Login

ती अनपेक्षित वळणावर आयुष्याच्या ( भाग-३)

She Accidentally Meets Her First Love After Thirteen Years Of Her Marriage

(मागच्या भागात आपण पाहिले की, नचिकेत दिल्लीला निघून गेला आहे आणि तन्वी आठवणीत कॉलेजच्या दिवसापर्यंत येऊन पोहचली आहे ….. आता पाहूया पुढे ….)


विचार करता करता तन्वीला त्या दोघांचे कॉलेजमधले सुरुवातीचे दिवस आठवले.

' बारावीनंतर तिने कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये आर्ट्सला एडमिशन घेतले होते. तर तो कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. वार्षिक कल्चरल ॲक्टिविटीच्या निमित्ताने ते दोघे जवळ आले होते.

त्याचा सावळा रंग आणि उंची सोडली तर, त्याचे दिसणे वागणे अगदी अमिताभ बच्चन सारखेच होते. मुलं ही त्याला अमिताभ म्हणूनच चिडवायची. अनेक मुलीही त्याच्या मागेपुढे करायच्या. त्यामुळे कॉलेजमध्ये त्याच्याभोवती एक वेगळे वलय तयार झाले होते.

तिलाही तो खूप आवडायचा. परंतु तिने त्याला कधी तसे दर्शवले नव्हते. ' परदेशीया … सब कहते हैं, मैने तुझको दिल दिया ' .. या तिनेच सुचवलेल्या गाण्यावर रिअसल करता करता दोघे एकमेकांच्या कधी प्रेमात पडले कळलेच नव्हते.

अन् तेव्हापासून ती त्याच्यासाठी "तन्वी" ची "रेखा" झाली होती.

त्याच्या शेवटच्या वर्षापर्यंत, ते दोघे जमेल तेव्हा लेक्चर बंक करून, चोरून एकमेकांना बाहेर भेटत होते. त्याचे कॉलेज संपले, तसे त्यांचे भेटणेही बंद झाले.

तिचे कॉलेजचे अजून एक वर्ष बाकी होते. मोठ्या मुश्किलीने त्याच्या विरहात जेमतेम मार्क्स मिळवून तिने ते पुरे केले होते.

त्या दोघांची शेवटची भेट दुर्गाडी किल्ल्यावर झाली होती. त्यावेळी त्याने त्याच्या जीवनाची गाथा तिच्यासमोर वाचली होती. ते ऐकून तिला खूप वाईट वाटले होते. त्याचे आयुष्य इतके बरबटलेले असेल असे त्याच्याकडे पाहून कधी वाटले नव्हते.

एवढ्या बिकट परिस्थितीतही, तो स्वतः कधी खचला नव्हता परंतु अशा परिस्थितीत त्याला, ती त्याच्याशी लग्न करेल की नाही याची शंका वाटत होती.

त्याने, तिला घाईघाईत निर्णय न घेता, विचार करायला हवा तितका वेळ घे असे म्हणतं पंधरा दिवसांनी भेटायला येईन, सांगून तिचा निरोप घेतला होता. त्यानंतर तो आज असा तिच्यासमोर आला होता.

त्यावेळी आजच्यासारखे मोबाईल नव्हते की परिस्थितीमुळे घरात लॅंडलाईन फोन नव्हते. त्यामुळे दोघांनाही संपर्क करता येत नव्हता.

नक्की का आणि कुठे गायब झाला होता तो?'

रात्रभर तिच्या डोक्यात तोच एक विचार घोळत होता. पहाटे पहाटे कुठे तिचा डोळा लागला होता.

नचिकेत, सकाळी साडेसहा वाजताच घराबाहेर पडला होता. त्याची साडेनऊची फ्लाईट होती. तो निघून गेल्यानंतर तन्वी पुन्हा झोपून राहिली. रात्रीच्या जागरणामुळे तिचे डोळे चुरचुरत होते. ती अर्धा एक तास तशीच पडून राहीली.

नंतर मात्र घाईघाईने सर्व काही आवरून ती ऑफिसची तयारी करू लागली. तिला उशिरा जाऊन चालणार नव्हते. नवीन नोकरी होती. ऑफिस जॉईन करून केवळ आठच दिवस झाले होते.

अमित मध्येमध्ये मनात डोकावतच होता. पण तिने त्याला प्रयत्नाने तिच्यावर हावी होऊ दिले नाही. कदाचीत नवीन कामाचे तितकेच असलेल्या टेन्शनमुळे तिला ते शक्य झाले असावे.

ऑफिस सुटायची वेळ झाली तशी ती फाईल्सचा पसारा आवरून निघाली. आज रस्त्याने जाताना नकळत तिची नजर त्याला शोधत होती.

एक मन तिचे सांगत होते, ' तो भेटला तर, त्याला विचारता तरी येईल, का तो परत कॉलेजमध्ये मला भेटायला आला नाही? ती त्याच्याशी लग्न करणारच नाही याची त्याला खात्री वाटत होती का?'

दुसऱ्या क्षणाला तिचे मन तिला तसे करण्यापासून अडवत होते. ' आता माहीत करून तरी काय करायचे? माझे लग्न झाले आहे. मला एक अकरा वर्षाचा मुलगा आहे. उगीच तो भेटल्यानंतर काही प्रॉब्लेम उद्वभवला तर? नचिकेतला आधीच ती कोणत्या पुरुषाशी बोललेले फारसे आवडत नाही. पैशाची जर त्याला हाव नसती तर, कदाचित त्याने तिला जॉबही करू दिला नसता.

परंतु तो पुन्हा असाच पिऊन भेटला तर मला आवडेल का त्याच्याशी बोलायला?

का बरे तो एवढा पित असेल? माझ्या विरहामुळे तर नसेल न? पण कसे शक्य आहे तोच मला भेटायला आला नव्हता.

विचारायलाच हवे, इतका दारूचा तिटकारा होता तर, का पियाला लागला आहेस म्हणून?

भेटू दे त्याला, आज विचारतेच त्याला.

नको ... मला त्याच्यासोबत कोणी पाहिले तर? अन् नचिकेतला नेमके कुठून तरी कळाले तर?

नकोच. तो न भेटलेलाच बरा. पण आता ह्या भरकटलेल्या मनाचे काय करू? इतके दिवस ते शांत होते. आता त्याला भेटल्याशिवाय ते शांत होईल असे वाटत नाही. एकवेळ तो भेटलाच नसता तर आठवांचा पसारा असा समोर आला नसता.

शांत पाण्याच्या डोहात केवळ एक दगड फेकला असता अनेक तरंग उमटतात. तसेच काहीसे झाले आहे. त्याच्या नजरेला नजर भिडली अन् त्याच्या सोबतच्या साऱ्या आठवणी आपोआप जागृत झाल्या आहेत.
मी जितक्या त्या विसरण्याचा प्रयत्न करतेय, तितक्याच त्या उफाळून वर येत आहेत.

तिचे मन, अमित भेटावा न भेटावा या द्वंद्वात भरडले गेले होते. त्यामुळे घरी परतताना आज तिची चाल आपसूक मंदावली होती.

.
.
.


या भागात आपण पाहिले की ऑफिस सुटल्यावर तन्वीची नजर नकळत अमितचा शोध घेत होती. आता पाहूया पुढच्या भागात काय घडते ते? ......


©® विद्या थोरात काळे “विजू”