ती अनपेक्षित वळणावर आयुष्याच्या (भाग -४)

She Meets Accidently To Her First Love After Thirteen Years of Her Marriage

( मागच्या भागात आपण पाहिले की, ऑफीस मधून सुटल्यानंतर, तन्वीची नजर अमितला शोधत होती ..... आता पाहूया या भागात काय घडते ते ... )

तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा कॉलेजचे दिवस येत होते.  त्या दिवसांत तिला सहन करावा लागलेल्या मानसिक यातना आठवून तिच्या पापण्या जड झाल्या होत्या.

कॉलेजचे शेवटचे संपूर्ण वर्ष, केव्हातरी तो भेटायला येईल या आशेवर, तिने त्याची वाट पाहत त्याच्या विरहात काढले होते.  कॉलेज संपले तशी तो परत येण्याची तिची आशा मावळली होती. 

ती पुन्हा नको असलेल्या त्या आठवणीत रेंगाळली होती.  ती स्वतःच्या मनाशीच बोलत होती.

' सुरवातीचे ते पंधरा दिवस, पंधरा वर्षासारखे वाटत होते.  त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये मन रमत नव्हते.  माझी नजर सारखी त्याला शोधत राहायची.  कधीतरी वाटायचे, त्यालाही माझी खूप आठवण येऊन, तो मला मध्येच भेटायला येऊन सरप्राइज देईल.  पण तसे झाले नव्हते.

पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही, तो आला नाही, तेव्हा मात्र जीवाची घालमेल व्हायला लागली होती.  मन एका विचित्र भीतीच्या सावटाखाली वावरत होते.  तो पुन्हा कधी भेटेल की नाही अशी शंका मनात घर करू लागली होती.  त्याचा विरह दिवसेंदिवस असह्य होऊ लागला होता.

जवळच्या मैत्रिणींच्या ते लक्षात यायला वेळ लागला नव्हता.  त्यांनी खोदून खोदून विचारल्यानंतर, त्यांना मी सर्वकाही खरे सांगून टाकले होते. 

मला लग्नाचे त्याने वचन देऊन तो मला फसवून गेला नव्हता परंतु मला लग्नासाठी विचार करायला लावून तो स्वतः चं गायब झाला होता.  त्याचे काही बरेवाईट झाले असेल.  हा विचार करायला मन धजत नव्हते.  त्याने मला फसवले असेही म्हणता येत नव्हते.  तरी त्याच्यात गुंतेलेले माझे मन त्याची वेड्यासारखी वाट पाहत होते.

तसे पाहिले तर, त्याने मला लग्नासाठी विचारेपर्यंत, आमच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होईल, असा विचारही माझ्या डोक्यात कधी आला नव्हता.  कदाचित लग्नाचा विचार मनात येण्यासाठी, मी परिपक्व झाली नसावी.  तशी मी थोडी अल्लडचं होते.

सहा सात महिने मी त्याला रोज कॉलेजमध्ये पाहत होते.  कधीतरी तो मला चोरून भेटत होता.  त्याची साथ मला हवीहवीशी वाटत होती.  दिवस मजेत जात होते.  कदाचित आमच्या भविष्याचा विचार माझ्या मनात यायला, माझ्या दृष्टीने एवढा अवधी झाला नसावा किंवा मी फक्त त्याच्या प्रेमात तरंगत होते.

त्याने लग्नाचा विषय काढल्यानंतर मी त्याविषयी भानावर आले होते.

पण का कोण जाणे, त्याने त्याची घरची परिस्थिती सांगितल्यानंतर, त्याच्याशी लग्न करण्याच्या विचाराने अंगावर काटा येत होता.  त्याच्याशी लग्न करून तो जगत असलेले आयुष्य मलाही जगावे लागेल ही भीती मनात कुठेतरी होती.  शिवाय अशा घरात लग्न करून द्यायला घरचे तयार होतील की नाही ही शंकाही होतीच.  पळून जाऊन लग्न करण्याची हिम्मत तर अजिबातच नव्हती.

