रात्रीचे साडे आठ वाजले होते. संपूर्ण शहरात थर्टी फर्स्टची जय्यत तयारी सुरू होती. देशपांडे यांच्या घरातही डायनिंग टेबलवर पदार्थांची रेलचेल होती. मुलांनी मोठ्या कष्टाने आणि ( मोठ्या पसाऱ्याने ) बनवलेला तो चॉकलेट केक टेबलाच्या मधोमध एखाद्या विजयी ट्रॉफी सारखा अगदी थाटात सजवला होता.
बाजूला गरमागरम थाय करी, ब्राऊन राईस आणि पास्ताचा सुवास दरवळत होता. सासू-सासर्यां साठीचे सूप बाऊलमध्ये वाढून तयार होते. सर्व काही परफेक्ट होतं, पण त्या आनंदाच्या चित्रात एक मुख्य रंग उडालेला होता. तो रंग म्हणजे घराचं चैतन्य ,अनघा.
बाजूला गरमागरम थाय करी, ब्राऊन राईस आणि पास्ताचा सुवास दरवळत होता. सासू-सासर्यां साठीचे सूप बाऊलमध्ये वाढून तयार होते. सर्व काही परफेक्ट होतं, पण त्या आनंदाच्या चित्रात एक मुख्य रंग उडालेला होता. तो रंग म्हणजे घराचं चैतन्य ,अनघा.
अनघा किचनमध्ये नव्हती की हॉलमध्ये पण नव्हती. ती आपल्या मंद दिवे लावलेल्या बेडरूममध्ये खिडकीपाशी बसून शांतपणे बाहेरच्या आकाशाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांत राग नव्हता, तर एक अथांग थकवा होता.
सुयोग दबक्या पावलांनी रूममध्ये गेला. त्याने लाईट न लावताच अनघाच्या जवळ जाऊन उभे राहणे पसंत केले.
" अनघा, चल ना गं ! सगळे टेबलवर वाट बघतायत. मुलांनी किती उत्साहात केक केला आहे. जेवणाची तयारी केली आहे. तुझा राईस तर एकदम भारी झालाय, त्याचा वास हॉलपर्यंत येतोय. चल, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, आपण एकत्र जेवूया." सुयोगने अतिशय मवाळ स्वरात साद घातली.
अनघाने मान वळवली नाही. ती खिडकी बाहेरच्या लुक लुकणाऱ्या दिव्यांकडे पाहत तशाच शांत स्वरात म्हणाली,
" मला भूक नाहीये सुयोग. तुम्ही करा पार्टी. आज मुलांची सुट्टी आहे, तुमची सुट्टी आहे. तुम्ही आजचा आनंद घ्या. मला फक्त शांत बसायचं आहे."
तिच्या आवाजातला तो अतीव शांतपणा सुयोगला एखाद्या चटक्यासारखा लागला. तिला मनवावं, तिला ओरडावं की तिच्याशी हुज्जत घालावी, हेच त्याला कळेनासं झालं. त्याने पाहिलं की, अनघाने आज दिवसभरात स्वतःसाठी काहीच केलं नव्हतं. तिच्या हाताला अजूनही त्या कोको पावडरचा आणि पिठाचा वास येत होता, जो तिने मुलांनी पसारा केल्यावर साफ केला होता. तो गुपचूप बाहेर हॉलमध्ये आला.
" काय झालं ? आई का नाही येतेय ? " अद्वैतने काळजीने विचारलं.
सुयोगने टेबलावर बसलेल्या मुलांकडे आणि सासू-सासर्यांकडे पाहिलं.
" आई येणार नाहीये. ती खूप थकलीये. आणि खरं सांगू का ? आज आपण तिचं मन पार मारून टाकलंय."
हॉलमध्ये क्षणार्धात शांतता पसरली. सुयोगने पुढे बोलायला सुरुवात केली,
" आज आपण काय काय केलं ? सकाळी उठल्यापासून तिला फर्माईश सोडल्या. पिशवी न्यायचा आळस केला म्हणून तिने साठवलेले ३० रुपये आपण फुकट घालवले. मुलांनी मदतीला नकार दिला आणि नंतर मदतीच्या नावाखाली किचनची जी अवस्था केली, ती साफ करताना तिची किती तारांबळ उडाली असेल, याचा आपण विचारच केला नाही. आपण फक्त आपल्या आवडी निवडी तिच्यावर लादल्या."
सासूबाईंनी हातातला चमचा खाली ठेवला. त्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाची छटा होती.
"अरे हो, हे माझ्या कसं लक्षात आलं नाही ? अनघाला तर हे थाय-बाय काही आवडत नाही. तिला साधं पिठलं-भाकरी, लसूण चटणी आणि पांढरा भात मनापासून आवडतो. आज तिला ते खायची इच्छा असेल, हे कोणालाच वाटलं नाही. आपण सगळे पास्ता आणि थाय करीच्या मागे लागलो, पण त्या बिचारीला काय हवंय हे विचारायला आम्ही विसरलोच."
ईश्वरी आणि अद्वैतचे चेहरे आता पडले होते. त्यांना आठवलं की, आई जेव्हा त्यांना मदतीला बोलवत होती, तेव्हा ते डान्स प्रॅक्टिसचं कारण देऊन टाळत होते. नंतर किचनमध्ये त्यांनी केलेला तो पसारा... त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली. आईने दिवसभर त्यांच्या हट्टापायी धावपळ केली आणि त्यांनी मात्र फक्त आपला स्वार्थ पाहिला.
" बाबा , आम्हाला खूप वाईट वाटतंय." अद्वैत हळूच म्हणाला.
" आम्ही फक्त आमची मजा मस्ती एन्जॉयमेंट पाहत होतो. आईची सजा आम्हाला दिसलीच नाही."
सासरे म्हणाले,
" सुयोग, चूक आमचीही आहे. आम्ही मुलांचं कौतुक करण्यात एवढे दंग झालो की, त्या कौतुकाचा सगळा भार अनघाच्या खांद्यावर पडतोय हे विसरलो. मध्यमवर्गीय घरात गृहिणी म्हणजे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारं यंत्र नाही, तर ती सुद्धा एक व्यक्ती आहे जिला स्वतःच्या आवडी निवडी आहेत."
घरातील प्रत्येक व्यक्तीला आता आपली चूक उमजली होती. जेवणाचं ते सजवलेलं टेबल आता त्यांना अपराधी पणाची जाणीव करून देत होतं. ईश्वरी उठली आणि अद्वैतचा हात पकडून किचनमध्ये गेली.
सुयोगनेही त्यांना साथ दिली. सासूबाईंनी ड्रॉवर उघडले आणि अनघाचं आवडतं जेवण बनवण्यासाठी तयारी सुरू केली.
बाहेर फटाक्यांचे आवाज सुरू झाले होते, पण देशपांडे यांच्या घरात एका वेगळ्याच बदलाची नांदी होत होती. प्रत्येकाच्या मनात आता एकच ध्यास होता , अनघाच्या चेहऱ्यावरचं ते हरवलेलं हसू परत मिळवणं. कारण जोपर्यंत घराची 'ती' आनंदी नसते, तोपर्यंत नवीन वर्षाच्या स्वागताला काहीच अर्थ नसतो.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा