ती , तो आणि डॉगी !

.
अधिक संध्याकाळी घरी आला. तेव्हा घरात असलेला एक कुत्रा त्याला भुंकू लागला.

" पाखी , आपल्या घरी एक कुत्रा घुसला आहे. ए हड हड !" अधिक म्हणाला.

" अधिक , प्लिज त्याला कुत्रा नको म्हणू ना. " पाखी म्हणाली.

" आता कुत्र्याला कुत्रा नाही म्हणणार तर काय म्हणणार ? मांजर ? " अधिक म्हणाला.

" डॉगी म्हण. आणि हड नको म्हणू. " पाखी म्हणाली.

" मग काय म्हणू ?" अधिक म्हणाला.

" टॉमी शू. शू. " पाखी म्हणाली.

" आणि या कुत्र्याने म्हणजे टॉमीने शू शू ऐकून खरच शू केली तर ?" अधिक म्हणाला.

" अधिक तू पण ना. " पाखी म्हणाली.

" कुणाचा आहे हा कुत्रा सॉरी डॉगी. " अधिक म्हणाला.

" आपला. " पाखी म्हणाली.

" काय ?" अधिक म्हणाला.

" अरे मी आजच हा डॉगी विकत घेतला. फक्त वीस हजाराला. " पाखी म्हणाली.

" काय वीस हजार ?" अधिक म्हणाला.

" हो. बाकीचे डॉगी लाखांपर्यंत होते. तरी मी स्वतःवर नियंत्रण ठेवून हा वीस हजाराचा डॉगी घेतला. " पाखी म्हणाली.

" पाखी , इतकी महागडी वस्तू घेण्याआधी तुला मला विचारावेसेही नाही वाटले ? वीस हजार ही काही छोटी रक्कम नाही. मी माझ्या सॅलरीत फ्लॅटचे हफ्ते , दीपिकाची सॅलरी , घरी पाठवायचे पैसे हे सर्व भागवतो. तू असं कसं पैसे उडवू शकतेस यार. " अधिक म्हणाला.

" तुला जर पैश्यांची गरज लागली तर मी पप्पांना मागते. " पाखी म्हणाली.

" पाखी , आपलं लग्न झाले आहे. आपला संसार आपणच जबाबदारीने सांभाळायचा. आताच्या आता हा डॉगी रिटर्न करून ये. " अधिक म्हणाला.

" नाही. नो रिटर्न पॉलिसी आहे. " पाखी म्हणाली.

" ओह शीट. पण काय गरज होती हा डॉगी घेण्याची ?" अधिक म्हणाला.

" मी संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला जाते तेव्हा एकटीच जाते. सोबत कुणी नसते. " पाखी लटक्या सुरात म्हणाली.

" अले बापले ! मग मला सांगायचे ना. मी आलो असतो. हा कुत्रा सॉरी डॉगी घेण्याची काय गरज होती ? असेही नवरे लग्नानंतर डॉगीच बनतात बायकांसाठी. " अधिक म्हणाला.

" प्लिज. दोघांची तुलना करून अपमान नको करूस." पाखी म्हणाली.

" ठीक आहे. मी माझा अपमान नाही करवून घेणार. थँक्स. छान वाटले तुला माझी इतकी काळजी आहे बघून. " अधिक म्हणाला.

" अरे म्हणजे डॉगीची तुलना नवऱ्यासोबत करून डॉगीचा अपमान नको करूस. " पाखी म्हणाली.

" म्हणजे ? तुला हा डॉगी नवऱ्यापेक्षा उच्च दर्जाचा वाटतो ? सिरियसली पाखी ?" अधिक म्हणाला.

" हो. ऑबियसली अधिक. परवादिवशी समोरच्या बिल्डिंमध्ये एक मुलगी रहायला आली होती. " पाखी म्हणाली.

" हो. खूप सुंदर होती. " अधिक म्हणाला.

" बघितले. तुझे लग्न झाले आहे. तरी दुसऱ्या मुलींकडे बघतोस. पण हे डॉगीज खूप लॉयल असतात." पाखी म्हणाली.

" डॉगी सुंदर मुलींकडे कशाला बघतील ? ते ते त्यांच्या प्रजातीमधील फिमेल बघतील. " अधिक म्हणाला.

" शट अप. " पाखी म्हणाली.

" पण पाखी , तूच विचार कर. डॉगीची काय गरज ? तुला दीपिकाने सुचवलं का हे ?" अधिक म्हणाला.

" हो. " पाखी म्हणाली.

" वाटलंच. " अधिक म्हणाला.

" नाही म्हणजे दीपिकाने एका कथेची लिंक पाठवली होती. रसिका मॅडमची कथा होती. " ती , तो आणि डॉगी. " त्या कथेत डॉगीमुळे नवराबायकोचे रिलेशनशिप स्ट्रॉंग होते. " पाखी म्हणाली.

" पण पाखू आपले तर रिलेशनशिप आधीपासूनच स्ट्रॉंग आहे ना. " अधिक म्हणाला.

" हो. पण या डॉगीचे अजून पण फायदे आहेत. " पाखी म्हणाली.

" कसले ?" अधिक म्हणाला.

" आपण या डॉगीचे रिल्स बनवू. ते इन्स्टाग्रामवर टाकू. हळूहळू आपले फॉलोअर्स वाढतील. आपण ब्रँडस प्रोमोट करू. युट्यूबवर व्लॉग बनवू. आपले एक मिलियन सबस्क्राइबर्स होतील. घरी सिल्व्हर प्लेट येईल. आपली लाखोंची कमाई होईल. " पाखी म्हणाली.

" पाखू , रातोरात फॉलोअर्स नाही मिळत ग. खूप कष्ट करावे लागतात. " अधिक म्हणाला.

" हा डॉगी आपली रक्षा करेल. समज , तू घरी नसलास आणि घरी चोर घुसले तर ?" पाखी म्हणाली.

" चोरी करायला घरी आहे तरी काय ?" अधिक म्हणाला.

" काय म्हणालास ?" पाखी म्हणाली.

" काही नाही. मी म्हणतोय जर तुला डॉगीच हवा होता तर मागच्या गल्लीत कितीतरी पिल्ले रोज दिसतात मला. एखादे आणले असते उचलून. " अधिक म्हणाला.

" अधिक , अस रस्त्यावरचे कुठलेही उचलून आणायचे का ? एक स्टँडर्ड असावा ना. आणि त्या डॉगीचे रिल्स टाकले तर लाईक्स पण नाही मिळणार. " पाखी म्हणाली.

" धन्य आहेस तू पाखी. जाऊदे. मी फ्रेश होतो. मला पटकन जेवायला दे. " अधिक म्हणाला.

अधिक फ्रेश होऊन आला.

" पाखी , मला जेवायला दे. खूप भूक लागलीय. " अधिक म्हणाला.

" अधिक , किचनमध्ये आहे जेवण. तू प्लिज सर्व्ह करून घे ना. मी तोपर्यंत टॉमीला खाऊ घालते. " पाखी म्हणाली.

" आज मॅच बघायची आहे. " अधिक म्हणाला.

" जमणार नाही. टॉमी अनुपमा बघतच जेवतो. " पाखी म्हणाली.

" वाह ! जशी मालकीण तसा कुत्रा सॉरी डॉगी. " अधिक म्हणाला.

***

रात्री अधिक बेडरूममध्ये झोपायला आला.

" पाखी , या कुत्र्याला सॉरी डॉगीला बाहेर हाकल बर !" अधिक म्हणाला.

" अधिक , याचे नाव " टॉमी " आहे. प्लिज याच्याशी आदराने बोलत जा. " पाखी म्हणाली.

" मिस्टर टॉमी , प्लिज माझ्या बेडवरून उतरण्याचे कष्ट करा आणि मला झोपू द्या. इतका आदर पुरेसा आहे का पाखी ?" अधिक म्हणाला.

" हा. पण टॉमीला बेडवरच झोप येते. तू बाहेर हॉलमध्ये झोप. " पाखी म्हणाली.

" हा कुत्रा सॉरी डॉगी माझ्या बेडवर झोपेल ?" अधिक म्हणाला.

" हो. इतका का चिडतोय ? तुझ्यात ना भूतदयाच नाही. " पाखी म्हणाली.

" भूतांबद्दल दया असून काय करायचे ?" अधिक म्हणाला.

" भूतदया म्हणजे प्राण्यांविषयी दया. " पाखी म्हणाली.

" हो का पाखी ? तुझ्यात आहे का भूतदया ?" अधिक म्हणाला.

" मग ? आय एम अँनिमल लव्हर. " पाखी म्हणाली.

" ठीक आहे. मला क्रेविंग होत आहे. मी चिकन बर्गर ऑर्डर करतोय झोमॅटोवरून. तुला काही हवे का ?" अधिक म्हणाला.

" एक चिकन बिर्याणी आणि एक चिकन बर्गर. " पाखी म्हणाली.

" वाह ! अँनिमल लव्हरचे लव्ह प्राण्याप्राण्यांमध्ये भेदभाव करते हे आजच कळले. हॅशटॅग हिप्पोक्रसी की भी सीमा होती है. " अधिक म्हणाला.

" तू जा ना झोपायला. नाही तर या कुत्र्याला तुझ्या मागे सोडेल. " पाखी म्हणाली.

" कुत्रा ?" अधिक म्हणाला.

" सॉरी डॉगी. " पाखी म्हणाली.

अधिक झोपायला निघून गेला.

***

दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. त्याला त्याचा टाय सापडत नव्हता.

" पाखू माझा टाय सापडत नाहीये. " अधिक म्हणाला.

अधिक हॉलमध्ये आला तर त्याला त्याचा टाय टॉमीच्या गळ्यात लटकलेला दिसला. पाखी टॉमीच्या फोटो काढत होती.

" पाखी , माझा ब्लेझर पण घाल ना त्याला. खूप छान दिसेल. " अधिक म्हणाला.

