सकाळच्या चहाच्या कडाक्याच्या चर्चेनंतर अनघाने कंबर कसली होती. तिने डायनिंग टेबलवर बसून एक लांबलचक यादी तयार केली. त्यात ज्येष्ठ मंडळींच्या पथ्यासाठी लागणारे ओट्स, मुलांच्या इटालियन हट्टासाठी लागणारे मॅकरोनी आणि चीज आणि सुयोगच्या चमचमीत चवीसाठी लागणारे खास खडा मसाले अशा विचित्र मिश्रणाची ती यादी होती.
" सुयोग, हे घ्या लिस्ट आणि जा पाहू जवळच्या किराणा दुकानातून हे सामान घेऊन या." अनघाने कडक आवाजात सुयोगच्या हातात कागद टेकवला.
सुयोग पेपर बाजूला ठेवत आळस देत म्हणाला,
सुयोग पेपर बाजूला ठेवत आळस देत म्हणाला,
" अगं, आता कशाला थंडी वाऱ्याच बाहेर पाठवतेस ? मोबाईल काढतो आणि ऑनलाइन ऑर्डर करतो ना ! १५ मिनिटांत घरपोच येईल. शिवाय काही कॅशबॅक पण मिळेल."
अनघाने त्याच्याकडे उपहासाने बघितलं.
" ऑनलाइन ऑर्डर करायला ते पेट्रोलचे पैसे वाचतील असं तुम्हाला वाटतं, पण त्या डिलिव्हरी चार्जेसचं काय ? शिवाय जवळच्या दुकानातून आणलं तर ताजं सामान बघून घेता येईल. उगाच आळस करू नका. आणि अद्वैत, ईश्वरी... तुम्ही दोघंही बाबांच्या सोबत जा. इतक्या जड पिशव्या त्यांना एकट्याला उचलणार नाहीत."
अद्वैत आणि ईश्वरीने एकाच वेळी तोंड वाकडं केलं. " आई, प्लीज ! आम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी खास डान्स स्टेप्स प्रॅक्टीस करायच्या आहेत. गाण्यांची प्लेलिस्ट बनवतोय. बाहेर खूप गर्दी असेल." अद्वैत तक्रारीच्या सुरात म्हणाला.
पण अनघाच्या डोळ्यांत आज एक वेगळीच जरब होती. तिने काहीही न बोलता फक्त एक तिरका कटाक्ष टाकला. तो बघण्याचा परिणाम असा झाला की, दोघांनीही आपले मोबाईल निमूटपणे सोफ्यावर ठेवले आणि चपला घालू लागले.
" बॅग नेली का ? कापडी पिशव्या त्या दाराच्या मागे अडकवल्या आहेत." अनघाने किचनमधून ओरडून सांगितलं.
" हो हो, नेली आहे." सुयोगने घाईघाईत उत्तर दिलं आणि तिघंही बाहेर पडले.
साधारण पाऊण तासानंतर दाराची बेल वाजली. अनघाने दार उघडलं तेव्हा सुयोग, अद्वैत आणि ईश्वरी तिघंही धापा टाकत उभे होते. त्यांच्या हातात सामानाच्या जड पिशव्या होत्या. पण अनघाच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही , त्या पिशव्या घरच्या कापडी नव्हत्या, तर चकचकीत, निळ्या पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या.
सामानाचे ओझे ओट्यावर ठेवताच अनघाने पहिला प्रश्न विचारला,
सामानाचे ओझे ओट्यावर ठेवताच अनघाने पहिला प्रश्न विचारला,
" पिशव्या कुठे आहेत आपल्या कापडी ? मी तर दाराच्या मागे अडकवून ठेवल्या होत्या."
सुयोगने कपाळावरचा घाम पुसत अगदी सहजपणे सांगितलं,
" अगं, आम्ही लिफ्टपर्यंत गेलो आणि लक्षात आलं की पिशव्या घरीच राहिल्या. मग आता पुन्हा कोण वर येणार ? म्हणून म्हटलं जाऊ दे. मग त्या दुकानदाराकडून दहा दहा रुपयाला या मोठ्या पिशव्या विकत घेतल्या. भारी आहेत क्वालिटीला पण छान आहेत.नंतर कामाला येतील."
