( मागच्या भागात आपण पाहिले की, तन्वी ऑफिसावरून परतताना, तिला पाठीमागून आवाज येतो .... आता पाहूया पुढे या भागात काय होते ते ... )
"मलाच शोधते आहेस न? " तिच्या कानावर शब्द आदळले तशी ती थबकली. तिने मागे हळूच वळून पाहिले.
तो त्याच्या जीन्सच्या पँटच्या खिशात हात घालून शांतपणे उभा होता. आज तो अगदी रुबाबदार आणि सोबर वाटत होता.
त्याला अचानक असे समोर बघून तिच्या हृदयाच्या ठोक्यात कमालीची वाढ झाली होती. डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. तिने प्रयासाने ते पापण्याआडच रोखले. त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारावी. अशी इच्छा नकळत मनाला स्पर्शून गेली होती परंतु शरीराने तिच्या मनाला मान्यता दिली नव्हती.
" कशी आहेस? "
त्याने विचारले तशी ती भानावर आली.
"ठिक" तिने मोघम उत्तर दिले.
"तू कसा आहेस?" तिच्या मनात आले त्याला विचारावे, पण ते तिच्या मनातच राहीले.
" रागावली आहेस न माझ्यावर? " त्याने विचारून पुन्हा दोघांमधली शांतता भंग केली.
ती अजूनही शांत होती.
"तुझा हक्क आहे रागवण्याचा. चूक माझीच होती."
तिला भडाभडा त्याच्याशी खूप काही बोलावेसे वाटत होते. पण प्रत्यक्षात तिच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तिच्या मनाची अस्वस्थता, घालमेल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.
ती नुसतीच पदराशी चाळा करत इकडे तिकडे बघत होती. त्याच्याशी बोलताना कोणी ओळखीचे आपल्याला पाहत तर नाही न या विचाराने, तिची अर्धीआधिक भीतीने गाळण उडाली होती. तिच्या हृदयाची स्पंदने तिला स्पष्ट ऐकू येत होती.
" रेखा, माझे नशीबचं फाटकं. त्याला कोण काय करणार? त्याला जमेल तसे ठिगळं लावायचा प्रयत्न करत असतो पण ते अजूनच फाटत जातं. कदाचित नियतीच्याचं मनात नव्हते, तू माझ्या फाटक्या आयुष्यात यावे म्हणून. असो..
तुझी हरकत नसेल तर आपण कुठेतरी बसून बोलूया का? तू कधीतरी मला भेटशील या दिवसाची मी गेले चौदा वर्षे नऊ महिने तीन दिवस वाट पाहतोय. अपराधी भावनेच्या विश्वात जगतोय."
त्याचा कंठ दाटून आला होता. पुढचे काही बोलायला त्याला जमले नाही. अश्रू रोखत तो मान खाली घालून तिच्या उत्तराची वाट पाहत उभा होता.
त्याला असे भावनाविवश झालेले पाहून तिच्या हृदयात कालवाकालव झाली अन् तिच्याही नकळत अस्पष्ट का होईना ती "हो" म्हणाली.
" मी इथे जवळच राहतो. दोन मिनिटांच्या अंतरावर. एकटाच असतो. तुझी हरकत नसेल तर .. घरीच बसून बोलूया." घश्यात अडकलेला आवंढा गिळत त्याने विचारले.
"हं" तिच्या तोंडून पुन्हा अस्पष्ट हुंकार बाहेर पडला. ती त्याच्या मागोमाग अनाहूतपणे भारावल्यासारखी चालू लागली. अगदी काही पावलाच्या अंतरावर त्याची बिल्डिंग होती. त्याने लिफ्टमध्ये सतरा नंबरचे बटन दाबले. तोपर्यंत तिच्या मनात सतरा विचार येऊन गेले असतील.
त्याने घराचा दरवाजा उघडून तिला आत घेतले अन् सोफ्यावर बसायला सांगितले. पाणी आणण्यासाठी तो गेला. तेवढ्या वेळात तिने संपूर्ण घरावर नजर फिरवली.
घरात बाई नसल्याची उणीव स्पष्टपणे जाणवत होती. एका क्षणासाठी तिला वाटले, पदर खोचावा अन् सर्व घर आवरून घ्यावे.
तो एका गलासात पाणी घेऊन आला. तिने ते गटागट प्यायले. तिला त्याची आवश्यकता होती.
अमित तिचा कॉलेजचा जुना मित्र जरी असला तरी, आता तो तिच्यासाठी परपुरुष होता. तिचे असे त्याच्यासोबत, त्याच्या घरात एकटे असणे तिच्या संस्कारात बसणारे नव्हते. तरी ती त्याच्या सोबत आली होती म्हणूनच तिच्या घश्याला कोरड पडली होती.
पाणी पिऊन ग्लास ठेवताना, तिने हातातल्या घडाळ्याकडे पाहिले.
तिला नक्की काय म्हणायचे आहे, ते त्याच्या लक्षात आले होते.
"फार वेळ नाही घेत रेखा तुझा. खरंतर पंधरा दिवस तुला न पाहता राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु तू माझ्या बाबतीत, विचार करून योग्य निर्णय घ्यावा असे मला वाटत होते.
आपण लगेच लग्न करणार नसलो तरी, आपले संबंध पुढे न्यायचे असले किंवा नसले तरी, आपल्या प्रेमाची तीव्रता पंधरा दिवसात आपल्याला जाणवली असती. विशेषता तुला निर्णय घेण्यासाठी ती आवश्यकता होती. म्हणूनच मी तुला पंधरा दिवसांनी भेटणार होतो.
त्या दिवशी मी तुला भेटायला खूप आतुर झालो होतो. नेहमीप्रमाणे मी अंबरनाथ स्टेशनवर आलो होतो. ट्रेनचा काहीतरी गोंधळ चालला होता. ट्रेन्स नेहमीपेक्षा खूप उशिरा धावत होत्या. फलाटावर गर्दी मी म्हणत होती.
बऱ्याच वेळाने, कर्जतवरून सीएसटीला जाणारी लोकल आली, तेव्हा तिला पकडण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. आधीच तोबा गर्दी असलेल्या लोकलमध्ये मुंगीलाही शिरकाव करायला जागा नव्हती. पुढची लोकल केव्हा येईल याची खात्री नव्हती. मी ती लोकल जीवाची बाजी लावत पकडली. आत शिरण्याचा प्रश्नच नव्हता. मी लोकलच्या दारातच लोंबकळत होतो.
आत धक्काबुक्की चालूच होती. लोकल अंबरनाथ सोडून काही मिनिटच झाले असतील नाही तोच आतल्या धक्याबुकीने, माझा दांड्याला पकडलेला हात निसटला अन् मी खाली पडलो.
हॉस्पिटलमध्ये जेव्हा तीन दिवसांनी शुद्धीवर आलो तेव्हा लक्षात आले, माझा उजवा पाय गुढग्यांपासून कापला गेला होता. डोक्याला आणि अंगावर मार लागल्याच्या बऱ्याच जखमा बॅडेजखाली ठणकत होत्या."
एका दमात सारे बोलून झाल्यानंतर, त्याने त्याचा आर्टिफिशियल उजवा पाय काढून बाहेर ठेवला होता.
( या भागात आपण पाहिले की तन्वी, अमितच्या सांगण्यावरून त्याच्या घरी येते. अमित तिला न भेटण्याचे कारण सांगतो. पाहूया पुढच्या भागात काय होते ते ..... )
©®विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा