( मागच्या भागात आपण पाहिले की तन्वी, अमित एकमेकांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात ... आता पुढे ... )
नचिकेत घरी नसल्यामुळे तन्वी, अमितच्या विचारात पूर्ण बुडाली होती.
त्याला भेटून आल्यापासून ती वेगळ्याच विश्वात वावरत होती. तिला तो इतक्या वर्षांनी भेटल्याचा आनंद, अजूनही त्याचे तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव, त्याच्या परिस्थितीचे दुःख, तिचे त्याच्या मिठीत विसावल्याचे आश्चर्य, परपुरुषाच्या मिठीत गेल्याचा अपराधीपणा, नचिकेतला समजले तर वाटणारी भीती, अमितचा निरोप घेताना झालेल्या यातना, पुन्हा भेटण्याची ओढ, अशा असंख्य भावनांचे काहूर तिच्या मनात माजले होते.
तरीही तो भेटला. तो जिवंत आहे. त्याच्या मिठीत ती विसावली. मनातले सगळे मळभ दूर झाल्याने ती सुखावली होती. त्याला पुन्हा भेटण्याची उर्मी तिच्या मनात दाटून येत होती.
तिला आठवले त्याने, त्याचा फोन नंबर दिलेला होता. तिने त्याला फोन लावण्यासाठी मोबाईल हातात घ्यायला अन् नचिकेतचा फोन यायला एकच वेळ झाली.
ती भानावर आली. तिने त्याचा फोन घेतला. पुनः उद्या मीटिंग असल्याकारणाने आज तो येणार नसल्याचे सांगताना, दरवाजा नीट बंद करून घे अशी सूचना देऊन त्याने फोन बंद केला होता.
तिने एक सुस्कारा सोडला. आज नचिकेत घरात नाही हे तिच्या पथ्यावर पडणार होते. नाहीतर तिच्या मनाची झालेली चलबिचल तिला लपवणे कठीण झाले असते.
अमितला फोन करावा की नाही या विचारात तिने त्याला घरी पोहचल्याचा मेसेज केला.
त्यानेही त्यावर अंगठ्याची स्मायली टाकून ठिक आहे उत्तर दिले.
ती अजून काही त्याचा मेसेज येतो का म्हणून वेड्यासारखी वाट पहात राहिली. त्याचा मेसेज काही आला नाही.
शेवटी न राहवून तिनेच त्याला मेसेज केला.
"तुला भेटून आज मी खूप सुखावले."
" मी ही. माझ्या मनावरचे इतके दिवसाचे ओझे तुझ्या भेटीत उतरल्याचे जाणवले. आज मला शांत झोप लागेल."
"पण मला नाही झोप लागणार."
"का? नवरा येणार नाही का?"
" नाही. तो येणार नाहीच. एका दृष्टीने चांगलेच आहे ते. नाहीतर तुझ्या भेटीचा आनंद मला लपवणे कठीण झाले असते."
"ह्ममम ... खरचं तुला इतका आनंद झाला?
" हो. तुला शब्दात मला सांगता येणार नाही पण कित्येक वर्षांनी आज मी खूप आनंदात आहे."
" रेखा, तू तुझ्या संसारात नक्की खूष आहेस न?"
" तुला भेटेपर्यंत असेच वाटत होते. पण आता वाटते, ती मी माझ्या मनाची घातलेली समजूत होती."
" म्हणजे? तू खुश नाहीस? तो तुला कसला त्रास देतो का? "
"नाही रे ! तसा त्रास नाही देत. पण म्हणजे मी त्याच्या सोबत खूष आहे असे होत नाही न?"
"मला समजले नाही."
"तू भेटल्यापासून, मला असे वाटायला लागले तू माझ्या आयुष्यात असायला हवे होतेस."
"हमम् ... तशी परमेश्वराची इच्छा नव्हती असे समज.."
" मग आता तरी त्याने आपल्याला का भेटवले असेल?"
" तुझ्या माझ्या मनात काही आपल्याबाबत प्रश्न होते. त्याची उत्तर देण्यासाठी असेल कदाचित."
" मग आता उत्तरे मिळाली. याचा अर्थ आता तू मला पुन्हा भेटणार नाहीस का?"
" तसा मी विचार केला नाही. मला खूप आवडेल तुला भेटायला. पण तुला खूप त्याचा त्रास होईल. शेवटी तुझे लग्न झालेले आहे हे विसरून कसे चालेल?"
"अमित, खर सांगू तू काल भेटलास, तेव्हा मला तुझा खूप राग आला होता. किती प्यायला होतास तू?
त्यामुळे तू मला, त्यावेळी का भेटायला आला नव्हता, हे जाणून घेण्यासाठी तुला भेटावेसेही वाटत होते अन् उगीच तू असाच रोज पित असशील तर, तुला भेटू नये असेही वाटत होते."
" नाही ... नाही ... मी एवढा पित नाही. पण काल एकाची पार्टी होती .... त्यामुळे थोडी .... मी थोडीशी प्यायलो तरी खूप प्यायलासारखे वाटते. पण मी त्यामुळे तुला धडकलो नव्हतो. माझा उजवा पाय कधी कधी आखडतो ... त्यात मी रस्त्यावरचा खड्डा चुकवायला गेलो होतो. त्या गोंधळात मी अडखळलो होतो अन् नेमकी तू समोरून येत होतीस. त्यामुळे तुला धक्का लागला होता."
" बरे झाले तुझा धक्का लागला ते. नाहीतर बाजूने गेलेला सुद्धा मला कळले नसते."
" हो तेही खरचं ... पण त्यामुळे तुझ्या लेखी मी बेवडा ठरलो."
" सॉरी ... पण तू नेहमी घेत नाहीस न नक्की? म्हणजे आज तू घेतली नव्हतीस म्हणा."
" नाही ग! खरचं मी नेहमी नाही पित. रोज उठून मला ऑफिसला जायचे असते. हे विसरतेस का?"
" हम्म ... मलाही आश्चर्य वाटले होते तुला इतकी दारूबद्दल घृणा वाटत होती अन् तरीही तू ..."
नचिकेतचा फोन येऊन गेल्यामुळे तन्वी निर्धास्त झाली होती. दोघांचे बराच वेळ मोबाईलवर चाट सोडून सरळसरळ बोलणे सुरू झाले होते."
शेवटी त्यानेच तिला जेवायला बाहेर जायचे आहे सांगून बोलणे थांबवले होते. तिचाही नाईलाज झाला होता.
त्याला तिची काळजी होती. तिच्या आयुष्यात पुन्हा येऊन त्याला, तिला त्रास द्यायची इच्छा अजिबातच नव्हती. परंतु तिला त्याच्या न भेटण्याचे कारण कळावे असे मनापासून वाटत होते.
.
.
.
.
.
.
( या भागात आपण पाहिले की तन्वीच्या शंकेचे निरसन झाले. ती त्याच्या भेटीने सुखावली आहे. आता पाहूया पुढच्या भागात ...)
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा