बेडरूमच्या काळोखात बसलेल्या अनघाला बाहेर किचनमधून भांड्यांचे आवाज ऐकू येत होते, पण यावेळी ते आवाज हट्ट पाळण्यासाठी नव्हते, तर तिची माफी मागण्यासाठी होते. सुयोग पुन्हा एकदा रूममध्ये आला. यावेळी त्याने काहीही न बोलता तिचा हात धरला आणि तिला ओढतच हॉलमध्ये घेऊन आला.
" अहो, काय करताय हे ? मला नाही यायचंय." अनघा कुजबुजली, पण सुयोगने जबरदस्ती तिला सोफ्यावर बसवलंच.
हॉलमध्ये दृश्य बदललं होतं. डायनिंग टेबलवरचा तो पास्ता आणि थाय करी एका बाजूला सरकवली होती. अद्वैत हातात झाडू घेऊन किचन मधला साखर मैदा पिठाचा पसारा आवरत होता, तर ईश्वरी गॅसपाशी उभी राहून काहीतरी मनापासून बनवत होती.
थोड्या वेळाने ईश्वरी एका वाटीत वाफाळलेली मुगाची मऊ खिचडी, त्यावर साजूक तुपाची धार आणि बाजूला जिरे-कोथिंबीर घातलेलं थंडगार मसाला ताक घेऊन आली.
" हे बघ आई, हे तुझ्यासाठी. आम्हाला माहितीये तुला हेच हवं होतं." ईश्वरीने प्रेमाने ताट तिच्यापुढे धरलं.
अनघाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. मुलांच्या चेहऱ्यावरचा तो अपराधी भाव आणि त्यांनी स्वतःहून केलेला हा छोटासा प्रयत्न पाहून तिचा सगळा राग कुठल्या कुठे पळून गेला.
" आई, आज रात्रीचं जेवण झाल्यानंतर किचन आम्हीच स्वच्छ करणार आहोत. तू फक्त आम्हांला सांगायचं काय कुठे ठेवायचंय." अद्वैतने अभिमानाने जाहीर केलं.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता एक मोकळं हसू होतं. अनघाने खिचडीचा पहिला घास घेतला आणि तिला खऱ्या अर्थाने मन तृप्त झाल्या सारखा वाटलं. जेवण झाल्यावर अनघा अचानक उठली आणि आपल्या कपाटापाशी गेली. तिने तिथून एक जुना, मातीचा छोटा पिग्गी बँक बाहेर आणली.
" हे काय आहे अनघा ? " सासर्यांनी चष्म्यातून न्याहाळत विचारलं.
अनघाने डायनिंग टेबलवर एक जुनं वर्तमानपत्र पसरलं आणि त्यावर तो मातीची गुल्लक जोरात फोडला. खळ्ळखळ्ळ असा आवाज झाला आणि त्यातून चिल्लर, दहा-वीसच्या चुरगळलेल्या नोटा आणि काही पन्नासच्या नोटांचा पाऊस पडला. सगळं कुटुंब थक्क होऊन त्या ढिगाकडे बघत होतं.
" हे काय गौडबंगाल आहे ? " सुयोगने विचारलं.
अनघा हसली आणि म्हणाली,
" हा आपला शिस्त दंड आहे. गेल्या एका वर्षात जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडताना कापडी पिशवी न्यायला विसरलात आणि बाहेरून १०-१० रुपयांना प्लास्टिकच्या पिशव्या विकत घेतल्या, तेव्हा मी तुमच्या खिशातून तेवढेच पैसे काढून या गुल्लकामध्ये टाकायला लावले होते. जेव्हा तुम्ही आळसापोटी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दुकानात जाण्यासाठी गाडी काढली आणि विनाकारण पेट्रोल जाळलं, किंवा जेव्हा एखादी वस्तू जवळच्या दुकानात स्वस्त मिळत असताना फक्त सोयीसाठी ऑनलाइन महागड्या दरात मागवली, तेव्हा त्याचे उरलेले पैसे मी यात टाकत गेले."
अनघाने ते पैसे मोजायला सुरुवात केली. पाच, दहा, वीस... करत करत तो आकडा चक्क ५००० रुपयांच्या पुढे गेला !
" बाप रे ! पाच हजार रुपये ? फक्त प्लास्टिक पिशव्यांच्या दंडाचे आणि विसरभोळे पणाचे ? " सुयोगने कपाळावर हात मारून घेतला.
" हो ! " अनघा ठामपणे म्हणाली.
" हे पैसे तुमच्यासाठी किरकोळ होते. कधी १० रुपये, कधी २० रुपये. पण विचार करा, जर हे पैसे मी वाचवले नसते, तर ते आज कुठे असते ? ते केवळ तुमच्या विसरभोळे पणामुळे किंवा अशिस्तीमुळे वाया गेले असते. शिवाय तेवढं प्लास्टिक आपल्या घरात आलं असतं ते वेगळं. हा ५००० रुपयांचा आकडा म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेवर मारलेला एक चपराक आहे. आपण बचतीच्या गप्पा मारतो, पण अशा छोट्या गोष्टींतून किती पैसे उडवतो, हे आपल्याला समजतच नाही."
मुलांना आणि सुयोगला आता अनघाचं मगाचचं ओरडणं पटलं होतं. तो राग केवळ पैशांसाठी नव्हता, तर तो एका नैतिक मूल्यासाठी होता.
" अनघा, तू आमचे डोळे उघडले गं ! " सासूबाई म्हणाल्या.
" आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, पण तू तर थेंबे थेंबे शिस्तच साठवलीस की ! "
" हे पैसे माझे नाहीत, हे घराचे आहेत." अनघा म्हणाली.
" पण यातून आपण आज एक शपथ घेणार आहोत. पुढच्या वर्षी हा गुल्लक रिकामा राहिला पाहिजे. म्हणजेच, आपण एकही प्लास्टिक पिशवी विकत घेणार नाही आणि विनाकारण पेट्रोल वाया घालवणार नाही. "
मुलांनी आनंदाने एकमेकांकडे बघितलं. अद्वैत म्हणाला,
" आई, हे ५००० रुपये आपण आता खर्च करायचे नाहीत. हे आपण एखाद्या सामाजिक कामासाठी किंवा आपल्या बागेत झाडं लावण्यासाठी वापरूया. म्हणजे त्या प्लास्टिकच्या पापाचं थोडं तरी पुण्य मिळेल ! "
अनघाच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण समाधान होतं. तिची इच्छा काय होती ? तर फक्त तिला मान मिळावा आणि तिच्या कष्टाची जाणीव व्हावी.
आज वर्षाच्या शेवटच्या रात्री तिला ते दोन्ही मिळालं होतं. बाहेर फटाक्यांच्या आवाजात नवीन वर्षाचं स्वागत होत होतं, पण देशपांडे यांच्या घरात एका नव्या विचाराचं स्वागत आधीच झालं होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा