( मागच्या भागात आपण पाहिले की अमित, तन्वीला तो न भेटण्याचे कारण सांगतो .... आता पाहूया पुढे ... )
त्याचा तो तुटलेला पाय पाहून तन्वीच्या डोळ्यातून आपसूक अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. तिला काय बोलावे तेही सुचत नव्हते.
त्याच्याविषयी वाटत असलेली शंका खरी ठरली होती. तो कोणत्या प्रसंगातून जात होता याची तिला जाणीव झाली होती. त्या जाणिवेने तिच्या ह्रदयाला पिळ बसला होता.
इतक्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात कायम दुःखच का यावे? याचे कारण तिला कळत नव्हते. त्याला जाऊन एक घट्ट मिठी मारावी तिच्या मनात आले. पण तिच्याकडून काहीच कृती झाली नाही.
काही क्षणानंतर ती उठली. तिची पावले दरवाज्याकडे वळली. पण तिचे जड झालेले अंतकरण, तिला पाऊल बाहेर टाकायला साथ देत नव्हते.
ती काही क्षण तिथेच घुटमळली अन् मागे वळली. त्याच्या जवळ आली. दोघांच्या डोळ्यांची नजरानजर झाली आणि दुसऱ्याच क्षणाला ती त्याच्या बाहुत विसावली.
कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या पुरात मोकळी वाट करून दिली होती.
भिंतीवरच्या घड्याळाने सात वेळा घणघणाट केला तसे दोघे भानावर आले. एकमेकांपासून वेगळे झाले.
" एक सांगू? " डोळ्यांतल्या अश्रूसोबत नाकात आलेले पाणी वर खेचत ती म्हणाली.
"हुं" त्याचाही आवाज अश्रूंनी घोगरा झाला होता.
" तू मला फसवले असे कधीही माझ्या मनात आले नाही. पण तुझ्या बाबतीत नक्की काय झाले असावे? तू का नाही आलास? हा प्रश्न कायम मला सतावत होता. तुझी काळजी वाटत होती.
कॉलेज संपेपर्यंत माझी नजर कायम तुलाच शोधत होती. शेवटच्या दिवशीही तू आला नाहीस तेव्हा मात्र पुन्हा कधी भेटशील याची आशाच सोडून दिली." गालावर आलेले ओघळ पुसत ती म्हणाली.
"माझी कोणी किव करावी किंवा कोणी मला बिचारा समजावे असे मला वाटत नव्हते. कॉलेजमध्ये माझी जशी इमेज होती, तशीच रहावी असे वाटत होते, किंबहुना माझ्या इमेजला तडा गेला तर? .... ही भीती माझ्या मनात येत होती.
सहा महिन्यानंतर मी बऱ्यापैकी बरा झालो होतो. परंतु अशा पांगळ्या अवस्थेत कॉलेजमध्ये यायची मला हिम्मत होत नव्हती."
"आता तू ठिक आहेस न? ... "
"हो. शरिरावरच्या जखमा केव्हाच बऱ्या झाल्या होत्या पण मनावर झालेली जखम अजूनपर्यंत भळभळत होती. तू भेटलीस. ती जखम सुद्धा आता खपली धरू लागेल."
" तू इथे एकटा? "
"हो. मी एका सरकारी ऑफिसमध्ये कामाला आहे. माझे ऑफिस चर्चगेटला आहे.
" तुला घरी जायला उशीर तर होत नाही न? तुझा नवरा?.." त्याने मध्येच वेळेचं भान राखत विचारले.
"माझा नवरा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे. त्यामुळे थोडी निर्धास्त ... कदाचित आज आपल्याला भेटता यावे म्हणूनच नियतीने तशी योजना केली असेल .."
"तू सुखी आहेस न त्याच्यासोबत? "
"हो. मी सुखी आहे पण तुझे काय? अन् तुझे बाबा?"
" बाबांना जाऊन दहा वर्षे झाली ... बहिणीचे लग्न झाले ... ती तिच्या संसारात सुखी आहे. अंबरनाथचे घर विकले अन् त्या पैशात इथे हे वन बी एच के घर घेतले."
"तू .. लग्न? ..." तिने अडखळतच विचारले.
"मी लग्न केलेच नाही. ... खरंतर तू माझ्या मनात भरली होती. माझे मनापासून तुझ्यावर प्रेम होते म्हणजे अजूनही आहे. परंतु माझी घरची परिस्थिती तुला समजल्यानंतर तू मला होकार देशील की नाही याबद्दल कायम साशंक होतो. पण तुला भेटल्याशिवाय चैन पडत नव्हते. असे असले तरी आपल्या भेटीत मी कधीही मर्यादा ओलांडली नव्हती.
आपण कधीतरी थोड्या वेळासाठी भेटत होतो. एकमेकांसोबत वेळ घालवत होतो. आपले एकमेकांविषयीचे प्रेम आपल्या डोळ्यातून व्यक्त होत होते. ते शब्दांत व्यक्त करण्याची आपल्याला कधी गरज भासली नव्हती. खूप सुंदर दिवस होते ते. त्याच दिवसांच्या आठवणींवर मी जगतो आहे.
बहिणीने माझ्या लग्नासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यावेळी हा आर्टिफिशियल फूट नव्हता. त्यामुळे नोकरी चांगली असूनही, तिच्या प्रयत्नांना फारसे यश येत नव्हते.
कोणती धडधाकट मुलगी माझ्याशी लग्न करण्याच्या प्रश्नच येत नव्हता. अंपग मुलीशी किंवा इतर कोणत्याही मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती."
इतके दिवस मनात साचलेले, तिच्याजवळ तो मोकळे करत होता.
" मग आता तुझे जेवण वैगरे? . ..." तिने स्त्रीसुलभ प्रश्न केला.
" सद्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा हॉटेलचे... घरकाम करणाऱ्या बाई त्यांच्या घरून डबा घेऊन येतात. गेल्या आठ दहा दिवसांपासून त्या रजेवर आहेत. त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी त्या घरी राहिल्या आहेत. पुढचे दीडदोन महिने तरी त्या येणार नाहीत."
पुढचा अर्धा एक तास त्यांचे बोलणे असेच चालू होते. एकमेकांशी बोलून त्याचे मन अगदी हलके झाले होते. गेल्या चौदा वर्षात हृदयाच्या कोपऱ्यात दबून गेलेल्या शंकाचे आज निरसन झाले होते.
शेवटी नियतीच्या पुढे आपल्याला जाता येत नाही ही वस्तुस्थिती दोघांनी मान्य करतं, ती त्याचा निरोप घेऊन घरी आली होती.
.
.
.
.
.
( या भागात आपण पाहिले की तन्वीला अमित न भेटण्याचे कारण कळले .... आता पाहूया पुढच्या भागात काय होते ते .... )
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा