Login

'ती' ची नवी पहाट भाग ३

ती' ची नवी पहाट भाग ३
किचनमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झालं होतं. ओट्यावरच्या प्रत्येक इंचावर काही ना काही पसारा मांडला गेला होता. एका बाजूला गॅसवर थाय करीसाठी नारळाचं दूध आणि भाज्यांचं मिश्रण मंद आचेवर शिजत होतं, ज्याचा खमंग वास घरभर पसरला होता.

दुसऱ्या बाजूला सासू-सासर्‍यांच्या पथ्याचं व्हेज सूप उकळत होतं, ज्यात अनघाने मुद्दाम काळी मिरी आणि ओवा टाकला होता जेणेकरून त्यांना पित्ताचा त्रास होऊ नये.

अनघाचे हात यंत्रासारखे चालत होते. एका बाजुला सुरीने भाजी कापणे सुरू होत तर दुसऱ्या हाताने ती कढईतलं सूप ढवळत होती. दोन गोष्टी वर लक्ष ठेवून काम करत होती.

" बाप रे ! किती कामं आहेत अजून... पास्ता उकडायचा आहे, थाय करीचा राईस लावायचा आहे, सॅलड चिरायचं आहे." ती पुटपुटली. कपाळावर घामाचे थेंब साचले होते, पण तिला ते पुसायलाही वेळ नव्हता.

" अद्वैत ! ईश्वरी ! जरा इकडे या बघू." अनघाने किचनमधूनच मोठ्याने हाक मारली.

" हे ब्रोकलीचे तुरे नीट काढून द्या आणि जरा ही पालकाची पानं निवडून द्या. मला सूपमध्ये टाकायची आहेत. लवकर किचन मध्ये या ! "

काही सेकंद शांतता गेली आणि मग बेडरूममधून गाण्यांचा जोरात आवाज आला. अद्वैत ओरडला,

" आई ! अगं आमची डान्स प्रॅक्टिस सुरू आहे. आज रात्री थर्टी फर्स्टला परफॉर्म करायचंय ना ! आज सोसायटी मध्ये परफॉर्म करायचं आहे.प्लीज ना आई, हे बोरिंग काम आम्हाला नको सांगू."

अनघाचा पारा चढणारच होता, तेवढ्यात हॉलमधून सासरे म्हणाले,

" अगं अनघा, राहू दे गं त्यांना. वर्षाचा शेवटचा दिवस आहे, सुट्टी आहे मुलांची. करू दे की त्यांना मजा. वर्षातून एकदाच तर असा उत्साह असतो त्यांच्यात. आम्ही बसलोय ना इथे, तुला काही मदत करू का ? नाहीतर तू कर सावकाश. "

सासर्‍यांच्या या बोलण्याने अनघाला आतून विलक्षण राग आला. तिला वाटलं,

'सुट्टी फक्त मुलांची आणि सुयोगचीच असते का? माझी सुट्टी कधी सुरू होणार ?'
पण ती काहीच बोलली नाही. तिने रागाने पास्ताचा सॉस बनवायला घेतला. घाईघाईत चमचा लागला आणि लाल टोमॅटो सॉस पांढऱ्याशुभ्र ओट्यावर सगळीकडे सांडला. त्याच वेळी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं दूध उकळून उतू जाण्याच्या बेतात होतं. अनघाने पटकन गॅस बंद केला, पण दुधाचे काही थेंब बर्नरवर पडून 'चर्रर्र' असा आवाज आला आणि जळकट वास सुटला.

" अरे देवा ! आता हे पण साफ करायचं ? " अनघा स्वतःशीच पुटपुटली. तिची तारांबळ उडाली होती. एकटीचे दोन हात आणि दहा कामं !

अशातच सासूबाई किचनच्या दारात उभ्या राहिल्या. त्यांनी विस्कटलेल्या किचनकडे एक नजर टाकली आणि म्हणाल्या,

" अगं अनघा, मी काय म्हणते... मगाशी ईश्वरी म्हणत होती की तिला आज बाहेरचा केक नकोय. आईच्या हातचा होममेड चॉकलेट केक हवाय असं म्हणत होती ती. करून टाक की गं झटपट एखादा कुकरमध्ये. मुलं खुश होतील."

अनघाने हातातली सुरी जोरात चॉपिंग बोर्डवर ठेवली. तिचा रुसवा आता स्पष्टपणे तिच्या आवाजात जाणवत होता.

"आई! तुम्हाला खरंच वाटतंय का की मी आता केक सुद्धा बनवू शकते ? हे सूप, थाय करी, पास्ता, राईस, सॅलड... हे सगळं मी एकटी करतेय. सुयोग बाहेर पेपर वाचतायत, मुलं डान्स करतायत आणि आता मी केक पण बनवू ? मी माणूस आहे की मशीन ? "
सासूबाई थोड्या गडबडल्या.

" अगं, मी तर फक्त मुलं म्हणाली म्हणून सांगितलं..."

" आई, मुलांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करायला हव्यात का ? माझी इच्छा काय आहे हे कोणाला विचारावसं वाटतंय का ? मला सुद्धा वाटतंय की आज मी फक्त शांत बसावं. पण इथे तर प्रत्येक तासाला एक नवीन फरमाईश येतेय. केक हवा असेल तर मुलांना म्हणावं स्वतः बनवा, मला आता हे जमणार नाही ! " अनघाने थोड्या कडवटपणे उत्तर दिलं.

तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. हे केवळ कामाचं दडपण नव्हतं, तर आपल्या कष्टांची घरात कोणालाच किंमत नाही, या जाणिवेची ती 'सल' होती. मध्यमवर्गीय घरात गृहिणीला मल्टी-टास्किंगची सवय असतेच, पण जेव्हा मदती ऐवजी फक्त मागण्यांची यादी वाढते, तेव्हा सहनशक्तीचा अंत होतो.

सासूबाई काही न बोलता तिथून निघून गेल्या. किचनमध्ये आता फक्त गॅसवर रट रट उकळणाऱ्या सूपचा आवाज येत होता. अनघाने डोळे पुसले आणि पुन्हा एकदा सांडलेला सॉस साफ करायला घेतली. तिला माहित होतं की ती रागावली तरी शेवटी तिलाच हे सगळं पूर्ण करायचं होतं. पण यावेळेस तिच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं.

ती मनाशी म्हणाली,

" आज रात्री जे होईल, ते या घरासाठी एक धडा असेल."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all