Login

ती ' ची नवी पहाट भाग ७(अंतिम भाग)

ती ' ची नवी पहाट भाग ७(अंतिम भाग)
घड्याळाने रात्रीचे १२ वाजल्याची वर्दी दिली आणि आसमंत फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. बाहेर हॅप्पी न्यू इयरचा जल्लोष सुरू असताना देशपांडे कुटुंबाच्या लिव्हिंग रूम मध्ये मात्र एक अतिशय गंभीर पण तितकाच जिव्हाळ्याचा सोहळा रंगला होता. तो सोहळा होता—'बदलाचा'.

अनघाने मगाशी ५००० रुपयांचा जो हिशोब मांडला होता, त्याने घराची दिशाच बदलून टाकली होती. सुयोगने एक वही आणि पेन हातात घेतलं.

" ऐका मंडळी, नवीन वर्षाचं कॅलेंडर बदललंय, आता आपण आपली वागणंही बदलूया. आज पासून या घरात नवे कायदे लागू होत आहेत ! " सुयोगने एखाद्या मुख्यमंत्र्या सारख्या थाटात घोषणा केली.

सगळ्यांनी कान टवकारले. सुयोगने वहीवर पहिला नियम लिहिला,

१. कापडी पिशवीचा सक्तीचा नियम -

" आजपासून घराबाहेर पडताना ज्याच्या खिशात किंवा गाडीच्या डिक्कीत कापडी पिशवी सापडणार नाही, त्याला जागेवरच २० रुपये दंड भरावा लागेल. तो १० रुपयाची प्लास्टिक पिशवी विकत घेण्यापेक्षा १० रुपये दंड देऊन घरी परत येईल आणि कापडी पिशवी घेऊन जाईल. अनघाचा तो गुल्लक आपण कायमस्वरूपी 'पनिश्मेंट फंड' म्हणून वापरणार आहोत." मुलांनी टाळ्या वाजवून याला संमती दिली.

२. 'अनघा'ची सुट्टी आणि आमची किचन ड्युटी:

" आई, हे बघ! " अद्वैत म्हणाला,

" दर रविवारी आणि सणावाराला तू किचनमध्ये फक्त सुपरवायझर असशील. मी भाज्या चिरणार, ईश्वरी भांडी लावणार आणि बाबा जेवण बनवणार. तू फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर द्यायची. 'झालं का?' असं विचारण्याचा अधिकार फक्त तुझा ! " ईश्वरीने लगेच पुस्ती जोडली,

" हो आई, आणि त्या दिवशी आम्ही केलेला पसाराही आम्हीच आवरणार, तू फक्त तुझी आवडती गाणी ऐकायची."

३. 'लोकल खरेदी' आणि 'आरोग्य' मंत्र:

सासर्‍यांनी चष्मा नीट करत सुचवलं,

" सुयोग, आपण एक नियम करूया. १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कोणत्याही दुकानात जाताना गाडीला हात लावायचा नाही. सायकल किंवा पायपीट ! यामुळे पेट्रोलचे पैसे वाचतील आणि आपली वाढलेली ढेरी सुद्धा कमी होतील. विनाकारण मोबाईलवर ऑनलाइन ऑर्डर करून डिलिव्हरी बॉयची वाट बघण्यापेक्षा स्वतः चालत जाऊन ताजं सामान आणण्याची सवय लावूया."

४. प्लास्टिक आणि डिस्पोजेबलला कायमचा राम राम
अनघाने स्वतः एक मुद्दा मांडला,

" आजच्या पार्टीत आपण प्लास्टिकचे चमचे आणि डिशेस वापरले नाहीत, तसंच ते पुढेही पाळायचं. घरात कितीही पाहुणे आले तरी आपण स्टीलची भांडी वापरू. थोडी जास्त मेहनत लागेल, पण आपण कचरा निर्माण करणार नाही."

सगळ्यांचे संकल्प लिहून झाल्यावर अनघाने मिश्किलपणे विचारलं,

" आणि माझा संकल्प? मी काय करायचं नवीन वर्षात ? "

सुयोगने तिचा हात हातात घेतला आणि अतिशय भावनिक होऊन म्हणाला,

" अनघा, तुझा संकल्प हा की, तू महिन्यातून किमान एक दिवस काहीही काम करणार नाहीस. त्या दिवशी तुझा मोबाईल बंद असेल, किचनला कुलूप असेल आणि तू फक्त स्वतःसाठी जगशील. तुला हवं ते पुस्तक वाच, हवं तिथे फिरायला जा किंवा दिवसभर झोपून राहा. आम्ही तुला हवं ते बनवून खायला घालू. तुझी स्वतःची इच्छा काय आहे. हे तू दररोज आम्हांला सांगायचं. आम्ही ते विचारायची वाट बघायची नाही."

अनघाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. तिला आजवर कोणाकडूनही दागिने किंवा महागड्या साड्या नको होत्या, तिला हवी होती ती फक्त ही 'जाणीव' आणि हा 'आदर'.

शेवटी, मुलांनी बनवलेला तो 'झटपट चॉकलेट केक' कापण्याची वेळ आली. केक बाहेरून थोडासा करपला होता, आतून हवा तसा फुगला नव्हता, पण जेव्हा अनघाने त्याचा पहिला तुकडा तोंडात टाकला, तेव्हा तिला तो जगातल्या कोणत्याही फाईव स्टार हॉटेलच्या केक पेक्षा अधिक चविष्ट वाटला. कारण त्या केकच्या पसाऱ्यामागे मुलांचे कष्ट होते आणि त्या करपलेल्या कडांमागे तिची माफी मागण्याची धडपड होती.

देशपांडे कुटुंबासाठी ३१ डिसेंबरची ही रात्र केवळ एका वर्षाचा शेवट नव्हती, तर एका सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि प्रेमळ सहजीवनाची नवीन सुरुवात होती. मध्यमवर्गीय चौकटीत राहूनही विचारांनी 'श्रीमंत' होण्याचा मार्ग त्यांना सापडला होता. नव्या वर्षाचं पहिलं पान कोरल होतं, पण त्यावर 'आदर' आणि 'सहकार्य' ही अक्षरे आता ठळकपणे उमटणार होती.

- समाप्त -

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.