Login

ती अनपेक्षित वळणावर आयुष्याच्या (भाग -११)

She Meets Her First Love After Thirteen Years Of Her Marriage

( मागच्या भागात आपण पाहिले की तन्वी आणि अमित समोरासमोर येतात आणि तो तिला घरी घेऊन येतो.  आता पुढे . ....

तन्वीने न ठरवता, तिचा डाव यशस्वी झाला होता.  त्याने घरी बोलवावे अन् त्याच्याशी निवांत बोलता यावे हेच तर तिला हवे होते.  फारसे आढेवेढे न घेता ती त्याच्या सोबत घरी आली होती.

आज तिच्यात अचानक कुठून एवढे बळ आले होते, तिचे तिलाच कळत नव्हते.  पण तो तिला पुन्हा भेटला आणि एकांतात त्याच्याशी बोलायला मिळणार या जाणिवेने ती मोहरुन गेली होती.  त्याच जाणिवेने तिचा त्याच्यावरचा राग आपसूक गळून पडला होता. 

तिच्या वागण्यात झालेल्या बदलाला कुठेतरी नचिकेतही जबाबदार होता.  अलीकडे तो सुट्टीच्या दिवशीही घरी नसायचा.  ऑफिसच्या कामाचे निम्मित काढून तो सतत बाहेरच रहायचा.  घरी असला तरी फोनमध्ये बिझी असायचा.  तिच्याशी त्याचे बोलणे म्हणजे अगदी कामापुरते असायचे.

मुंबईत रहायला आल्यानंतर, दोन एक महिन्यात, त्याचे वागणे कमालीचे बदलले होते.  स्वतःच्या राहणीमानाकडे तो जाणीवपूर्वक लक्ष देत होता.  गेल्या चार महिन्यात त्याने कपड्यांचे पाच सहा नवीन जोड खरेदी केले होते.  सँडलची जागा लेदर शूजने घेतली होती.  रोजच्या रोज गुळगुळीत दाढी होत होती.  आरशासमोरचा त्याचा वेळ बऱ्यापैकी वाढला होता. 

ऑफिसमध्ये जाताना अंगावर फसाफस डिओचा स्प्रे मारल्याशिवाय त्याचा पाय घराबाहेर निघत नव्हता.

तिने एकदा त्याबद्दल त्याला छेडलेही होते.  परंतु मुंबईत, मुंबईतल्या लोकांसारखे राहीले नाहीतर, गावंढळ म्हणून लोक मागे नावे ठेवतात आणि हसत राहतात. असे कारण त्याने सांगितले होते.  तिलाही ते पटले होते.

घरी आल्यानंतर, रात्री जेवून फार वेळ न दवडता तो झोपी जात होता.  तिच्याशी तो अगदी जेमतेम कामापुरता बोलायचा म्हणजे मुलाची, त्याच्या अभ्यासाची चौकशी करायचा.

तिला खूपदा वाटायचे, त्याने तिचा दिवस कसा गेला विचारावा.  तिने तो सांगावा.  त्यानेही त्याच्या ऑफिसच्या गमतीजमती, कुरबुरी सांगाव्यात.  पण यातले कधीच काही घडायचे नाही. 

त्याच्या आयुष्यातील तिचे अस्तित्व नगण्य झाल्यात जमा होते.  तिला मानसिक शारीरिक काही गरजा आहेत हे तर त्याच्या गावीही नव्हते.

त्यातूनच तिला आलेले एकटेपण आणि ध्यानीमनी नसताना पाहिलेवाहिले प्रेम पुन्हा  समोर आलेले पाहून, नकळत तिने तिलाच घातलेली लग्न संस्काराची बंधने गळून पडली होती.

" तू अशी का वेड्यासारखी वागते आहेस? ". घरात पाऊल टाकताच अमितने तिला हताश होऊन विचारले.

" वेड्यासारखी म्हणजे नक्की कशी सांगशील मला? " तिने हाताची घडी घालत त्यालाच ठामपणे प्रश्न केला.

