Login

ती भयाण रात्र..(भाग ३)

एका भयाण रात्रीचे गूढ.


आतातर मालविका पुरती घाबरली होती. एक एक करत संकटे वाढतच चालली होती. एकटीने हे सारं सहन करण्याची आता तिच्यात हिंमतच नव्हती.

काही समजायच्या आतच तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध पडली. पुढे तो आवाज कोणाचा होता? तिच्यासोबत काय सुरू आहे? या प्रश्नांना मात्र काही काळ तरी पूर्णविराम मिळाला होता.

काही वेळातच जोरजोरात बेडरूमचे दार वाजू लागले. मालविका मात्र बेशुद्ध पडली होती. घाबरून तिने कधी नव्हे तो बेडरूमचे दारदेखील बंद केले होते.

तिचा फोन देखील केव्हाचा वाजत होता. पण कदाचित फोन सायलेंट असल्याने तिला आवाज जात नव्हता.

पहाटेचे साडे चार झाले होते. प्रसाद घरी आला होता. हॉलचे दार उघडून तो आत आला. झोपेची तार त्याच्या डोळ्यावर इतकी होती की कधी एकदा आत जातो आणि मालविकाच्या कुशीत अलगद जावून झोपतो असे झाले होते त्याला.

परवाचा मुंबई हाय कोर्ट दौरा, काल दिवसभर मर्डर केसची इनवेस्टीगेशन आणि रात्रीचा नाईट राऊंड. या साऱ्यांमुळे प्रसाद अगदी थकून गेला होता. त्यात पुन्हा दहा वाजता ड्युटीवर हजर व्हावे लागणार. पुढचे तीन चार तास तरी सुखाची झोप घ्यावी या उद्देशाने तो घाईतच घरात आला होता.

परंतु घरात आल्यावर हे असे काही संकट पुढे उभे राहील, याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.

सगळे पर्याय करुन झाले. काय झाले असेल मालविकाला? नुसत्या विचारानेच तो पुरता घाबरला. तरीही पाहू अजून पाच एक मिनिट वाट म्हणत तो विचार करू लागला. आता हॉल मध्येही झोपता येईल सोफ्यावर. पण मग मालविका सेफ आहे हे कसे समजणार?

पुन्हा एकदा त्याने जोरजोरात दार वाजवायला सुरुवात केली. यापेक्षा जास्त आवाज झाला तर शेजारी पाजारी गोळा व्हायची. स्वामींच्या कृपेने ह्यावेळी मात्र मालविकाला जाग आली. पण भीतीने ती इतकी घाबरली होती की उठून दार उघडण्याची देखील तिच्या मनाची तयारी नव्हती.

शेवटी "मालविका...मालविका.." प्रसादने जोरात तिला आवाज दिला.

प्रसादचा आवाज ऐकून क्षणाचाही विलंब न करता तिने दार उघडले.

"मालविका अगं काय हे? आता जर तू दार उघडले नसते तर नक्कीच मला अटॅक आला असता."

मालविका मात्र इतकी घाबरली होती की तिला आता रडूच आवरेना. प्रसादच्या कुशीत शिरुन ती मनसोक्त रडली.

"अगं रडू नकोस ग, काय झालं आहे नेमकं बोलली नाहीस तर कसं समजणार मला. बस बरं इथे. आणि हा इतका अंधार करुन का ठेवला आहेस रुममध्ये? हा छोटा बल्ब का बंद केलास?"

प्रसाद असा बोलत होता, जसे त्याला काहीच माहिती नाही.

"मी फोन करुन सांगितले होते ना तुला सगळं, मग काहीच माहित नसल्यासारखे कसे काय बोलतोस रे तू?"

"तू मला फोन करुन सांगितले? काय सांगितले आणि कधी?"

"म्हणजे? तुला फोन नव्हता केला मी असं म्हणायचंय का तुला?"

"हो, तू कधी फोन केला होतास मला?"

"अरे एकच्या दरम्यान फोन करुन तुला सगळं मी सांगितलं होतं ना प्रसाद? मग तरीही असे कसे बोलतोस तू?"

"हे बघ हवं तर फोन चेक कर माझा. आणि तुझाही फोन दे इकडं पाहू द मला."

पाहिले तर ना आउटगोइंग कॉल होता मालविकाच्या फोन मध्ये ना इनकमिंग कॉल होता प्रसादच्या फोन मध्ये. मालविकासाठी ही खूप धक्कादायक गोष्ट होती. कारण निदान दहा मिनिटे तरी ती प्रसादसोबत बोलत होती.

"त्याने किती छान समजावून तरळल्यादेखील सांगितले मला." सर्व गोष्टी, झरझर तिच्या डोळ्यासमोर . पण आता तर मी प्रसाद सोबत बोललेच नाही असे तो स्वतः सांगत आहे.

"मग मी कोणाशी बोलले फोन वर?" मालविका ची विचारांनी गती आणखीच वाढली.

क्रमशः

नक्की काय प्रकार असेल हा? जाणून घ्या पुढील भागात.