तरीही त्याच्यापासून वेगळे व्हायला मन कचरत होते.  मला फक्त तो हवा होता.  माझ्या अवतीभोवती.  माझ्यावर मनापासून प्रेम करणारा अमित.

त्याच्या प्रेमात मी अंखड बुडाले होते.  त्याचेही माझ्यावर तितकेच प्रेम होते.  तरीही तो मला भेटायला का आला नाही याचे कोडे सुटता सुटत नव्हते.

शेवटी माझे कॉलेज संपायची वेळ आली आणि तो माझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही,  अशी मी माझ्या मनाची समजूत घालून घेतली. 

घरच्यांना पसंत पडलेल्या सरकारी नोकरी आणि एकुलता एक मुलगा असलेल्या पहिल्याच स्थळाला मी होकार दिला होता.  नचिकेत माझ्या आयुष्यात आला.  कल्याण सोडून मी नाशिकला राहायला गेले.  हळूहळू नव्या बदलाला सामोरे जात होते.  भूतकाळ नकळत मागे पडत गेला होता.

नचिकेतला मनापासून आपले मानले होते.  त्याच्यात गुंतत गेले होते.  तोही माझ्यावर मनापासून प्रेम करत होता.  सुरुवातीचे दिवस भुर्रकन हवेत विरले होते.  अमित मनात फक्त अधूनमधून डोकावत होता परंतु तो एका प्रश्ना पुरता.  तो का मला भेटायला आला नसावा?  त्याचे काही बरे वाईट झाले तर नसेल न हा विचारही मनात चमकून जायचा आणि अंगावर शहारा आणायचा.

कधीतरी नचिकेत आणि अमितच्या स्वभावाची, मनातल्या मनात तुलना व्हायची अन् त्याच्या सोबतच्या आठवणी उफाळून यायच्या. 

अमेयच्या जन्मानंतर मात्र, तो अगदी हृदयात एका कोपऱ्यात दडी मारून बसला होता.  त्याची आठवण त्या कोनाड्यात आपोआप बंद झाली होती.  मी आई झाले होते.  अमेयमध्ये पूर्णपणे गुंतले गेले.  माझे नचिकेतकडे नकळत दुर्लक्ष होत गेले. 

मुलं जन्माला आल्यावर पतीपत्नी अजून मनाने जवळ येतात असे ऐकले होते.  परंतु माझ्या बाबतीत अगदी उलटे झाले होते.  माझ्यातले नचिकेतला वाटणारे नावीन्य जवळजवळ संपुष्टात आले होते.  आता तो फक्त एक नवरा आणि मुलाचा बाप होता. 

कधीकधी नचिकेतचे वागणे मनाला खटकायाचे.  इतक्या लवकर त्याचा प्रेमाचा झरा कसा आटला कोडे पडायचे.  मन उदास व्हायचे.  अशावेळी खोलवर आठवणीत असलेला अमित कधीतरी डोळ्यासमोर तरंगत रहायचा. 

पण आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या मला, लग्नानंतर परपुरूषाची आठवणही पाप वाटायचे.  दुसऱ्याच क्षणाला भरकटू पाहणाऱ्या मनाला मी ताळ्यावर आणत होते.

परंतु तो काल भेटल्यापासून त्याच्यासोबतच्या सर्व आठवणी पुन्हा एका पाठोपाठ हृदयाच्या काठावर येऊन धडकल्या होत्या.  त्याच्यात मन इतके बुडून जातेय की बाहेर पडायचे नाव घेत नाही.  मन त्याच्या भेटीसाठी आसुसुलेले आहे.

का मी त्याचा इतका विचार करतेय?  तो मला भेटायला का आला नाही, याचा जाब विचारून मी आता काय साध्य करणार आहे?

ती विचार करत, इकडे तिकडे पाहत घराच्या दिशेने सवयीने पावले उचलत चालली होती अन् अचानक,

" मलाच शोधते आहेस न? " पाठीमागून आवाज आला.

.
.
.


या भागात आपण पाहिले की, तन्वी अजूनही अमितच्या आठवणीत रेंगाळली आहे .... आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते ? ....


©® विद्या थोरात काळे "विजू"

==============================

क्रमशः 


🎭 Series Post

View all