" अग तुझे लग्न झाले आहे.  तुला एक मुलगा आहे.  हे कसे विसरतेस तू?  भर रस्त्यात कशी माझ्याशी भांडत होतीस? सगळे लोक आपल्याकडे पाहताहेत याचे सुद्धा तुला भान नव्हते.

तुला सांगितले होते मी, फोन करत जाऊ नकोस तरी तू केलास.  तुला कळत कसे नाही?  एकदा तू या मोहात अडकलीस तर, तुला मागे फिरणे जड जाईल.  म्हणून तुझा फोन झाल्यावर मी तुला ब्लॉकही केले.

" हा विचार तू मला पहिल्यांदा भेटला होतास, त्याच्या आधी करायला हवा होतास."

" त्यावेळी आपण ठरवून भेटलो नव्हतो.  भेटलो म्हणून तुझ्या मनातील माझ्या विषयीचा गैरसमज तरी दूर झाला."

" त्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.  पण आता फोनवर न बोलण्यात काय चुकीचे आहे?  मला तरी कळत नाही.

मला तुझ्याशी खूप बोलावेसे वाटत असताना, तू मला ब्लॉक करून टाकलेस.  मला काय वाटेल?  इतक्या दिवसांत माझी काय अवस्था झाली असेल, याचा तुला जराही विचार करावासा वाटला नाही?" तिने चिडून विचारले.

" रेखा, तू समजून घे न मला.  माझ्यामुळे तुझा संसार मोडायला नकोय.  आधीच माझे आयुष्य फार चांगले नाही.  त्यात मला तुझे आयुष्य खराब करायचे नाही.   तूच सांगितले होतेस, तुझ्या नवऱ्याला परपुरूषाशी बोललेले आवडत नाही.

आपण आपल्याला एकदा बोलण्याची सुट घेतली की त्याचा मोह वाढतच राहणार.  आपले वरचेवर फोनवर बोलणे त्याला संशय घायला भाग पाडेल. 

एकदा का त्याच्या मनात संशय बळावला की, त्याच्या प्रेम आणि विश्वासाला तू पारखी होशील. अन् नेमके तेच तुझ्या बाबतीत झालेलं मला नकोय.

" तू त्याच्या बाबतीत विचार करतो आहेस. अरे पण माझ्या भावनांचे काय? माझाही विचार करून बघ जरा."
       
" मन आहे तर भावनाही असणार ... मग अपेक्षाही ओघाने आल्याचं अन् त्यात गुंतणंही.   हे वास्तव टाळण्यासाठीच माझा हा खटाटोप चालला होता." त्याने तिला समजवायचा प्रयत्न केला.

" पण वास्तवाचं भान ठेवून प्रत्येक वेळी वागणं साध्य होईलच असे नाही न?  अन् ते भान न बाळगून सुख मिळत असेल तर, त्याचा आस्वाद घेण्यात चूक काय?"  तिने त्याला प्रश्न विचारून कोड्यात टाकले.

" रेखा, तुला याचे गांभीर्य कळत असूनही तू अशी का वागतेस मला समजत नाही." त्याने हतबल होत तिला विचारले.

" कारण आता तुझ्यापासून दूर जाणे मला शक्य नाही.  तू असा माझ्या जवळपास असूनही तुझ्या संपर्कात न राहणे, याचा माझ्या मनाला खूप त्रास होतोय."  तिने तिचे मत स्पष्टपणे मांडले.

" त्रास करून घेतलास तर, आयुष्यात कशाचाही त्रास होईल रेखा.  नाही करून घेतलास तर, नाही होणार.  हा सर्व तुझ्या मनाचा खेळ आहे.  प्लीज मला तू विसरून जा.  नचिकेत तुझा नवरा आहे.  त्याच्यासोबत तू सुखाने रहा."

" मी तुला माझ्याशी लग्न कर म्हणत नाही की, मी माझ्या नवऱ्याला सोडणार आहे असेही म्हंटले नाही." ती तिचा मुद्दा स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात म्हणाली.

.
.
.

( तन्वी, अमितपासून दूर जाईल का पाहूया पुढच्या भागात ...)


©® विद्या थोरात काळे "विजू"