अनघाचा पारा एका क्षणात चढला. तिने सामानाकडे दुर्लक्ष केलं आणि सुयोगच्या डोळ्यांत बघून विचारलं,
"१० रुपयाला एक ? म्हणजे तुम्ही या तीन पिशव्यांसाठी ३० रुपये जास्तीचे मोजले ? आणि तेही फक्त तुमच्या विसरभोळे पणामुळे ? "
" आई, इट्स ओन्ली थर्टी रुपीज! इतकं काय त्यात ? " ईश्वरीने मध्येच तोंड घातलं.
" फक्त ३० रुपये ? " अनघा जोरात म्हणाली.
" ईश्वरी, तुला माहितीये का, की ही दहा रुपयांची एक पिशवी पर्यावरणासाठी किती घातक आहे ? आपण सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकं तासनतास सोशल मीडियावर इन्व्हायर्नमेंट वाचवाचे मेसेज फॉरवर्ड करतो , पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की आपली ही अशी अवस्था !
अहो सुयोग, तुम्हाला मोबाईलवर ऑनलाईन ऑफर्स शोधायला वेळ असतो, पण घराबाहेर पडताना एका कापडी पिशवीची शिस्त स्वतः ला लावता येत नाही ? हे ३० रुपये म्हणजे तुमच्या आळसाचा दंड आहे ! "
सुयोगने बचाव करण्याचा प्रयत्न केला,
" अगं, गर्दी होती दुकानात, त्यात सामान इतकं होतं की हातात मावणार नव्हतं..."
" मग आधी का नाही नेली बॅग ? " अनघाचा आवाज चांगलाच चढला होता.
"आणि अद्वैत, तू तर यंग जनरेशन आहेस ना ? तुला तरी आठवण करून द्यायला हवी होती. पेट्रोलचे पैसे वाचवायला मी तुम्हाला जवळच्या दुकानात पाठवलं आणि तुम्ही पिशव्यांवर पैसे उडवून आलात. वरून ते प्लास्टिक घरात आणलं ते वेगळंच ! तुम्हाला ठाऊक आहे का, की अशा छोट्या छोट्या गोष्टींतून किती पैशांचा अपव्यय होतो ? "
सासू-सासरे हॉलमधून हे सगळं ऐकत होते.
सासर्यांनी हळूच मान हलवली,
सासर्यांनी हळूच मान हलवली,
" अनघाचं बरोबर आहे. आपण शिस्त पाळली तरच ही मुलं शिकतील."
मुलांनी पाहिलं की आता आईची लेक्चर मोड सुरू झाला आहे. ही कथा काही लवकर थांबणारी नाही. अद्वैतने ईश्वरीला डोळ्यानेच खुणावलं आणि दोघंही गुपचूप सटकले.
" आम्ही... आम्ही जरा आईला मदत करतो भाजी चिरायला."
असं म्हणत मुलांनी किचनमध्ये धाव घेतली. अनघा मात्र अजूनही त्या प्लास्टिकच्या पिशव्यांकडे रागाने बघत होती. तिच्यासाठी ते फक्त ३० रुपये नव्हते, तर ती एक विचारसरणी होती – जी घराच्या अर्थकारणाला आणि पर्यावरणाला हळूहळू पोखरत होती.
" सुयोग, पुढच्या वेळी पिशवी विसरलात ना, तर सामान आणायची गरज नाही. रिकाम्या हाताने परत या, पण प्लास्टिक विकत घेऊ नका ! "
अनघाने शेवटचा इशारा दिला आणि ती सामानाची जुळवाजुळव करायला किचनमध्ये गेली. हॉलमध्ये सुयोग मात्र १० रुपयाच्या त्या पिशवीकडे बघत विचार करत बसला होता की, अनघाला पैशांची इतकी काळजी का लागलीये ? पण त्याचं उत्तर त्याला थोड्या वेळाने मिळणार होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा