ती अनपेक्षित वळणावर आयुष्याच्या (भाग-२)

She Meets Accidentally To Her First Love After Thirteen Years Of Her Marriage

( मागच्या भागात आपण पाहिले की, तन्वी ऑफिस सुटल्यावर, भाजी घेऊन घरी जात असताना, अचानक तिला एका दारू प्यायलेल्या व्यक्तीचा धक्का लागातो .... आता पाहूया पुढे काय होते ते या भागात .... )

नचिकेत ऑफिसवरून आला होता.  

तन्वी आणि नचिकेत यांचे रितसर कांदेपोह्याचा कार्यक्रम उरकून, तेरा वर्षापूर्वी लग्न झाले होते. अन् कल्याणला रहाणारी तन्वी नाशिकला कायमची राहायला गेली होती.  नचिकेत नाशिक मध्येच एका सरकारी ऑफिसमध्ये, ग्रेड बी लेव्हल अधिकारीच्या पोस्टवर काम करत होता तर तन्वी एका प्रायव्हेट ऑफीसमध्ये कामाला होती. 

सहा महिन्यापूर्वी नचिकेतची ट्रान्स्फर नाशिकवरून मुंबई येथे झाली अन् तन्वीने तिच्या प्रायव्हेट नोकरीचा राजीनामा देऊन ते दोघे, मुंबईत अंधेरीला भाड्याची खोली घेऊन राहू लागले होते.  

त्यांचा एकुलता एक मुलगा, अमेय पाचवीच्या वर्गात शिकत असल्याने, मध्येच शाळा बदलायला नको म्हणून त्याच्या आजी आजोबा बरोबर नाशिकलाच राहिला होता. 

तसे पाहिले तर, ते केवळ एक निम्मित होते.  आजी आजोबांना एकुलत्या एक नातवाचा लळा लागला होता शिवाय त्या दोघांना आधी नव्या जागेत स्थिरस्थावर व्हायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी मुद्दाम शाळेचे निम्मित करून त्याला स्वतःकडे ठेऊन घेतले होते.

तन्वीला नचिकेत सोबत मुंबईला, तिची चांगल्या पगाराची नोकरी सोडून यायचे नव्हते.  परंतु त्याच्या दिमतीला कोणीतरी हक्काचे, बिनपगारी हवे होते.  म्हणून तिचा नाईलाज झाला होता.

नचिकेत तिच्यासाठी नवरा म्हणून कसाही असला तरी, आईबाबांचा एकुलता एक लाडका मुलगा होता.  त्याची नव्या ठिकाणी आबाळ होऊ नये म्हणून त्यांनीही तिला माहेरी जाता येईल आणि नवीन नोकरी तिथेही शोधता येईल असे आमिष दाखवून, तिची होती ती नोकरी सोडायला लावून, त्याच्यासोबत जायला भाग पाडले होते.

ती नाईलाजास्तव आली असली तरी, नंतर तिला मुंबईत रहायला आल्याचे समाधान वाटले होते.  हळूहळू मुंबईच्या वातावरणाची तिला भुरळ पडली होती, शिवाय नचिकेत टूरवर गेला की माहेरी जायला मिळत होते तर कधी आई वडील, भाऊ तिला भेटायला येत होते.

इथे ती नव्याने नोकरीच्या शोधात असतानाच,  तिला एका प्रायव्हेट फर्ममध्ये, क्लार्कची नोकरी आठ दिवसांपूर्वीच लागली होती.

"उद्या अचानक मला दिल्लीला जावे लागणार आहे.  मोठ्या साहेबांनी इमर्जन्शी मीटिंग बोलावली आहे.  बॅग भरून ठेव." पायातले बूट मोजे काढता काढताच, नचिकेतने तिला फर्मान सोडले.

" उद्याच परत येशील न? "

" उद्या रात्री परत येईल किंवा मीटिंग लांबली तर परवा रात्रीपर्यंत परतेन." 

