Login

ती ' ची नवी पहाट भाग ४

ती 'ची नवी पहाट भाग ४
किचनमध्ये अनघाच्या शब्दांचा जो तडाखा बसला, त्याचे पडसाद हॉलपर्यंत उमटले. बेडरूममधलं लाऊड म्युझिक अचानक बंद झालं आणि घरामध्ये एक अस्वस्थ शांतता पसरली. सासूबाईंनी मुलांकडे बघून फक्त डोळ्यांनीच इशारा केला, तसा अद्वैत आणि ईश्वरीला आता आपली चूक उमजली. आई खरोखरच वैतागली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं.

" आई, सॉरी ना ! तू बाजूला हो, तू बस जाऊन. केकचं आम्ही बघतो." अद्वैत किचनमध्ये येत म्हणाला.
ईश्वरीनेही सावरून घेतलं,

" हो ग आई, तू मघाशी म्हणालीस ना स्वतः बनवा , तर आता आम्ही आज होममेड केक बनवून दाखवतो. तू फक्त लांबून बघ."

अनघाने एक दीर्घ निश्र्वास सोडला, हातातला नॅपकिन बाजूला ठेवला. ती शांतपणे किचनच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या खुर्चीवर बसली. तिने ठरवलं होतं की आज ती त्यांना मदत करणार नाही, फक्त निरीक्षण करेल.

मुलांनी चपळाईने आपला मोर्चा वळवला. ईश्वरीने लॅपटॉपवर झटपट १५ मिनिट्स चॉकलेट केकचा व्हिडिओ लावला आणि अद्वैतला कामाला लावलं. पण, शांततेत काम होईल तर ते देशपांड्यांचं घर कसले ?
कामाला सुरुवात झाल्यापासून अवघ्या पाच मिनिटांत त्यांचं तुंबळ युद्धच सुरू झालं.

" अद्वैत ! अरे वेड्या, कोको पावडरचे दोन चमचे सांगितलेत, तू अख्खा डबाच उपडा करतोयस का ? " ईश्वरी ओरडली.

" अगं, मग चॉकलेट केक चॉकलेट सारखा लागला पाहिजे ना ! आणि तू ते तेल किती टाकतेयस ? केक आहे की वडा ? " अद्वैतने प्रतिहल्ला केला.

दोघंही जण बॅटर फेटत असताना भांडणही तितक्याच जोरात करत होते. अद्वैतने पिठाचा डबा उघडताना घाई केली आणि पांढर शुभ्र पीठ त्याच्या काळ्या टी-शर्टवर आणि बाजूच्या ओट्यावर उडालं. ईश्वरीने हसताना घाईत दुधाचं पातेलं बाजूला सरकवलं, तर थोडं दूध सांडून गॅसच्या खाली गेलं.
मध्येच सासू-सासरे आणि सुयोग किचनच्या दारात येऊन उभे राहिले.

" वा! आज आमची नातवंडं शेफ झालीत की ! काय मैफिली चांगलीच रंगत आलीये ! "
सासर्‍यांनी टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन दिलं. सासूबाईंनीही कोपऱ्यात बसलेल्या अनघाकडे बघून स्मितहास्य केलं, जणू काही म्हणत होत्या, 'बघ, मुलं कशी तयार झाली'.

पण अनघाच्या नजरेला जे दिसत होतं, ते पाहून कोणाही गृहिणीच्या काळजात धडधड झाली असती.

अर्ध्या-पाऊण तासाच्या गोंधळानंतर, शेवटी टायमरची बेल झाली आणि केक तयार झाला.

" येस्स! आम्ही करून दाखवलं ! " असं म्हणत

अद्वैत आणि ईश्वरीने एकमेकांना हाय-फाय दिलं. केकचा वास छान येत होता, यात शंकाच नव्हती. पण जेव्हा मुलांनी

" आई, बघ आमचा केक ! " म्हणून अनघाला बोलावलं, तेव्हा अनघाची नजर के ककडे जाण्याऐवजी किचनच्या अवस्थेकडे गेली.
तिचं स्वच्छ, नीट नेटकं किचन आता एखाद्या
युद्धभूमी सारखं दिसत होतं.

फ्रीजच्या पांढऱ्या हँडलवर मुलांच्या पिठाने भरलेल्या आणि चॉकलेटी हातांचे ठसे उमटले होते.

ओट्यावर साखरेचा चिकट पाक सांडला होता, ज्यावर मुंग्या यायला सुरुवात झाली होती.
मिक्सरच्या भांड्यातून बॅटर बाहेर उडून भिंतीवर उडालं होतं. त्याने नक्षी काम केलं होत.

आणि सिंकमध्ये तर जणू भांड्यांचा हिमालय पर्वत उभा राहिला होता. असाच् काहीसं वाटतं होत.
सगळी छोटी-मोठी पातेली, चमचे, वाट्या मुलांनी वापरून तिथे ढीग करून ठेवले होते.

सगळ्यात कळस म्हणजे, केक काढताना त्यांनी अनघाचा आवडता पांढरा नॅपकिन वापरला होता, जो आता पूर्णपणे काळा-निळा चॉकलेटी झाला होता.

मुलांचे चेहरे उत्साहाने भरलेले होते, पण अनघाच्या चेहऱ्यावर मात्र एक शून्य भाव होता. तिने त्या केक कडे पाहिलं, मुलांच्या आनंदाकडे पाहिलं आणि मग पुन्हा एकदा किचनच्या त्या अफाट पसाऱ्याकडे पाहिलं.

तिला जाणवलं की, ही मुलं मदत करायला आली नव्हती, तर त्यांनी तिचं काम दहा पटीने वाढवून ठेवायला आली होती ! किती कामं वाढवून ठेवली आहेत ?

" खूप छान झालाय केक." अनघा इतकंच म्हणाली. तिचा आवाज अगदी शांत होता, जो थंड रागापेक्षा जास्त भीतीदायक होता.

तिने काहीही न बोलता किचन मधला आपला एप्रन काढला आणि तो बाजूला ठेवून दिला. पण तिने तो पसारा आवरायला हात लावला नाही. तिने मुलांना विचारलं नाही की , ' हे काय करून ठेवलंय ? '. तिने शांतपणे हॉल ओलांडला, आपल्या बेडरूममध्ये गेली आणि आतून कडी लावून घेतली.

" आई, तू जेवायला नाही येणार ? थाय करी आणि केक रेडी आहे ! " अद्वैतने बाहेरून हाक मारली.

पण आतून काहीच उत्तर आलं नाही. अनघा आज खरोखरच थकली होती , शरीराने कमी , पण मनातून जास्त. तिने आज जेवण न करण्याचा निर्णय घेतला होता. तिला भूक नव्हतीच, तिला हवी होती ती फक्त जाणीव. जी त्या घरात कोणाकडेच नव्हती.

हॉलमध्ये आता सुयोग आणि मुलांचा आवाज हळूहळू कमी झाला होता, कारण अनघाचा हा शांत रुसवा त्यांच्यासाठी कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त जड जाणार होता.