Login

'ती'ची नवी पहाट भाग १

ती' ची नवी पहाट भाग १
'ती'ची नवी पहाट
भाग १

आज वर्षा अखेरची ती ३१ डिसेंबरची ती सकाळ देशपांडे कुटुंबात नेहमीपेक्षा थोडी लवकरच सुरु झाली होती. खिडकीतून येणारी कोवळी उन्हे आणि स्वयंपाकघरातून येणारा चहाचा सुवास... वातावरण तसं प्रसन्न होतं, पण अनघाच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं.

आज वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याच्या अपेक्षांचा डोंगर तिच्यावर कोसळणार, याची तिला पूर्ण खात्री होती. मध्यमवर्गीय कुटुंबात सण म्हणजे गृहिणीसाठी केवळ कामाचा दुप्पट उत्साह आणि उरलेल्यांसाठी सुट्टीचा आनंद !  हे समीकरण तिला नवीन नव्हतं.

अनघाने गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि आल्याचा तुकडा किसता किसता ती आजच्या संभाव्य मेन्यूचा अंदाज घेऊ लागली. तेवढ्यात हॉलमधून सुयोगचा आवाज आला.

" अगं अनघा, पेपरमध्ये बघ किती ऑफर्स आहेत! आज थर्टी फर्स्ट आहे, रात्रीचं जेवण कशाला घरात करतेस ? आपण बाहेरून काहीतरी मस्त मागवूया का ? घरपोच डिलिव्हरी मिळेल आणि तुलाही थोडा आराम मिळेल." सुयोगने चष्म्यातून पेपरच्या जाहिरातींकडे बघत सुचवलं.

हा विचार ऐकताच बेडरूममध्ये मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले अद्वैत आणि ईश्वरी, जणू काही '
रडारवर सिग्नल मिळाल्यासारखे धावतच बाहेर आले.

" येस्स डॅड! दॅट्स अ ग्रेट आयडिया ! " अद्वैत ओरडला.

" आई, प्लीज आज तेच ते वरण-भात किंवा चपाती-भाजी नको. आज आपण इंटरनॅशनल डे साजरा करूया. मला थाई रेड करी आणि ईश्वरीला तो व्हाईट सॉस पास्ता हवाय. मी ऑनलाइन रेटिंग चेक केले आहेत, त्या नवीन एक्स्प्रेस कॅफेचे रिव्ह्यूज् खूप भारी आहेत ! "

ईश्वरीने लगेच दुजोरा दिला,

" हो आई, आणि सोबत गार्लिक ब्रेड पण ! किती दिवस झाले आपण काहीतरी वेगळं खाल्लं नाहीये."

मुलांच्या या पाश्चात्य खाद्यसंस्कृतीच्या प्रेमाला बघून देवघरातून बाहेर पडत असलेल्या सासूबाईंनी कपाळावर आठ्या घातल्या. त्यांनी हातातली जपमाळ बाजूला ठेवली आणि सोफ्यावर बसत म्हणाल्या,

" अरे बापरे ! पास्ता आणि काय ती थाय करी ? ते काय पचणार आहे का आम्हाला या वयात ? अनघा, नको ग बाई ते बाहेरचं जेवण. तेल कसलं असतं, भाज्या धुतल्या असतात की नाही कुणास ठाऊक ? आणि ते हॉटेलवाले खूप मसाले टाकतात, मग रात्रभर आम्हा दोघांना पित्ताचा त्रास होतो."

सासऱ्यांनीही चहाचा कप हातात घेत सासूबाईंच्या सुरात सूर मिसळला,

" हो अनघा, बाहेरचं नकोच. पण आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तर काहीतरी चमचमीत हवं! म्हणजे कसं, सात्विक पण चवीला एकदम झक्कास. थोडं पथ्याचं सांभाळून तू काहीतरी घरच्या घरी कर की गं ! "

अनघाने चहाचे कप ट्रेमध्ये ठेवले आणि ती हॉलमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर एक हतबल हसू होतं. तिने प्रत्येकाकडे आळीपाळीने बघितलं.

" आई, बाबा, सुयोग आणि मुलांनो... आता तुम्हीच सांगा, मी नक्की काय करू ? आई म्हणतात पथ्याचं हवं, बाबा म्हणतात चमचमीत हवं. सुयोगला तुला बाहेरचं हवंय पण ते हेल्दी नसतं, आणि मुलांना तर चक्क इटालियन आणि थाई हवंय ! बिन तेलाचं चमचमीत आणि घरच्या घरी बनवलेला रेस्टॉरंट स्टाईल पास्ता हे सगळं एकत्र कसं शक्य आहे ? "

तिने सुयोगकडे रोखून बघत विचारलं,

" आणि सुयोग, बाहेरून मागवणं म्हणजे किती पैसे वाया जातात हे माहितीये ना ? आजच्या दिवशी तर ते डिलिव्हरी चार्जेस पण डबल लावतात. त्यापेक्षा मी घरीच काहीतरी करते, पण मग मला मदतीला कोणीतरी हवंय. फक्त फर्माईश करून चालणार नाही."

" अगं पण अनघा, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, थोडी मजा तर व्हायला हवी ना ? " सुयोगने समजावण्याचा प्रयत्न केला.

" मजा ? कोणाची मजा ? " अनघाचा आवाज थोडा चढला.

" तुम्ही सगळे टीव्ही बघत बसणार, मुलं गाणी ऐकणार, आई-बाबा गप्पा मारणार आणि मी मात्र एकटी किचनमध्ये घाम गाळत तुमच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी पूर्ण करणार ? माझी मजा कुठे आहे यात ?
मला सुद्धा वाटतं की आज मी शांतपणे बसावं, एखादा सिनेमा बघावा किंवा फक्त शांत झोप घ्यावी. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही मी फक्त एक कॅटरर म्हणूनच उरणार आहे का ? "

अनघाच्या या प्रश्नावर हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. मुलं एकमेकांकडे बघू लागली. सासूबाईंनी गुपचूप चहाचा घोट घेतला. अनघाला वाटलं होतं की आज कदाचित कोणीतरी विचारेल,

" अनघा, तुला काय खायला आवडेल ? " पण इथे तर प्रत्येकाला फक्त आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे होते.

तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं.

" ठीक आहे, मी करते काय ते. सुयोग, तुम्ही सामानाची लिस्ट घेऊन या, मुलं तुम्ही मला भाज्या चिरून द्यायला मदत करायची. आणि हो, आजचा मेन्यू काय असेल हे मी ठरवेन, कारण सगळ्यांना काय हवं या नादात मला काय हवं हे मी दरवेळी विसरते. आज तसं होणार नाही ! "

अनघा किचनमध्ये परतली खरी, पण तिच्या मनात एक सल तशीच होती. एका मध्यमवर्गीय गृहिणीची 'ती' ची इच्छा नेहमीच फॅमिली मेन्यूच्या शेवटच्या पानावरही का नसते ?
हा विचार करत तिने गॅस पुन्हा पेटवला, पण आज त्या अग्नीसोबत तिचा स्वाभिमानही थोडा प्रज्वलित झाला होता.