नचिकेतला एक दिवस जरी ऑफिसच्या कामासाठी टूरवर जायचे असले तरी, कपड्याचा कमीत कमी एक जोड तरी बरोबर न्यायची सवय होती.  वेळप्रसंगी कोणत्याही कारणाने थांबावे लागले तर तो कामी येईल हा त्याचा हेतू असायचा.

" ठिक आहे.  एकाच दिवसाचा प्रश्न आहे तर मी आईला सोबतीसाठी नाही बोलावतं.  एकटी राहीन मी." 

" का काय झाले?  सासूबाई तशा काही बोलल्या का?"

" नाही.  ती काहीच बोलली नाही.  एका दिवसासाठी उगीच तिला एवढ्या लांबून ये-जा करावी लागेल.  तसाही अलीकडे तिला वयामानाने प्रवासाचा त्रास झेपत नाही.

" मग तू तिच्याकडे जा." त्याने पर्याय सुचवला.

" माझी नवीन नोकरी आहे.  त्यामुळे उगीच कल्याणवरून यायला मला उशीर झाला तर ... रिस्क नको घ्यायला म्हणून मीही तिकडे जात नाही."

तन्वी त्याला म्हणाली खरी.  परंतु तो या गोष्टीला राजी होईल याची तिला खात्री नव्हती.  त्याने  विषयाला उगीच फाटे फोडू नये म्हणून ती मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होती.

" बघ तुला जे योग्य वाटेल तसे कर." शेवटी त्याने तिचा निर्णय तिच्यावरच सोपवला.

तिला, त्याच्या अचानक समजूतदार बोलण्याचे आश्चर्य वाटले. 

बहुतेक आज ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले असावे किंवा उद्याचे तसेच काही महत्त्वाचे काम असावे म्हणून ... नाहीतर त्याचा संशयी स्वभाव तिला एकटे राहण्यासाठी कधी परवानगी द्यायचा नाही.  मनातल्या मनात तिने देवाचे आभार मानले.

नेहमीप्रमाणे दिवस सरला.  सकाळी दिल्लीला जायचे असल्या कारणाने नचिकेत लवकरच झोपला होता.  तन्वीला काही केल्या झोप येत नव्हती.  रात्रभर ती कुस बदलत होती.  तिच्या त्या चुळबुळीने डिस्टर्ब झालेला नचिकेत तिच्यावर एकदा चिडलाही होता.

ती तरी काय करणार होती?  अमितचा विचार मनात सुद्धा आणायचा नाही असे ठरवूनही त्याने  " रेखा"  म्हणून तिला मारलेल्या हाकेने तिची झोप उडाली होती. 

' काय करत असेल आता तो?  तोही माझाच विचार करत असेल का? 

तो तर अंबरनाथला रहायला होता, मग इथे कसा काय आला? 

शेवटी त्याने त्याच्या बाबांच्या पावलांवर पाऊल ठेवलेच.  त्यांना दारूचे व्यसन होते म्हणून किती राग राग करायचा त्यांचा?  अन् आता स्वतःचं इतका प्यायला होता की स्वतःचा तोलही सांभाळता येत नव्हता. 

त्यालाही दारूचे व्यसन लागले असावे का?

लग्न झाले असेल का त्याचे?  झाले असेल तर कशी असेल त्याची बायको?  तो तिच्यावर मनापासून प्रेम करत असेल का?  माझी आठवण येत असेल का त्याला? ' असे एक ना दोन त्याच्याविषयी तिला प्रश्न पडत होते.

विचार करता करता तिला त्या दोघांचे कॉलेजमधले सुरुवातीचे दिवस आठवले.

.
.
.

या भागात आपण पाहिले की नचिकेत दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त दिल्लीला जाणार आहे तर तन्वी अमितच्या आठवणीत गढून गेली आहे.  आता पाहूया पुढच्या भागात काय घडते ते? ......


©®विद्या थोरात काळे "विजू"

==============================

क्रमशः


🎭 Series Post

View all