Login

ती भयाण रात्र..(भाग १)

एका भयाण रात्रीचे गूढ.


आज सकाळपासूनच एक अनामिक भीती तिच्या मनाला नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलत होती. नको नको ते विचार तिच्या भावनांना संभ्रमित करत होते.

रात्रीचे बारा, साडेबारा झाले असतील. त्यातच घरातील शांतता तिला भयानक खायला उठली होती. न राहवून मिणमिणत्या प्रकाशात खिडकीचा पडदा तिने अलगद थोडासा बाजूला सरकवला. रात्रीच्या गूढ अंधाराचे गुपित जाणून घेण्यासाठी तिचे मन बेचैन झाले होते.

रस्त्यावरील दिव्यांच्या अवतीभवती रातकिड्यांची गर्दी घोंगावत होती. काही काळाचे त्यांचे ते अस्तित्व पण तेही ते आनंदाने उपभोगत होते जणू. एकदा का त्या प्रकाशाचे अस्तित्व संपले की मग त्यांचेही संपणार होते. रात्रीच्या त्या भयाण शांततेतही घड्याळाची टिकटिक मात्र तिच्या विचारांची तंद्री तोडू पाहत होती.

"काय सुरू आहे हे? एरव्ही एकांतही हवाहवासा वाटणारी मी आज रस्त्यावर गर्दी का शोधत आहे? नक्की कोणत्या वादळापूर्वीची ही भयाण शांतता आहे?"

दूरवर अंधाराचे साम्राज्य पसरले होते त्याला सोबत फक्त दोन दिव्यांची होती. त्यातही दिव्यांचा प्रकाश मिळवण्यासाठी रातकिड्यांची जणू स्पर्धाच सुरु होती.

बाहेरच्या भयाण शांततेचे नि अंधाराचे गूढ जाणून घेत असताना पापणी पडायच्या आत त्या दोन दिव्यांनी देखील जणू घातच केला. अंधाराला असणारी दिव्यांची साथही आता सुटली. अवतीभवती घोंगवणाऱ्या किड्यांचे अस्तित्वही क्षणात नष्ट झाले.

"अरे! अचानक असे काय झाले? लाईट का गेली असेल?"

विचार सुरु असतानाच मालविकाची नजर घरातील झिरोच्या बल्बकडे गेली.

"अरे बापरे! घरात तर लाईट आहे. मग फक्त बाहेरची लाईट कशी गेली? बाहेरील दिव्यांचे आणि हे एकच कनेक्शन आहे. मग असे झालेच कसे?"

घाबरतच तिने रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा नजर चौफेर फिरवली. एकाच लाईनमध्ये असणाऱ्या सर्व फ्लॅट मध्ये अंधार झाला होता. बाहेर आता अंधाराचे साम्राज्य पसरले होते. फक्त मालविकाच्या घराची लाईट तेवढी सुरु होती. आता तर पडद्याच्या बाहेर डोकावण्याची पण तिची हिम्मत होत नव्हती.

"बाहेरच्या अंधाऱ्या दुनियेतून कोणी नजर तर ठेवत नसेल ना माझ्यावर? पण असे कशाला करेल कोण?"

विचारांना काबूत ठेवण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न सुरु होता. घाबरतच ती ब्लँकेटमध्ये शिरली. बाहेरील अंधारात फक्त आपल्या घरातील मिणमिणता प्रकाशही कोणाच्या दृष्टीस नको पडायला म्हणून मग घाईतच ती उठली आणि सुरु असलेला झिरोचा बल्ब जो की घरातील शांततेचा एकमेव सोबती होता. आता तोही तिने बंद केला नि त्या भयाण अंधाराला तिने आपलेसे केले.

"अरे, आज तर आमावास्या आहे ना?" न राहवून पुन्हा पुन्हा तिला या अमावास्येच्या रात्रीची आठवण होत होती.

अमावस्या म्हटले की मालविका आधीच खचलेली असायची. कारण दर अमावास्येच्या रात्री प्रसादची नाईट ड्युटी ही ठरलेलीच असायची.

आज संपूर्ण पोलीस लाईन शांत झालेली असायची. रोज निदान काही ठराविक लोकांनाच नाईट राऊंड असायचा. पण अमावास्येच्या रात्री चोरीची प्रकरणे तसेच इतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असे. म्हणून मग त्या दिवशी असे हे कोम्बिंग ऑपरेशन ठरलेलेच असायचे. म्हणजेच जवळपास सर्वांचीच नाईट ड्युटी फिक्स असायची.

एरव्ही अनेकदा प्रसादला नाईट राऊंडसाठी बाहेर जावे लागत असे. तेव्हाही घरात मालविका एकटीच असायची. पण त्यावेळी मात्र तिचे मन नकारात्मक विचारांनी इतके ग्रासलेले नसायचे. पण अमावास्या म्हटले की तिच्या मनात धडकीच भरायची.

ब्लँकेटच्या आतदेखील अमावास्येचा तो भयाण काळोख नि त्यात फसलेली स्वतःची प्रतिमा तिला हुबेहूब दिसायची. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिची सुरु असलेली केविलवाणी धडपड तिला आणखीच अपयशाच्या वाटेवर घेवून जात आहे, असे राहून राहून वाटत राहायचे मग.

नेहमीप्रमाणेच आजही प्रसाद नाईट राऊंडसाठी बाहेर गेला होता. घड्याळात अकराचे आता जवळपास एक होत आले होते; पण अजूनही पहाटेपर्यंत प्रसाद काही घरी येणारा नव्हता. तिने कशीबशी मनाची तयारी केली. नि ब्लँकेट तोंडावर ओढून झोपण्याचा निष्फळ प्रयत्न ती करत होती.

नको नको ते विचार तिच्या मनाला  रात्रीच्या त्या गूढ अंधारात आणखीच ढकलत होते. फ्लॅटला चहूबाजूने असलेल्या मोठ मोठया खिडक्याही आज तिला नको वाटत होत्या.

तेवढ्यात तिला अचानक समोरच्या माधुरी ताईंनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवल्या.

नेमकी त्याच वेळी किचनमध्ये काहीतरी धपकन पडल्याच्या आवाजाने तिच्या विचारांची तंद्री तुटली. आता तर तिच्या मनातील भीतीत आणखीच भर पडली.

क्रमशः

आता मालाविकाला  नेमके काय आठवले असेल? अचानक काय पडले असेल? या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध असेल का?हे सगळे खरंच तिच्या मनाचे खेळ होते की या सर्वाला वेगळे काही कारण असेल? जाणून घ्या पुढील भागात.