( मागच्या भागात आपण पाहिले की तन्वीने पाठवलेला मेसेज अमितला पोहचला नव्हता ... आता पुढे .... )
दिवसभरात तिने शंभर वेळा तरी तिचा मोबाईल चेक केला होता. पण तिची सतत निराशाच होत होती. त्याला सकाळी केलेला गुड मॉर्निंगचा मेसेज त्याला पोहचलाच नव्हता. तिने त्याला फोनही बरेच वेळा करून झाला होता. पण तोही नॉट रीचेबल येत होता. ती पुन्हा काळजीत पडली.
कधी एकदा ऑफिस सुटते अन् त्याला भेटते असे तिला झाले होते.
नचिकेत नक्की किती वाजता येणार हे त्याने सांगितले नव्हते. त्यामुळे अमितला भेटावे की न भेटावे या द्विद्वामध्ये ती अडकली होती.
' नचिकेत घरी येईल अन् मी जर घरी उशिरा पोहचले तर, "मी घरात नाही पाहून कुठे भटकायला गेली होतीस?" असे काहीतरी विचारून तो मला पेचात पाडेल.' असा विचार मनात येताच तिने स्वतः ला अमितला भेटायला जाण्यापासून रोखले.
"माणसाला आयुष्यात हव्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या फक्त भीती आणि लाज या शब्दांच्या पलीकडे गेल्यावरच मिळतात." एका व्हॉट्स ॲप ग्रुपवर सकाळी वाचलेला मेसेज अचानक तिला आठवला. तो मेसेज तिने तसा घोकून मनावर बिंबवला सुद्धा होता.
' फार वेळ नाही लागणार. जवळचं आहे त्याचे घर. जाऊन बघितल्याशिवाय मन शांत होणार नाही.' दुसऱ्याच क्षणाला मनाने घुमजाव केले अन् ती त्याच्या बिल्डिंगपाशी जाऊन पोहचली.
बिल्डिंगच्या सिक्युरिटीने तिची चौकशी केली तसा, तिने त्याचा रूम नंबर सांगितला.
" साब अभीतक घरपे नहीं आये है! आप इस सोफेपे बैठ कर उनका इंताजार करो." त्याने लॉबी मध्ये असलेल्या सोफ्याकडे निर्देशून त्याच्या स्टाईलमध्ये तिला उत्तर दिले.
"वो कबतक आयेंगे?" न राहवून तिने विचारले.
"उनका कोई टाईम का ठिकाणा नहीं होता है! अकेली जान है ! कभी भी आते है!" हात हवेत उडवत त्याने उत्तर दिले.
क्षणभर ती तिथेच घुटमळली अन् निराश होऊन परत निघाली.
"मॅडम कुछ मेसेज देना है क्या?" सिक्युरिटीने आवाज देऊन तिला विचारले. पण त्याचे शब्द तिच्या कानापर्यंत पोहचलेच नाही.
घरी आल्यावर कितीतरी वेळ ती त्याचाच विचार करत राहिली.
तिला आठवले. ' तो म्हणाला होता.
" आपण आता अचानक भेटलो. परंतु पुन्हा भेटणे आपल्यासाठी योग्य नसेल."
मी ही होकार दिला होता. तसेही नचिकेतला फारसे कोणाला भेटलेले आवडत नाही म्हणून त्याला सागितले होते.
असे असताना, मी पुन्हा अमितला का भेटायला गेली? तो भेटला नाही ते एका अर्थी बरेच झाले.
मला माझ्या भावनांना आवर घातला पाहिजे.
अमितला विसरले पाहिजे. तो त्यावेळी मला का भेटायला आला नाही हे कारणही आता कळले आहे.
मला माझ्या भावनांना आवर घातला पाहिजे.
अमितला विसरले पाहिजे. तो त्यावेळी मला का भेटायला आला नाही हे कारणही आता कळले आहे.
नियतीच्या मनात नव्हते आम्ही एकत्र यावे म्हणून. तसेही आमचे लग्न झाले असते की नाही याची खात्री नव्हती. तरीसुद्धा आता मी नवरा असताना त्याच्या मागे वेड्यासारखे लागणे अगदीच चुकीचे आहे.
खरचं वेड लागल्या सारखीच वागतेय मी! सकाळपासून किती वेळा त्याचा मेसेज आला की नाही पाहण्यासाठी मी मोबाईल चेक केला? किती अस्वस्थ झाले आहे मी त्याने मेसेज केला नाही म्हणून? ऑफिस सुटल्यावर तडक त्याच्या घरी जाऊन पोहचले.
काय झाले तन्वी तुला? अगदी कॉलेजमध्ये असल्यासारखी वागते आहेस. तू विसरते आहेस का? तुझे नचिकेतशी लग्न झालेय. तुला एक अकरा वर्षाचा मुलगा आहे.'
नचिकेतचा विचार आला तशी ती भानावर आली. तो कोणत्याही क्षणी घरी येईल म्हणून उठून ती फ्रेश झाली अन् कामाला लागली.
नचिकेत रात्री साडे दहाला घरी आला होता. तोपर्यंत तन्वी, अमितचा उलट सुलट विचार करून थकून गेली होती.
"आपण रोज भेटू शकणार नाही परंतु फोनवर बोलू शकतो." असे तिने त्याला सांगितले होते.
त्याकरिता तिने त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल नंबर मागून घेतला होता.
त्याने, त्याचा नंबर ती उगीचच त्याला फोन करणार नाही. या अटीवर दिला होता.
' तो अविवाहित असूनही इतका संयमाने वागतो आहे. त्याला माझ्याविषयी ओढ वाटत नसेल का? माझ्यावर अजूनही प्रेम करतो म्हणाला होता. असे असूनही त्याला माझ्याशी बोलायची किंवा भेटायची इच्छा कशी होत नाही? की केवळ माझे लग्न झाले आहे म्हणून त्याने स्वतःला बंधन घालून घेतली आहेत?
अन् मी नचिकेतशी लग्न झालेले असूनही त्याला भेटायला उतावीळ झाली आहे. परवा तो अचानक समोर आल्यानंतर, त्याला भेटण्याविषयी किती द्वंद चालू होते मनात? अन् तो भेटल्यानंतर त्याने इतके समजावूनही मी नासमज असल्यासारखी वागत आहे.
नचिकेतला त्याच्या विषयी कळले तर काय होईल याची भीतीही मनात उरली नाही. इतकी कशी मी वाहत चालली आहे?
मी त्याच्या मोहात पडू नये म्हणून तो विचार करतो अन् मी?
शी .... काय झाले मला? काल तर मला माझ्या मुलाचाही विसर पडला. अमित इतका डोक्यात पिंगा घालतो आहे की मला दुसरे काही दिसत नाही की सुचत नाही.
मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडले आहे. जे खूप चुकीचे आहे. मला त्याला विसरायलाच हवे. बस्! आता अमितचा विचार अजिबात करायचा नाही.'
तन्वी रात्रभर, त्याला भेटणे योग्य नाही, अशी स्वतःच्या मनाची समजूत काढत, तर कधी बेफिकीर होत, का नाही भेटणे योग्य? म्हणून मनाशी हुज्जत घालत होती.
उलटसुलट विचार करून करून, तिचे डोके खूप दुखायला लागले होते. शेवटी रात्री मध्येच उठून तिने एक क्रोसिनची गोळी घेतली. पहाटे कधीतरी तिला झोप लागली होती.
.
.
.
.
.
(तन्वी पुन्हा अमितला भेटायचा प्रयत्न करेल का? पाहूया पुढच्या भागात ... )
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा