलंय असं म्हणत होते," मितालीने सांगितले.

आरव बेडरूममध्ये त्या जुन्या पाळण्यापाशी बसला होता. जहागीरदारांनी सांगितल्याप्रमाणे त्या पाळण्यातील खजिन्याचा नकाशा तर मिळाला होता, पण आरवला त्या पाळण्याच्या लाकडात अजूनही काहीतरी खुणावत होतं. त्याने पाळण्याच्या पायाशी असलेल्या कोरीव कामावर बोट फिरवले. तिथे काही लहान अक्षरे कोरलेली होती, जी आतापर्यंत कोणाच्याच लक्षात आली नव्हती.

त्यावर लिहिले होते: "रक्षक तोच जो रक्तापलीकडचे नाते जपे."

आरव विचार करू लागला, 'रक्तापलीकडचे नाते'? मंजे काय? देशपांडे आणि इनामदारांचे रक्त तर एकत्र आले होते, पण जहागीरदारांशी आमचे काय नाते होते? जहागीरदार तर शत्रू निघाले, मग हा रक्षक कोण?

तितक्यात आरवच्या फोनवर एक मेसेज आला. हा मेसेज दीपकचा होता. "आरव सर, एक महत्त्वाची गोष्ट समजली आहे. अन्वी सिंघानियाचा जामीन फेटाळला गेला आहे, पण शशिकांत देशपांडे आजारपणाच्या कारणास्तव पॅरोलवर बाहेर आला आहे. आणि तो थेट पुण्याला निघालाय अशी बातमी आहे."

आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. शशिकांत पुन्हा बाहेर आला होता. आणि या वेळी त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्यामुळे तो अधिक धोकादायक होता.

संध्याकाळी आरवने मितालीला फिरायला नेण्याचे ठरवले. तिला ताजी हवा मिळावी म्हणून ते जवळच असलेल्या एका बागेत गेले. बागेत लहान मुले खेळत होती. आरव आणि मिताली एका बाकावर बसून त्यांच्या भविष्याबद्दल गप्पा मारत होते.

"आरव, आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचे?" मितालीने विचारले.

"जर मुलगा झाला तर बाबांच्या नावावरून 'सुधीर' आणि मुलगी झाली तर तुझ्या आईच्या नावावरून 'सुलक्षणा'..." आरवने स्वप्नाळू नजरेने पाहिले.

तितक्यात, जवळून एक सावली वेगाने निघून गेली. आरवचे लक्ष गेले. ती व्यक्ती हुबेहूब शशिकांतसारखी दिसत होती. आरव सावध झाला. त्याने मितालीचा हात घट्ट पकडला.

"काय झालं आरव?" मितालीने विचारले.

"काही नाही, तुला तहान लागली असेल ना? मी पाणी घेऊन येतो," आरवने मितालीला तिथेच बसवले आणि त्या सावलीचा पाठलाग केला.

बागेच्या एका कोपऱ्यात, जिथे अंधार होता, तिथे ती व्यक्ती उभी होती. आरव तिथे पोहोचला आणि त्याने त्या व्यक्तीचा खांदा पकडला. "शशिकांत! तू पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या आसपास फिरण्याची हिंमत कशी केलीस?"

ती व्यक्ती वळली. पण तो शशिकांत नव्हता. तो एक साधारण माणूस होता. "काय झालं साहेब? मी तर फक्त इथे माझं पाकीट शोधत होतो."

आरवने माफी मागितली आणि परत आला. पण त्याच्या मनातली भीती कमी झाली नव्हती. त्याला सतत कोणीतरी पाहत असल्याची जाणीव होत होती.

रात्री सर्वजण जेवायला बसले असताना, घराची बेल वाजली. आरवने दरवाजा उघडला. बाहेर समीर उभा होता. समीर, ज्याने अन्वीसोबत मिळून आरवचा विश्वासघात केला होता.

समीरची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्याचे कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावर जखमा होत्या.

"तू? तुला इथे येण्याची हिंमत कशी झाली?" आरव ओरडला.

"आरव... मला माफ कर. मला दुसरं कोणीही नाहीये. अन्वीने मला फसवून तुरुंगात धाडलं आणि आता तिचे माणसं मला मारायला शोधतायत. शशिकांत बाहेर आलाय आरव, आणि त्याने ठरवलंय की तो तुला आणि तुझ्या बाळाला कधीच हे जग पाहू देणार नाही," समीर रडत आरवच्या पाया पडला.

मिताली आणि सुलोचना बाहेर आल्या. समीरला पाहून सुलोचनाला जुने दिवस आठवले.

"आरव, याला घरात घेऊ नकोस. याने तुला आधीच खूप त्रास दिला आहे," सुलोचनाने बजावले.

"पण आई, हा म्हणतोय की शशिकांत आपल्या बाळाला टार्गेट करतोय. याला काहीतरी माहिती असेल," आरवने विचार केला.

आरवने समीरला आत घेतले आणि त्याला पाणी दिले. समीरने एक धक्कादायक गोष्ट सांगितली. "आरव, शशिकांतला त्या खजिन्याची पर्वा नाहीये. त्याला आता फक्त तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा 'अंतिम पुरावा' नष्ट करायचा आहे, जो त्या पाळण्यामध्ये नाही, तर तुझ्या वडिलांच्या 'विम्याचे' (Insurance) जे जुने पेपर्स आहेत, त्यामध्ये लपवलेला आहे. ते पेपर्स तुमच्या जुन्या बँक लॉकरमध्ये आहेत."

दुसऱ्या दिवशी आरवने जुन्या बँकेच्या लॉकरकडे धाव घेतली. तिथे सुधीर देशपांडे यांची काही जुनी कागदपत्रे होती. आरवने लॉकर उघडले आणि सर्व फाईल्स बाहेर काढल्या. त्यामध्ये खरोखरच एक लहान लिफाफा होता, जो एका स्वतंत्र कप्प्यात लपवून ठेवला होता.

लिफाफा उघडल्यावर आरवच्या हातात एक फोटो लागला. हा फोटो पाहून आरवचे डोळे विस्फारले. फोटोमध्ये सुधीर देशपांडे आणि शशिकांत भांडताना दिसत होते, पण त्या दोघांच्या मागे एक तिसरी व्यक्ती स्पष्टपणे दिसत होती. ती व्यक्ती म्हणजे आजोबांचे जुने वकील, वकील सानप!

ज्या सानप वकिलांनी आजवर आरवला मदत केली, ज्यांनी त्याला सर्व कायदेशीर संकटातून बाहेर काढले, तेच त्याच्या वडिलांच्या अपघाताच्या रात्री तिथे काय करत होते?

आरवच्या पायाखालची जमीन सरकली. याचा अर्थ, शत्रू बाहेर नव्हता, तो तर आरवच्या सर्वात जवळ होता.

आरव बँकेतून परतत असतानाच, त्याला सुलोचनाचा फोन आला. तिची शुद्ध हरपली होती आणि ती रडत होती. "आरव... आरव, मितालीला कोणीतरी उचलून नेलं! मी खाली पाणी आणायला गेले होते आणि वर आले तर ती गायब होती!"

आरवचे हृदय धडधडू लागले. "काय? कोणी नेलं आई?"

"एक काळी गाडी आली होती... आणि त्यामध्ये तो समीर होता! समीरने आम्हाला फसवंलं आरव!"

आरवच्या लक्षात आले की समीरने त्याला फसवून बँकेत पाठवले आणि स्वतः मितालीला घेऊन पळून गेला. समीर अजूनही अन्वी किंवा शशिकांतसाठी काम करत होता.

आरवने लगेच सानप वकिलांना फोन लावण्याचा विचार केला, पण त्याला त्या फोटोची आठवण झाली. तो आता कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हता. त्याने दीपकला फोन केला.

"दीपक, मितालीचा फोन ट्रॅक कर! ती संकटात आहे!"

दीपकने लोकेशन ट्रॅक केले. "सर, लोकेशन 'महाबळेश्वर'च्या दिशेने आहे. त्याच 'शांती सदन' कडे, जिथे तुमची आई कैद होती."

आरवने गाडीचा वेग वाढवला. त्याच्या डोळ्यासमोर मितालीचा चेहरा येत होता. त्याला स्वतःचा राग येत होता की त्याने समीरवर विश्वास ठेवला.

शशिकांत आणि समीरचा प्लॅन काय आहे? सानप वकील खरोखरच या कटात सामील आहेत का? आणि आरव मितालीला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला वाचवू शकेल का?

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

©®जान्हवी साळवे
0

🎭 Series Post

View all