ती आणि स्वातंत्र्य (अलक)

गोष्ट तिची
अलक



"अनु, आज जेवायला काहीतरी मस्त, चमचमीत बेत करा." विजयने फर्मान सोडलं.
"अरे, बायकोला काय सांगतोस? असे लहान - सहन निर्णय ती घ्यायला लागली तर उद्या डोक्यावर मिरे वाटेल." भारती काकू फणकाऱ्याने म्हणाल्या.
"घरातली कर्ती स्त्री म्हणून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिलाच आहे म्हणूनच सांगतोय."
'कर्ती स्त्री' या शब्दावर जोर देत विजय म्हणाला आणि भारती काकूंना चरफडत गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता.


2
"लग्नानंतर कम्पल्सरी साडी नेसावी लागेल. मुलीने नोकरी केलेली अजिबात चालणार नाही. नवऱ्यासोबत कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. एकत्र कुटुंब असल्याने स्वयंपाक -पाणी उत्तमच व्हायला हवं. पाहुणे मंडळी आली तर बैठकीच्या खोलीत तिने येता कामा नये. शिवाय त्या चार दिवसांत तिला बाजूला बसावं लागेल." आईच्या या अटी ऐकून युवराजची मान खाली गेली.
कारण आपल्या बहिणींना यातल्या कोणत्याही अटी आईने घातल्या नव्हत्या. मग होणाऱ्या सुनेलाच का? हा प्रश्न त्याला पडला होता. त्याने मान वर करून पाहिलं तेव्हा मुलगी आणि तिचे कुटुंबीय उठून निघून चालले होते.


3
दिवसभर कामधंदा न करता रिकामं राहून रात्री पिऊन जोर - जबरदस्ती करणाऱ्या नवऱ्याने आपल्या बायकोला दिवसभर कामाला जाण्याची अगदी मोकळेपणाने परवानगी दिली होती. यामुळे तीही आनंदाने कामावर जात होती. कारण तिचा तेवढा वेळ चांगल्या कामासाठी खर्च व्हायचा. शिवाय स्वतःचे काही पैसे हातात यायचे. रात्रीच्या स्वातंत्र्यापेक्षा हे दिवसभराचे स्वातंत्र्य ती आनंदाने उपभोगून घ्यायची.


4
"तू दिवसभर घरीच तर असतेस. अशी काय मोठी काम असतात तुला? आपल्या मुलांवर योग्य संस्कार करता येत नाहीत? त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवता येत नाहीत?" नुकताच कामावरून आलेला नवरा आपल्या बायकोला जाब विचारत होता.
"ही माझ्या एकटीची जबाबदारी नाही. कधीतरी तुम्हीही आपल्या संसारात लक्ष घाला." अखेर ती न राहवून म्हणाली आणि त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला.


5
"चार दिवस जरा काय गावाला गेले अन् संपूर्ण स्वयंपाकघराचा आराखडाच बदलला. सगळं तुझ्या मनाप्रमाणे करायला हे तुझं माहेर नाही तर सासर आहे हे नीट लक्षात ठेव." सासुबाई आपल्या सुनेवर तणतण करत होत्या.
नवीन आलेली सून आपल्या सासुबाईंचं हे बोलणं खाली मान घालून ऐकून घेत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून नवऱ्याने मात्र तिच्याकडे पाठ फिरवली.


6
वहिनीचा स्वयंपाक चविष्ट असतो म्हणून नणंद तिची स्तुती करू लागली आणि सासुबाईंच्या पोटात लगेच दुखायला लागलं.
"स्वयंपाक करणं समस्त स्त्री जातीला जमायला हवं. त्यात काय कौतुक आलंय मोठं?" सुनेकडे पाहून त्यांनी नाक मुरडलं अन् मनातल्या मनात उद्यापासून स्वयंपाकघर पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घ्यायचा विचार पक्का केला.


7
मुलीचं लग्न ठरलं आणि वडील तिच्या होणाऱ्या सासुबाईंना म्हणाले, "आमच्या मुलीला पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे. तेवढी परवानगी तिला देण्याची मी विनंती करतो."
"असं कसं? मुलगी एकदा का संसारात पडली की मागचं सगळं तिने विसरून जावं. नाहीतरी शिक्षणाचा असा काय मोठा उपयोग होणार आहे?" आपल्या आईचं हे म्हणणं ऐकून मुलाने मात्र मान खाली घातली.


8
मोठ्या मुलीला सासरी जाच होत होता म्हणून दीपकराव तिला पुन्हा माहेरी घेऊन आले. पण यामुळे त्यांना आपल्या लहान मुलीच्या लग्नाचे कसे होणार? ही चिंता त्यांना सतावू लागली.
त्यातच तिला एक चांगले स्थळ चालून आले म्हणून दीपकरावांनी आपल्या मोठ्या मुलीस समजूत घालून चौथ्यांदा सासरी परत पाठवले.


समाप्त.
©️®️सायली जोशी.