" नाईस आयडिया. तो स्काय ब्ल्यूवाला की ब्लॅक कलरचा घालू ?" पाखी म्हणाली.

" पाखी , मला लेट होत आहे. तो टाय दे. " अधिक म्हणाला.

" घे. जळका कुठचा. " पाखी टाय देत म्हणाली.

" काय वेळ आली आहे माझ्यावर ? कुत्र्यापासून जेलस फील होत आहे. " अधिक म्हणाला.

अधिक ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये त्याचा " राहुल " नावाचा एक घनिष्ठ मित्र होता. अधिकने राहुलजवळ आपली व्यथा सांगितली.

" एक उपाय आहे. " राहुल म्हणाला.

" कसला ?" अधिक म्हणाला.

" आपण त्या डॉगीला किडनॅप करू. " राहुल म्हणाला.

" किडनॅप करून काय पाखीला पैसे मागायचे का ? पाखी मलाच पैसे मागेल. मग माझे पैसे मलाच येतील. " अधिक म्हणाला.

" नाही रे. माझा एक मित्र तो अश्या डॉगीजला ब्लॅक मार्केटमध्ये विकतो. तो तुला वीस हजारच्या डॉगीचे कमीत कमी तीस हजार तर देईलच. " राहुल म्हणाला.

" अरे वाह ! स्कीम चांगली आहे. बसल्या बसल्या दहा हजारांचा फायदा. " अधिक म्हणाला.

" हो. तू फक्त आज रात्री त्या डॉगीला घेऊन ये. मी तुला कॉल करतो. वहिनीला सोबत नको आणू बर. "
राहुल म्हणाला.

" हो. पण काही वाईट कामे तर नाही करणार ना त्या डॉगीसोबत ?" अधिक म्हणाला.

" नाही रे. पूर्ण काळजी घेतली जाते. त्या डॉगीपासून पिल्ले जन्माला घालतात आणि नंतर त्याला दुसऱ्या कस्टमरला विकतात. " राहुल म्हणाला.

***

संध्याकाळी अधिक घरी आला. पाखी रडत होती.

" पाखी , काय झाले ?" अधिक म्हणाला.

" टॉमी.." पाखी म्हणाली.

" टॉमी मेला ?" अधिक म्हणाला.

पाखीने अधिकला एक बुक्की मारली.

" मग काय झाले ? कुठेय तो कुत्रा सॉरी डॉगी ?" अधिक म्हणाला.

" आज माझी मैत्रीण सीमा आली होती. तिच्याकडे पण एक फिमेल डॉग आहे. मग तिने तिच्या बीचसाठी ?" पाखी म्हणाली.

" बीच ?" अधिक म्हणाला.

" म्हणजे त्या फिमेल डॉगसाठी. लुसीसाठी. आपल्या टॉमीचा हात मागितला. तिला दोघांचे लग्न लावून द्यायचे होते. " पाखी म्हणाली.

" काय दिवस आलेत. लोक कुत्र्यांचेपण लग्न लावून देताय. आणि इथे आम्ही माणसे. उंची कमी , पगार कमी , केस कमी , वजन कमी , काळा रंग , शेत नाही , स्वतःच घर नाही , कार नाही म्हणून शंभर मुलींकडून रिजेक्ट होतो नुसते. त्या कुत्र्यासाठी सॉरी डॉगीसाठी बसल्या बसल्या सोयरीक चालून आली. "
अधिक म्हणाला.

" ऐक तर. लग्नानंतर त्या टॉमीला स्वतःजवळ ठेवून घेणार म्हणे. घरजावई म्हणून. " पाखी म्हणाली.

" एक कुत्रा घरजावई. " अधिक हसत म्हणाला.

" मग मी ही वरमाता म्हणून हुंडा घेतला. " पाखी म्हणाली.

" हुंडा ? पाखी , इथं पुरुषांना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ आली आहे आणि तू कुत्र्याच्या सॉरी डॉगीच्या लग्नासाठी हुंडा घेतलास ?" अधिक म्हणाला.

" हो. वरमाता आहे ना मी. " पाखी म्हणाली.

" ओ कमऑन पाखी. तुला डॉगीची वरमाता होण्यात इंटरेस्ट असेल पण मला डॉगीचा वरपिता होण्यात काही इंटरेस्ट नाही. " अधिक म्हणाला.

" मी त्या सीमाकडून चाळीस हजार घेतले. तिला टॉमीची किंमत खोटी सांगितली. हे धर तुझे वीस हजार रुपये. तू दोन दिवस खूप स्ट्रेसमध्ये होतास ना." पाखी म्हणाली.

" ओह पाखू. आय एम सॉरी. मी खूप जास्त बोललो ना तुला. " अधिक म्हणाला.

" इट्स ओके. " पाखी म्हणाली.

" आता बाकीच्या वीस हजाराचे काय करणार ?" अधिक म्हणाला.

" एक कॅट आणणार. " पाखी म्हणाली.

दोघेही हसले आणि पाखी अधिकच्या घट्ट मिठीत विसावली.

©® पार्थ धवन



🎭 Series Post

View all