ती अनपेक्षित वळणावर आयुष्याच्या ( भाग - १०)

She Meets Her First Love After Thirteen Years Of Her Marriage
( मागच्या भागात आपण पाहिले की तन्वी  अमितच्या विचारात पूर्णपणे गुंतली होती.  आता पाहूया पुढे ... या भागात .... )

सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली अन् कामाला लागली.  आज नचिकेत उशिरा ऑफिसला जाणार होता.  त्यामुळे तो सकाळचे आठ वाजले तरी झोपून होता.

तिने त्याच्यासाठी नाष्टा झाकून आणि डबा भरून टेबलवर ठेवला.  साडेआठ वाजता ती तयारी करून ऑफिसला निघाली.  

रात्री जागरण झाल्यामुळे, ऑफिसमध्ये दिवसभर तिचे डोळे चुरचुर करत होते.  तिचा चेहरा अगदीच ओढल्यासारखा वाटत होता.  परंतु ती सराईतपणे फाईल्समध्ये डोके खुपसून समोरचे काम उरकत होती.

लंच टाईम झाला तसे तिची नुकतीच मैत्री झालेली मैत्रीण, नेहा तिला बोलवायला आली होती.  परंतु भूक नाही सांगत, थोडावेळ टेबलवर डोके ठेवून एक डुलकी काढते सांगून, तिने तिला परत पाठवले होते. 

परंतु लंच टाइम संपला तरी ती उठली नव्हती.  तेव्हा मात्र तिच्या बाजूच्या कलिगने तिला उठवून, लंच टाइम संपल्याची जाणीव करून दिली.  या प्रकाराने ती पुरती ओशाळली होती.  म्हणूनच तिने अमित या प्रकरणाला डोक्यातून पूर्णत: बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता.

तिने निर्णय घेतला जरी असला तरी, तो अमलात आणायला तिला जमेलच असे नव्हते.

आठ दहा दिवस निघून गेले.  अमितची हवा थोडीफार कमी झाली होती.  कधीतरी चाळा म्हणून त्याचा मेसेज आला की नाही पाहण्यापुरता तो मनात डोकावत होता तेवढाच.  नचिकेत त्याच्या ऑफिसच्या कामात पूर्ण बिझी होता.  त्याला तन्वीकडे लक्ष द्यायला वेळही नव्हता अन् इच्छाही नव्हती. 

तन्वी आता ऑफसमध्ये बऱ्यापैकी रुळली होती.  चार मैत्रिणीही गाठीशी जमा झाल्या होत्या.  त्यामुळे ऑफिसमध्ये असताना तिचा दिवस बरा जायचा.  परंतु घरी आली की तिला घर खायला उठायचे.  रात्रीच्या जेवणानंतर अमेयला फोन करतानाच काय ती तिची कळी खुलायची.

तरीही रात्री बेडवर डोळे मिटले की, त्या दिवशी पाठवलेला गुड मॉर्निंगचा मेसेज अजून त्याला पोहचला नसल्याचे आठवायचे आणि ती अस्वस्थ व्हायची. 

अलीकडे नचिकेतच्या ऑफिस टूर तशा वाढलेल्या होत्या.  दोन दिवस मुंबईत काढले की तिसऱ्या नाहीतर चौथ्या दिवशी त्याची मुंबईच्या बाहेर टूर ठरलेली असायची.

आजही तो तीन दिवसाच्या टूरवर नाशिकला गेला होता.  टूर नंतर शनिवार रविवार तो आपल्या नाशिकच्या घरी जाणार होता.  आपल्या आईवडील आणि मुलाला भेटणार होता.  त्याच्या अनुपस्थित, तन्वीची आई तन्वीला सोबत करणार होती. 

नचिकेत आज घरी नसणार या जाणिवेने ती निर्धास्त होती.  ऑफिस सुटल्यावर, भाजी घेताना तिला अमितची आठवण आली.  भाजी घेऊन झाल्यावर नकळत तिची नजर त्याला शोधू लागली होती. 

मागच्या वेळी भेटला तसा तरी तो भेटावा असे तिच्या मनात सारखे येत होते.  पुन्हा ती त्याच्या विचारात गढून गेली.

' नक्की पुन्हा तो कोणत्या संकटात अडकला नसावा न?  की त्याला मी पुन्हा भेटू नये किंवा फोन करू नये म्हणून त्याने मला ब्लॉक केले असावे? 

ज्या दिवशी मी भेटले होते त्यादिवशी तो फोनवर व्यवस्थित बोलला होता.  मी त्याला फोन केला म्हणून रागावलाही नव्हता.  पण त्याच रात्री त्याने मला ब्लॉक केले असावे.  

मला त्याच्यापासून दूर करायला तोच ऑप्शन मी त्याच्यासाठी ठेवला होता.  फोन करणार नाही असे त्याला सांगूनही मला त्याला फोन करण्याचा मोह आवरला नव्हता.  त्याचीच शिक्षा मी आता भोगते आहे.  तसे असेल तरी ठिक आहे पण तो सुखरूप असावा.'

आज डोक्यात चाललेल्या विचारामुळे म्हणा की तो पुन्हा भेटेल या आशेने म्हणा तिची पावले रस्त्यावर रेंगाळत चालली होती.

परंतु तिचे नशीब आज जोरावर होते. तिला साथ देणारे होते. अगदी अचानकच तो तिच्या पुढ्यात आला.  दोघांची नजरानजर झाली.  काही वेळ शांततेत गेला.

"कशी आहेस?"  ती समोर आलीच आहे आणि तिला टाळता येणार नाही म्हणून त्याने नाईलाजाने विचारले.

तिच्या ते लक्षात आले.

" कशी असली तरी तुला काय फरक पडतो?" ती थोड्या रागातच त्याला म्हणाली.

" अशी का बोलतेस?  तू नेहमी सुखी आणि आनंदी असावे असेच मला वाटते."

"म्हणून मला टाळत आहेस का?  अन् तुला काय माहित माझे सुख कशात आहे ते?"

"मला न भेटण्यातच तुझे सुख आहे एवढे मला कळते."

"हे तू का ठरवतोस?  अन् एवढेच होते तर, का मला पुन्हा भेटलास अन् माझे सुख चैन हिरावून गेलास?  का मी भेटण्याची वाट पाहत राहिलास?  दिवस रात्र मोजत राहिलास?"  ती त्याला आवेशाने बोलत होती. 

कोणत्याही क्षणी तिच्या डोळयातून धारा वाहू लागतील असे तिच्याकडे पाहून वाटत होते.

" रेखा आपण रस्त्यावर आहोत.   किती मोठ्याने बोलते आहेस?  आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहत आहेत.  जरा हळू बोल.  तुलाच त्याचा त्रास होईल."  तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला.

" होऊ दे झाला तर.  तुला काय त्याचे?  आज नाही बोलवणार का घरी? 

कशाला बोलावशील तू आता मला?

तुझे काम झाले न.  तुला जे सांगायचे होते ते सांगितलेस मला.  तुला शांत झोप लागत असेल न आता. 

माझी काय अवस्था झाली याचे तुला सोयरसुतक तेव्हाही नव्हते अन् आताही नाही.  शेवटी इथून तिथे सर्व पुरुष सारखेच.  स्वार्थी ...  फक्त स्वत:चाच विचार करणारे.  दुसऱ्याच्या मताला किंमत न देणारे. "

तन्वी भर रस्त्यात त्याला सुनावत होती.  आज तिला तिच्याकडे कोण पाहते, कोण नाही याची काही तमा नव्हती.  तिचा डोळ्यात अंगार फुलला होता.  अंग थरथरत होते.  तिची झालेली धुसपुस बाहेर पडत होती.

शेवटी नाईलाजाने तो तिला घरी जाऊन आपण बोलूया." म्हणाला.

.
.
.

(अमितवर रागावलेली तन्वी जाईल का त्याच्या घरी?  पाहूया पुढच्या भागात)

©® विद्या थोरात काळे "विजू"

==============================

क्रमशः




 


🎭 Series Post

View all