( मागच्या भागात आपण पाहिले की तन्वी घरी आल्यानंतर नचिकेत घरी नाही पाहून अमितशी निर्धास्तपणे फोनवर गप्पा मारत होती. आता पुढे .... )
अमितला जेवायला बाहेर जायचे असल्यामुळे तन्वीने नाईलाजाने फोन ठेवला तेव्हा, तिला कडकडून भूक लागल्याचे जाणवले. तिने तिच्यासाठी झटपट होणारी डाळभाताची खिचडी बनवली. जेवून ती सर्व आवरून झोपायला गेली.
तेवढ्यात तिच्या सासूबाईंचा फोन आला. तिने तो घाईघाईतच उचलला. तिच्या लक्षात आले आज ती त्यांना फोन करायला विसरली होती. रोज ती अमेय झोपण्यापूर्वी त्याच्याशी न चुकता फोनवर बोलायची.
ती त्या दोघांशी बोलून बेडवर आडवी झाली.
आज अमितच्या नादात, अमेयला फोन करण्याची वेळ टळून गेली तरी तिच्या लक्षात आले नव्हते. याचे तिला खूप वाईट वाटले.
' मी खरचं वेडी झाली का? आज नचिकेत घरी असता तर, मी माझ्या भावना कशी लपवू शकले असते? तो आज नाही. उद्या तर असणारच आहे. उद्या काय रोजच असणार आहे.
मला माझ्या भावनांना आवर घालायला हवा. माझे लग्न झाले आहे. मला एक मुलगा आहे याचा विसर मला पडायला नको आहे. मला अमितला विसरायला हवे.' ती पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाला बजावत होती.
' अमितचे माझ्या आयुष्यात पुन्हा येणे कितीही सुखावह असेल तरी, मी त्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही. ही वस्तूस्थिती मला स्वीकारायला हवी. अमितचा विचार डोक्यातून काढायला हवा. नाहीतर पुढे जाऊन मला खूप मानसिक त्रास होईल. त्याचा संपूर्ण घरादारावर परिणाम होईल.
नचिकेत माझा नवरा असताना, आज मी अमितच्या बाहुपाशात विसावले होते. मी फार चुकीचे वागले होते. मी माझ्या भावनांवर आवर घालायला हवा होता. त्याक्षणी मी वाहून जायला नको होते. जर अमित काही चुकीचा वागला असता तर? ... त्याने त्याच्या भावनांचा अतिरेक केला असता तर?... ' विचार करूनच तिच्या अंगावर शहारा आला होता.
'पण या मनाला कसा आवर घालणार होते मी? इतक्या वर्षांनी तो माझ्यासमोर आला होता. त्याची दयनीय अवस्था मला समजली होती. हृदयाला पाझर फुटलाच होता. कितीही मनाला आवर घातला तरी, शेवटी त्याचा कडेलोट झाला होता. भावनेच्या ओघात मी त्याच्याकडे ओढली गेलीच.
मन कसे विचित्र आहे? भावनांचा उद्रेक व्हायला नको असे त्याला कळते पण वळत नाही. असलेल्या परस्थितीचे भान ठेवायला त्याला जमत नाही. आज नेमका नचिकेत घरी नाही. हे त्याने ओळखले अन् समोर आलेली संधी त्याने शरीराकडून साधून घेतली.
मला अमीतला भेटता आले. त्याला जाणता आले. नचिकेत आज घरी असता तर मी त्याला भेटू शकले असते का?
भेटले मी त्याला. काय चुकीचे केले मी? कितीही झाले तरी अमित माझे पहिले प्रेम आहे. माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत मी हे विसरू शकणार नाही. नियती आम्हाला एक करू शकली नाही. यात आमचा काय दोष आहे? दोष असेल तर तो नियतीचाच आहे.
काही काळाकरीता मला अमितचा विसर पडला होता. मी प्रामाणिकपणे नचिकेतला साथ दिली. पत्नी धर्माचे पालन केले. आता अमित माझ्या आयुष्यात पुन्हा आला आहे. त्याला टाळून मला कसे चालेल? तो एकटा आहे. त्याला माझ्या साथीची गरज आहे. माझ्या प्रेमाची गरज आहे.
एकदा कर्तव्याची वाट धरली की भावनांना विसरायचंच असतं तन्वी? तुला विसर पडला आहे का तुला एक मुलगाही आहे? उद्या तुझ्या प्रेमाविषयी नचिकेतला कळले तर होणाऱ्या परिणामांचा विचार केला आहेस का तू?
तुझी सर्व समाजात छी थू होईल. तुझ्या आई वडील भावाला तुझ्या वागण्याचा जबरदस्त धक्का बसेल. तुझ्या सासरी तुझी नाचक्की होईल.
पण मी त्यांना धक्का बसण्यासारखे काय केले आहे? मी त्याला फक्त भेटले. त्याला मी मिठी मारली परंतु ती भावनेच्या भरात. त्यात कोणती वासना नव्हती. ती मारताना मनात कोणते पाप नव्हते.
नसेलही पाप. ते तुला माहित. पण यामुळे तू त्याच्याकडे ओढली गेली आहेस. तू सतत त्याचाच विचार करत आहेस. तू तुझ्या पोटच्या मुलालाही आज विसरलीस.
हो. चुकलेच माझे. मी जरा जास्तच वाहत गेले. यापुढे ही चूक मी नाही करणार. मी त्याला यापुढे कधीच नाही भेटणार.
पण एक मित्र म्हणून त्याला मी भेटले तर काय हरकत आहे? मित्राच्या भावना समजून घेणं आणि त्याला साथ देणं माझे कर्तव्य नाही का?
तू त्याला मित्र म्हणून पाहू शकणार आहेस का? त्याची अन् तुझी निखळ मैत्री होऊ शकेल का? तू तुझा पाहिला प्रियकर म्हणूनच त्याला पाहशील.
मी त्याला मित्र म्हणूनच पाहिलं. मला माझी जबाबदारी कळते. ती मी नाकारत नाही. पण तो एकटा आहे. त्याला माझी गरज आहे. अशा वेळी मी त्याला साथ न देणे हेही चूकच आहे.
आधीच त्याच्या आयुष्यात सुखाचा वाणवा आहे. असे असताना त्याच्यापासून मी तटस्थ कशी राहू शकते? हा त्याच्यावरच्या माझ्या प्रेमाचा अपमान होईल .....
तन्वी काय चूक आणि काय बरोबर या विचाराच्या वादळात अडकली होती. उलटसुलट विचार करून ती थकली होती. विचार करता करताच तिला पहाटे कधीतरी झोप लागली होती.
रात्री लावलेला उशीराचा म्हणजे सातचा गजर वाजला तशी ती उठली. नेहमीप्रमाणे तयारी करून ती आठला ऑफिसला निघाली. आज ती एकटी असल्यामुळे तिने डब्याला सुट्टी दिली होती.
तिने रिक्षात बसल्या बसल्या मोबाईलवर त्याचा काही मेसेज आला का पाहीला. त्याच्याकडून साधा गुड मॉर्निंगचा सुद्धा मेसेज न आल्यामुळे ती हिरमुसली.
तिने त्याला गुड मोर्निग मेसेज करून मोबाईल वर त्याची डबल टिकची वाट पाहू लागली. ती ऑफिसच्या दारात पोहचली तरी मेसेजवर डबल टिकची निशाणी येत नव्हती.
.
.
.
.
.
( या भागात आपण पाहिले की तन्वी अजूनही ती अमितच्या उलटसुलट विचारात गढून गेली आहे. आता पाहूया पुढच्या भागात ... )
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा