(मागच्या भागात आपण पाहिले की अमित, तन्वीला तिच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आहे .... आता पाहूया या भागात ...)
" तरीही मला ते मान्य नाही. विषाची परीक्षा मला घ्यायची नाही. आपण जर नेहमी एकमेकांशी फोनवर बोलत राहिलो तर, आपल्याला भेटण्याची इच्छा होणार नाही कशावरून? आणि एकदा भेटल्यानंतर, आपल्या भेटी वाढणार नाही, आपल्यात जवळीक होणार नाही हेही ठामपणे सांगता येत नाही.
आपल्यात निखळ मैत्री होणे केवळ अशक्य आहे हेच सत्य आहे. हे तुला मान्य करायलाच हवे.
याचा शेवट काय असेल याची माझ्या इतकी दुसऱ्या कोणाला कल्पना नसेल. मला पुन्हा एक अमित होऊ द्यायचा नाही."
" म्हणजे? "
" तू मला एकदा भेटून, इतकी अस्वस्थ झाली आहेस. तर नेहमी भेटत राहिलीस अन् एखाद्या क्षणी तुला मला भेटता नाही आले तर, तुझी काय अवस्था होईल याचा तू विचारच केला नाहीस.
तू पूर्ण माझ्यात गुंतून जाशील अन् मी तुझ्यात. अन् मग आपल्याला कायमस्वरुपी एकत्र येण्याची गरज भासेल." त्याने पुन्हा पुन्हा तिला उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या शक्यतेची जाणीव करून दिली.
" तू म्हणतो तसेच होईल कशावरून? मी माझा संसार सांभाळून तुझ्याशी मैत्री करू शकते."
" ते केवळ कल्पनेत शक्य आहे. कल्पना सुंदर असते पण वास्तव नाही. शिवाय ते तुला शक्य होईल. मला जमेलच असे नाही.
मी जर आपल्या मैत्रीत तुला म्हंटले, आज तू मला हवी आहेस. आजची रात्र तू माझ्या सोबत घालव. जमेल तुला?"
त्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती निरुत्तर झाली.
" नाही जमणार न? " त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा प्रश्न केला.
" मी तेवढा विचार केला नाही." ती नजर चोरत म्हणाली.
" करूही नकोस. तुला चांगलेच माहित आहे. माझ्या आईचे आणि तिच्या सध्याच्या नवऱ्याची, त्यांच्या लग्नाच्या आधी केवळ मैत्री होती. ती दोघे कधी एकत्र येतील याची पुसटशीही शंका त्या दोघांना नव्हती. तरी ती दोघे एकत्र आली होती.
सुखवस्तू घर, नवरा आणि दोन लहान मुले पदरात असताना, माझी आई आम्ही शाळकरी असताना, आम्हाला सोडून तिने तिच्या मित्राशी पळून जाऊन लग्न केले. त्याचा परिणाम आमच्या संपूर्ण घरादारावर झाला.
बाबा पूर्णपणे दारूच्या आहारी गेले. मुलाची अवस्था बघून आजीने धसका घेतला अन् त्यातच ती गेली. बाबांचेही काही वेगळे झाले नाही. दारूच्या व्यसणापायीच त्यांचे निधन झाले.
आई बाबा दोघे जिंवत असताना, आम्ही त्यांच्या प्रेमाला कायमच मुकलो. नातेवाईक शेजारी पाजारी यांच्या चर्चेचा विषय झालो. तसे तुला तुझ्या अमेयबद्दल व्हावे असे वाटते का? "
"तसेच काही होईल, असे गृहीत कसे धरतोस तू?"
"असे काही घडणार नाही असेही सांगता येत नाही न?"
" रेखा, तुझे कुटुंब छान आहे. त्याचा सन्मान कर. तू तुझ्या नवऱ्याला मनापासून प्रेम दे. तोही तुझी कदर करायला लागेल.
रेखा, असे मनात आले म्हणून सुसाट वादळवाऱ्यासारखं राहून चालत नाही. तुझ्या जबाबदाऱ्या, मर्यादा ओळख. त्याला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न कर.
कदाचित तुझे निःस्वार्थी प्रेम बघून नचिकेतही बदलेल अन् पूर्वीसारखा तुझ्यावर प्रेम करू लागेल. अन् आपोआप तुमच्यातली दरी कमी होईल.
तू जर चुकीची वागलीस तर तुझ्या मुलाचे भवितव्य काय असेल याचा विचार तू कर. तुला माझ्या व्यथा माहीत होत्या. म्हणून तरी तू स्वतःला सावरले पाहिजेस. तुझ्या अमेयसाठी." त्याने तिला अगदीच भावनिक साद घातली.
घड्याळात साडे आठचा ठोका वाजला तसा तिच्या काळजाचा ठोका चुकतो की काय वाटले.
तिला तिची आई घरी वाट पाहत असेल याची जाणीव झाली. एरवी ती साडेसात -पावणे आठलाच घरी पोहचलेली असते.
तिला तिची आई घरी वाट पाहत असेल याची जाणीव झाली. एरवी ती साडेसात -पावणे आठलाच घरी पोहचलेली असते.
ती पर्स उचलून निघणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला. तिने पर्समधून घाईघाईने तो बाहेर काढला.
सासू बाईंचा फोन होता. " अमेयचा वर्गात पहिला नंबर आला हे सांगण्यासाठी केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघत आहे. आईचा फोन आल्याशिवाय जेवणार नाही असा हट्ट करून बसला आहे.
आता मी तुला, त्याच्या नकळत फोन केला आहे. मी आतमध्ये गेल्यावर तू लगेच फोन कर म्हणजे त्याची कळी खुलेल. "
ती अमितचा निरोप न घेता बाहेर पडली होती.
अमेयशी बोलताना, तिच्याही नकळत तिच्या गालावर अश्रू ओघळले होते.
.
.
.
.
.
.
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा