संध्याकाळी ऑफिसच्या बसने कॉर्नरला सोडले. तिथून घरापर्यंतचा रस्ता १० मिनिटांचा. नेहेमी प्रमाणे, एका हातात डब्याची बॅग, खांद्यावरची पर्स दुसऱ्या हाताने घट्ट पकडून होता होईल तेव्हढी झर झर पावलं टाकत चाललेली. एका बाजूला थोडं फार खोदकाम, आणि पार्क केलेल्या गाड्या, स्कुटर्स , दुसऱ्या बाजूला मागून येणाऱ्या गाडया.
अचानक एकदम हिसका बसला. तिने चमकून बघितलं तर दोघं जण बाईक वर होते, मागचा तिची पर्स जोराने खेचत होता. अजाणतेपणी तिने पर्स घट्ट पकडून ठेवली तस तो माणूस अजूनच जोराने ओढू लागला आणि पुढच्याने बाईक सुरु केली. पुढचं काही कळायच्या आतच, पर्स त्याच्या हातात होती आणि तिने रस्त्यावर सपशेल लोटांगण घातले होते. कशी बशी उठली आणि तशीच हळू हळू चालत घरी पोहचली.
पर्स, पाकीट, पैसे, कार्ड, मोबाईल तर गेलेच होते. त्याची तक्रार करायला हवी होती, कार्ड कॅन्सल करायला हवे होते. पण ती इतकी हवालदिल झाली होती. आल्या आल्या तिने डॉक्टराना फोन केला, आणि पैसे फाईल घेऊन पहिले दवाखाना गाठला. नशिबाने त्या भयंकर गर्दीत तिला ५ मिनिट का होईना डॉक्टर बघायला तयार झाले होते. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं आणि सगळं नीट असल्याचं सांगितलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.
त्या पाच महिन्याच्या न जन्मलेल्या जीवाला पोटावरून हात फिरवत कुरवाळत तिने हलकेच निश्वास सोडला. तिथून येईपर्यंत चांगलाच उशीर झालेला. घरात पऊल टाकताच तिने तीन वर्षाच्या पिल्लाला उराशी कवटाळले.
त्याच रस्त्यावरून कितीतरी वेळा त्या इवल्या जीवाचा हात पकडून त्याला घेऊन ती चालली होती. नशीब थोडक्यात निभावले. आज हातातून पर्स खेचली, कधी जर बाळाचा हात खेचला असता तर ....
त्या माउलीच काळीज पोटातल्या आणि हातातल्या दोन्ही बाळांच्या काळजीने जड झालं होतं. पण रहाट-गाडगं कुणाला चुकलंय? त्या हळव्या क्षणांना डोळ्यातल्या आसवांबरोबर पुसून ती पुन्हा अजून एका उद्यासाठी सज्ज व्हायला आज रात्रीचा दिवा मालवायला गेली.
वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि ... !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा